‘हवाईदल प्रमुखांचा त्रागा’ हा ‘अन्वयार्थ’ (१३ फेब्रुवारी) वाचला. तेजस विमाने अलीकडे वारंवार वादात सापडू लागली आहेत. मात्र त्याआधी राफेल विमानांबाबत आपण एका चांगल्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. काही विमाने पूर्ण तयार स्थितीत आणण्यात येणार होती, तर उर्वरित भारतात उत्पादित करण्यात येणार होती. भविष्यात देशांतर्गत नवीन विमाने बनवणे, विमानांची देखभाल व दुरुस्ती यासाठी फ्रान्सच्या देखरेखीखाली सुविधा निर्माण करणे इत्यादींचा या करारात समावेश होता. त्या दृष्टिकोनातून भारतीय अभियंते तयार करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून दसॉल्त कंपनीने केरळमधील महाविद्यालयात राफेलसंदर्भात पाठ्यक्रम सुरू केला होता. हा निर्णय भविष्यवेधी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एचएएलने कितीही प्रयत्न केला तरी आपल्या अनुभवाने आपल्याला माहीत होते की हवाई दलाची गरज योग्य वेळेत भागवता येणे शक्य नाही. एअरॉनॉटिक्स हा तंत्रज्ञान दृष्टीने गहन विषय आहे आणि त्यात मोजक्या देशांनी प्रचंड साधनसंपत्ती ओतून कित्येक दशके केलेली प्रगती आपल्याला आज तरी शक्य नाही. अगदी चीनने तयार केलेली विमाने पाकिस्तान विकत घ्यायला तयार होत नाही. इतके हे तंत्रज्ञान काही मोजक्या (रशिया, फ्रान्स, स्वीडन व अमेरिका) देशांना आघाडीवर ठेवते. शिवाय अशा उत्पादनासाठी लागणारे उत्तम दर्जाचे अभियंते शिक्षणानंतर परदेशी नोकऱ्या मिळवण्यात यशस्वी होतात.

देशांतर्गत बनवणे की विकत घेणे हा यक्षप्रश्न होता. आधीचा दीडशे विमाने खरेदीचा निर्णय योग्य असूनही तत्कालीन संरक्षणमंत्री मा. ए. के. अँटनी त्याच्या अंमलबजावणीस कचरले. ते अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे होते आणि या निर्णयाने आपल्यावर विनाकारणच आरोप होतील म्हणून निर्णयच न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला असे वाचनात आले होते. सरकार बदलल्यावर आधीच्या निर्णयात टोकाचे बदल करण्यात आले. त्यामध्ये आजच्या स्थितीची कारणे दडलेली आहेत. ‘या सर्व आघाड्यांवर होणारा विलंब हे अंतिमत: कुण्या एका कंपनीचे नव्हे तर सरकारचे अपयश ठरते,’ हा अन्वयार्थ मर्मग्राही आहे.

● उमेश जोशी, पुणे</p>

मडकी तपासणार तरी कोण?

‘मडकी तपासून घ्या!’ हा अग्रलेख (१४ फेब्रुवारी) वाचला. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली उचलली जीभ लावली टाळ्याला असे अनेक वाचाळवीर वागतात. हे सभ्य समाजाला मान खाली घालण्यास भाग पाडणारे आहे, मात्र याची या वाचाळवीरांना ना खंत, ना खेद, ना कायद्याचा धाक. अशा स्थितीत मडकी तपासून घेणार तरी कोण, हाच मोठा प्रश्न आहे. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, हीच आजची रीत झाली आहे. त्यातूनही एखादा महाभाग सत्ताधारी पक्षाचा समर्थक असेल तर सगळी यंत्रणा त्याला वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी बजावते. नाइलाज झाला तर सोपस्कार म्हणून नाममात्र एफआयआर दाखल होतो.

अशा वाचाळवीरांची फौजच देशात निर्माण झाली आहे. त्यात राजकारणी, कलाकार, तथाकथित साधुसंत, धर्मगुरू, बुवा महाराज असे अनेक आहेत. सोलापूरकर काय, रणवीर काय किंवा समय रैना काय, सारे एकाच माळेचे मणी आहेत. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले असे म्हणणाऱ्या सुमार नटीला लगाम घालण्याऐवजी खासदारकी बहाल केली जाते, यातच सारे आले. राजकीय नेते तर एकमेकांना प्राण्यांच्या उपमा काय देतात, शारीरिक व्यंगांवर टीका काय करतात. कोणालाच धरबंध राहिलेला नाही. राज्यकर्ते फक्त इशारे देतात. प्रत्यक्षात आरोपी कोण आहे, कोणाच्या किती जवळचा आहे, हे पाहूनच कारवाया केल्या जातात. अशा स्थितीत मडकी तपासणार कोण?

● अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

त्यापेक्षा ‘चांगला तो आपला’सा करून घ्या

‘मडकी तपासून घ्या!’ हा अग्रलेख वाचला. यात नमूद दोन्ही प्रकरणे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ स्वरूपाची आहेत. दोघांनीही सुरुवातीला वाट्टेल ती बडबड केली आणि टीकेची झोड उठल्यानंतर एकाने ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’च्या विश्वस्तपदाचा राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करून घेतली, तर दुसरा माफी मागून मोकळा झाला. अशा तथाकथित लोकप्रिय व्यक्तींना जवळ करून फुकटची प्रसिद्धी लाटणाऱ्या राजकारण्यांचीही कीव करावीशी वाटते. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचे प्रबोधन करून समाजकारण करण्याची अपेक्षा असते. त्यासाठी ‘आपला तो चांगला’ म्हणण्यापेक्षा ‘चांगला तो आपला’सा करण्यावर त्यांनी भर देणे गरजेचे आहे.

● डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

कोणीही कोणाला उत्तरदायी नाही

‘मडकी तपासून घ्या!’ हा अग्रलेख वाचला आणि ‘विहीर योजनेतून निधीउपसा’, ‘लोकांना परजीवी बनवतोय का? हा सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न’, ‘खनिज प्रतिष्ठान निधीवर कुणाचा डल्ला?’, ‘परिवहन विभागाच्या इंटरसेप्टर वाहनांसाठी चढ्या दराने रडार खरेदी’, ‘हवाई दलप्रमुखांचा त्रागा’ इत्यादी बातम्याही (लोकसत्ता- १३ फेब्रुवारी) वाचल्या. सर्वत्र अनागोंदी, भामटेगिरी सुरू आहे. कुणीही कुणाला उत्तरदायी नाही. अर्वाच्य बडबड करणाऱ्या माणसाला वाहव्वा म्हणणाऱ्यांना पाहून गारुड्याच्या मागे धावणाऱ्या माकडांसारखा जनप्रवाह किंकर्तव्यमूढ आणि हताश भासतो.

● श्रीकृष्ण ढगे, कराड</p>

कायदा, तर्क, समज गुंडाळून ‘वसुली’!

‘‘विवाद से विश्वास’चा विषाद’ या लेखाद्वारे लेखकाने आयकर विभागाची विवाद वाढविण्याची प्रवृत्ती उघड केली आहे, हे योग्यच आहे. आयकर विभाग हा महसूल खात्याचा भाग आहे. हा विभाग देशातील सर्वात मोठा पक्षकार (लिटिगन्ट) असल्याचे विधान खुद्द तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी जाहीरपणे केले होते याचे स्मरण होते. पुढील अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयकर खात्यास ३० दिवसांत किमान उत्तर तरी द्या असे लिहिल्यावर, ‘३० दिवस कसे मोजायचे’ असा निर्लज्ज प्रश्न विचारण्यात आला होता.

मी स्वत: व्यावसायिक सनदी लेखापाल असल्याने आयकर खाते करदात्यांना कसे वागवते याचा प्रदीर्घ अनुभव मी घेतला आहेच. अशीच एक मोठी लढाई उच्च न्यायालयात जिंकल्यावर मी law (कायदा) logic (तर्क) आणि commonsense (सामान्य समज) शिकण्याच्या माझ्या प्रस्तावित शाळेत सर्व अधिकाऱ्यांना मोफत प्रवेश देण्याची तयारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) दाखविली होती!

इतके आचरट, सामान्य जनांना त्रास देणारे कायद्याचे अर्थ लावण्याचे प्रशिक्षण यांना अकादमीमध्ये दिले जाते? हे कायदा अधिकारी नसून वसुली अधिकारी असल्याचेच दिसते. आयकर खात्याने एक परिपत्रक काढल्यावर किमान दहा विवाद तयार होतातच. ‘विवाद से विश्वास’ योजनेद्वारे लाखो विवाद तयार होण्याची खात्री बाळगावी. आताच नवीन मांडण्यात येणाऱ्या आयकर कायद्यात थोडी सोपी, सुटसुटीत शब्दरचना असेल अशी आशा करू या.

● सुनील मोने, अंधेरी (मुंबई)

‘मानलेला’ ईश्वर लोप पावत गेला

‘ईश्वर नाहीच, हा दावा अवैज्ञानिक’ हे पत्र (लोकमानस, १३ फेब्रुवारी) वाचले. पत्रलेखक म्हणतात, ‘अद्याप अज्ञात असणाऱ्या उत्तरांनाच जर कोणी ईश्वर म्हणत असेल तर ‘तो नाहीच’ असे म्हणणेही वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही’. एकेकाळी ज्याचे आकलन मानवाला नव्हते, त्याचे कारण हे ईश्वरच असल्याचे ठामपणे मानले जात होते, पण विज्ञानाच्या प्रगतीनंतर त्यामागच्या वैज्ञानिक कारणाचा शोध लागत गेला तसतसा ‘मानलेला’ ईश्वर लोप पावत गेला. त्यात कुठेही ईश्वरी अस्तित्वाचा लवलेशही सापडला नाही. हा अनुभव व विज्ञानाची प्रगती लक्षात घेता, आज अज्ञात असणाऱ्या उत्तरांची प्रत्यक्ष प्रचीती विज्ञानाच्या आधारेच होऊ शकते. निर्माता ईश्वर मानायचा तर त्या ईश्वराला कुणी निर्माण केले असा तर्कशुद्ध प्रश्न उपस्थित होतोच. ईश्वर स्वयंभू आहे, असे उत्तर असेल तर मग फक्त ईश्वरालाच स्वयंभू का मानायचे, सारे विश्व आणि जीवसृष्टी हीसुद्धा स्वयंभू का मानू नये? या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. किंबहुना सारे विश्व आणि जीवसृष्टी स्वयंभूच आहे असे प्रतिपादन स्टीफन हॉकिंग यांनी त्यांच्या ‘ब्रिफ आन्सर टू द बिग क्वेश्चन’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकातील ‘इज देअर अ गॉड’ या प्रकरणात पृष्ठ क्रमांक ३८ वर ते म्हणतात, ‘माझ्या मते हे विश्व शून्यातून विज्ञानाच्या नियमांप्रमाणे उत्स्फूर्तपणे निर्माण झाले. आपला ज्या संकल्पनेवर विश्वास आहे, त्यावर श्रद्धा ठेवण्यास आपण सर्व जण मुक्त आहोत. माझे अगदी साधे स्पष्टीकरण आहे- देव अस्तित्वात नाही. हे विश्व कोणीही निर्माण केलेले नाही.’

● अनिल मुसळे, ठाणे</p>

loksatta@expressindia.com