‘खरे की काय?’ हे संपादकीय वाचले. पक्षात जे होतकरू, परिपक्व, संघटन कौशल्य असलेले नेते आहेत ते पूर्णपणे दुर्लक्षितच आहेत. पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर, सचिन पायलट यांच्या अंगभूत कौशल्यांचा, क्षमतेचा पक्षाने उपयोग करून घेतलाच नाही. यातील पृथ्वीराज चव्हाण वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांच्यात कौशल्ये नक्कीच आहेत. पण त्यांच्यावर कुवतीप्रमाणे जबाबदारी सोपविली जात नाही. सोनिया व राहुल यांना पक्षावरील आपली पकड सैल होऊन द्यायची नाही. खरे तर अध्यक्षपदी शशी थरूर यांची निवड झाली असती, तर पक्षात नवचैतन्याची लहर आली असती. अनेक होतकरू उत्साही युवक जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे सरसावले असते. पण तसे होत नाही. राहुल गांधींच्या दुराग्रही स्वभावाने, कार्य-पद्धतीमुळे कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य शिंदे, गुलाम नबी आझाद यांसारखे ज्येष्ठ नेते पक्षाबाहेर पडले, पण श्रेष्ठींनी याची यत्किंचितही दखल घेतली नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर एकसुरी टीका करून काहीही साधणार तर नाहीच पण तो पक्ष आणि त्याचे नेते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहातील. इतकेच नव्हे तर काँग्रेसने भाजपचा धसका घेतला आहे, असा चुकीचा संदेशही जनतेत जाईल. तोच मुद्दा संविधान धोक्यात आहे या वापरून गुळगुळीत झालेल्या टीकेचा. तेव्हा युवकांना प्रोत्साहन, सकारात्मक विचार आणि संघटना बळकट करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम ही पक्षाची त्रिसूत्री हवी. न पेक्षा पहिले पाढे पंचावन्न आहेच.
● अशोक आफळे, कोल्हापूर</p>
धैर्य असणारे नेते काँग्रेसमध्ये नाहीत
‘खरे की काय?’ हा अग्रलेख वाचला. गेली कित्येक वर्षे विरोधी पक्ष म्हणून वागण्याचे भान काँग्रेसकडे नाही यात नेतृत्वाचाच दोष आहे, हे नक्कीच. १९८४ साली केवळ दोन जागा मिळालेल्या भाजपला आज अभूतपूर्व यश देशभर मिळते आहे याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे तगडी वैचारिक बैठक. दुसरे म्हणजे व्यक्तीपेक्षा समष्टीस प्राधान्य.
या दोन्ही गोष्टींचा काँग्रेसमध्ये अभाव आहे. अटलजींसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने काँग्रेसच्या या अवस्थेचे वर्णन २००१ च्या सुरुवातीस केले होते. ते सत्यात येत आहे एवढेच. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय हिताच्या गोष्टींना योग्य समर्थन देऊन विधायक टीकेचा मार्ग काँग्रेस वाढीस नेऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्पक नेतृत्व, संघ विचारांची मजबूत संघटना आणि त्या आधारे हिंदुत्वाचे जागरण हा भाजपवाढीचा नैसर्गिक आविष्कार आहे हे लक्षात घेऊन त्यास टक्कर देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुढे वाटचाल केली पाहिजे. एवढी कुवत आणि संयम, धैर्य, असणारे नेते काँग्रेसमध्ये नाहीत आणि असल्यास त्यांना उदयास आणणारे नेतृत्व गांधी परिवारास मान्य नाही हेच ‘खरे आहे’.
● सुनील मोने, माध्यम समिती, भाजप (मुंबई)
राजकीय बदलांना तोंड देण्यात अपयश
‘खरे की काय?’ हे संपादकीय (१४ एप्रिल) वाचले. संख्याबहुल असूनही मुस्लिमांबाबतच्या भयगंडाने पछाडलेल्या हिंदू मतदारांना आपला एकमेव तारणहार केवळ आपणच आहोत हे पटवण्यात यशस्वी ठरलेल्या सत्तारूढ पक्षाशी आपल्याला लढा द्यायचा आहे हे काँग्रेसच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे घटना धोक्यात असा आक्रोश करत भुई धोपटण्याचा व्यर्थ खटाटोप अधिवेशनात केला गेला. लोकांना मनोमन काय वाटते ते समजून मग काढलेली दांडी यात्रा महात्म्याच्या कल्पकतेचे, नवे मार्ग शोधून काढण्याचे उदाहरण होते. सध्याच्या विरोधी पक्षातील कोणत्याही नेत्याजवळ ही कल्पकता आणि चिंतनक्षमता नाही. अडवाणींची रथयात्रा हे काही अंशी तरी दांडीयात्रेचे नवे रूप होते. तेव्हापासून भाजपमधील मवाळ (वाजपेयी) आणि जहाल (अडवाणी ) यांच्यातील रस्सीखेचीत जहालांची सरशी सुरू झाली. बाबरी पडली त्या वेळी ते अधिक स्पष्ट झाले. वाजपेयी हा मुखवटा आणि अडवाणी चेहरा ही स्थिती बदलली. ‘मंदिर वही बनायेंगे’ या टॅग लाइनमध्ये वाढत्या जनाधाराचा आवाज ऐकू येऊ लागला आणि काँग्रेसच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. या बदललेल्या राजकीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी अंतर्दृष्टी ना काँग्रेसकडे होती ना इतर कोणाकडे! नुकत्याच पार ‘पडलेल्या’ काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वृत्तपत्रातील वार्तांवरून हेच वास्तव सामान्य माणसाला कळले पण राहुल, खरगे यांच्या लक्षात आले का देव जाणे!
● गजानन गुर्जरपाध्ये
कार्यकर्त्यांचे जाळे विणावे लागेल
‘लाल किल्ला’ सदरातील ‘राहुल गांधी : दोन दिवस काम, तीन दिवस सुट्टी?’ हा लेख वाचला. २०११पासूनच भाजपने सत्ताधारी पक्षांना खाली खेचण्यासाठी रणनीती आखली व ती अमलात आणण्यासाठी पद्धतशीर नियोजन केले त्याचा परिणाम आज सर्वत्र दिसून येतो. निवडणुका मग त्या लोकसभेच्या असोत वा विधानसभेच्या किंवा स्थानिक पातळीवरील, भाजपने साम- दाम- दंड- भेद पद्धतीने लढवल्या असल्या तरी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी अचूक नियोजन केले आहे. याउलट काँग्रेस पक्षाची अवस्था आहे. कारण जनतेला जेव्हा बदल हवा असतो तेव्हा त्या पक्षाचे नेते आपापसात भांडून पायावर धोंडा पाडून घेतात. पूर्वीप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा धाक उरलेला नाही. जनतेच्या समस्या पक्षनेतृत्वाला ओळखता येत नाहीत, निवारण तर लांबच राहिले. पूर्वीच्या तुलनेत आज सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असूनही काँग्रेस पक्षाला त्यांचा वापर करता आला नाही, कारण तळागाळात आवश्यक असलेले कार्यकर्त्यांचे जाळे कमकुवत आहे. ते जोपर्यंत विणले जात नाही तोपर्यंत तरी पक्षाला उभारी देण्यात यश मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. गुजरातमध्ये आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी घेतलेल्या अधिवेशनातून काहीच निष्पन्न झाले नसून आपापसातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. केवळ जिल्हाध्यक्षांना बळ देण्याऐवजी कार्यकर्त्यांना उभारी दिली तरच अधिवेशनाची सफलता सिद्ध होईल.
● नंदकिशोर भाटकर, गिरगाव (मुंबई)
अशा पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करा
‘अनेक जिल्ह्यांमध्ये अपात्र शिक्षकांच्या नावे वेतनाची उचल’ ही बातमी (लोकसत्ता १४ एप्रिल) वाचली. शिक्षक भरती गेली अनेक वर्षे बंद असल्याने शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्थाचालकांनी शालार्थ प्रणालीत नियमबाह्य नावे नोंदवून ५८० अपात्र शिक्षक-कर्मचाऱ्यांनी वेतन पाच वर्षे लाटल्याचा घोटाळा उघडकीस आला. एकट्या नागपूर जिल्ह्यात २०१९ ते २०२२ या तीन वर्षांत एक हजारावर नियुक्त्या झाल्या. शिक्षण संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी होणार, ही समाधानाची बाब आहे. २०१२ पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत असे अपात्र शिक्षक पगार घेत असल्याचे समोर आले आहे. हे म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असा प्रकार आहे. शिक्षकासारख्या आदर्श पेशात अपात्र शिक्षक अवैध मार्गाने येत असतील तर ते भावी पिढी काय घडवणार? शिक्षण क्षेत्रात असा काळाबाजार करणारे शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक वा संस्थाचालक चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे.
● अरविंद बेलवलकर, अंधेरी (मुंबई)
भूजलसाठे वाढविण्याकडे दुर्लक्ष
पाणीटंचाई आणि टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासंदर्भातील बातम्या सातत्याने येत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी भूजल पातळी वाढवणे गरजेचे आहे, पण मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये इमारतीपासून संपूर्ण रस्ता आणि आजूबाजूच्या परिसराचे काँक्रीटीकरण केलेले असते. साहजिकच पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. ग्रामीण भागांतही पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी मुख्यत्वे भूजलाचा वापर केला जातो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचे पाणी उसाच्या बागा पळवतात. काही ठिकाणी भूजल पातळी तीनशे- साडेतीनशे फुटांवर गेलेली आहे. वाढती लोकसंख्या, नवी शहरे, औद्याोगिकीकरण यामुळेही पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. जमीन आणि पाणी यांचे योग्य नियोजन करणे भाग आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा औद्याोगिक वापर करणे, इमारत बांधकाम प्रकल्पांसाठी ते वापरणे शक्य आहे, मात्र त्या दिशेने पावले उचलली जात नाहीत आणि जानेवारीपासूनच टंचाई भेडसावू लागते. हे टाळण्यासाठी योग्य ठिकाणी बंधारे बांधून भूजल पातळी वाढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
● अनिल साखरे, कोपरी (ठाणे)