‘संजय जोशी यांची आत्ताच चर्चा कशाला?’ या प्रश्नाचे (लाल किल्ला- ७ ऑक्टोबर) उत्तर आहे- मोदी शहा जोडगोळीला वेसण घालण्यासाठी. गेल्या दहा वर्षांत मोदी- शहा यांनी भारतीय राजकारण आणि सत्ताकारणाचे संदर्भच बदलून टाकले. त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले ते ‘जिवाभावाच्या मित्रां’चे. त्यांनी विरोधकांतच नव्हे तर पक्षातदेखील मित्रांपेक्षा शत्रूच अधिक निर्माण केले. यंत्रणांचा अतिगैरवापर केला, पक्ष, देश व्यक्ती केंद्रित बनवला. त्यामुळे भाजप म्हणजे सबकुछ मोदी- शहा असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे मोदींनी नेमलेल्या जे. पी. नड्डा यांनी आता आम्हाला संघाची गरज नाही, असे म्हणण्याचे धाडस केले. संघ ही परिवाराची मातृसंघटना आहे याचे भान या जोडगोळीने बाळगले नाही.

जूनमधील निकालानंतर आतापर्यंत आळीमिळी गुपचिळी धारण करून बसलेला संघ परिवारदेखील बोलू लागला. मुदत संपल्यानंतरदेखील भाजपला अद्याप अध्यक्ष मिळू शकलेला नाही. आता भाजपअध्यक्ष पदासाठी संजय जोशी यांच्या नावाची चर्चा होत आहे. संजय जोशी म्हटले की त्यांचे सीडी प्रकरण आठवते. हे सीडी प्रकरण कोणी, कसे बाहेर काढले आणि त्यानंतर संजय जोशी कसे विजनवासात गेले हे सर्वांसमोर आहे. मोदी-जोशी यांचे ‘सख्य’ जगजाहीर आहे. मोदींच्या एकचालकानुवर्ती मनमानी कारभारामुळे संघ परिवार त्रस्त झाला आहे. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींच्या गॅरंटीची गॅरंटीही संपली आहे. त्यामुळे मोदी-शहा जोडगोळीला वेसण घालण्यासाठीच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी संजय जोशी यांच्या नावाची चर्चा होत आहे. – अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)

varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

मोदींसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न

‘संजय जोशींची चर्चा आत्ताच कशाला?’ हा ‘लाल किल्ला’मधील महेश सरलष्कर यांचा लेख (लोकसत्ता, ७ ऑक्टोबर) वाचला. ‘४०० पार’चा नारा देऊन अवघ्या २४० जागाच पदरी पडल्यापासून मोदी-शहा ही जोडगोळी पक्षावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीरच्या जनमत चाचण्यांवरून दोन्ही राज्यांत भाजपची स्थिती डळमळीत दिसते. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका मोदी-शहांसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच गृहमंत्री अमित शहा शासकीय कामांसाठी नाही तर राजकीय कामासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील भूपेंद्र यादव, अश्विन वैष्णव आदीदेखील राज्यात प्रत्येक सभेत हजर दिसतात. केंद्रातील शासकीय कामे संपली आहेत का?

हेही वाचा : लालकिल्ला: संजय जोशींची चर्चा आत्ताच कशाला?

लोकसभेत मिलीजुली सरकार स्थापन केल्यापासून विरोधकांच्याच नव्हे तर पक्षातील नेतेमंडळींच्याही मनातील मोदींची भीती नाहीशी झाली आहे. लोकसभेच्या प्रचारादरम्यानची मोदींची वक्तव्ये देशातील जनतेलाच नाही तर भाजपच्या मातृसंस्थेलादेखील आवडलेली नव्हती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणांमधून त्याबाबत कानपिचक्यादेखील दिल्या आहेत. त्यामुळेच आरएसएस आता पंतप्रधान मोदींसाठीचा पक्षातील पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातूनच मोदींचे कट्टर विरोधक असलेले संजय जोशी यांचे नाव अनाहूतपणे पुढे आले आहे, हे स्पष्ट आहे. लोकसभेतील संख्याबळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातदेखील भाजपला आणि महायुतीला विधानसभेत कमी जागा मिळाल्या तर मोदी-शहा यांची उरलीसुरली भीती आणि पक्षावरील पकडदेखील कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींकडून होणाऱ्या करोडो रुपयांच्या प्रकल्पांच्या घोषणा, उद्घाटन आणि भूमिपूजन आदी गोष्टी भाजपला तारतील असे आरएसएसला वाटत नाही म्हणूनच मोदी-शहा विरोधकांची नावे चर्चेत येत आहेत. – शुभदा गोवर्धन, ठाणे</strong>

चित्रफिती अन् उतरता करिष्मा

‘संजय जोशी यांची चर्चा आत्ताच कशाला?’ हा महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. संजय जोशींना दूर का केले, त्यांच्या भोपाळ येथील गाजलेल्या चित्रफिती वगैरेचा उल्लेख आला असता तर लेख समतोल झाला असता. लेखातील इतर विश्लेषण मात्र बुद्धीस पटणारे आहे. नुकतीच झालेली मोदी यांची अमेरिका भेट मागच्या भेटींच्या तुलनेत सुनीसुनी गेली हे त्यांचा उतरता करिष्मा दर्शविणारे आहे. सिगमॉईड कर्व्हनुसार वाढ (प्रगती/ विकास/ प्रसिद्धी) होते, नंतर एका महत्तम पातळीवर स्थिरावते आणि त्यानंतर उतार येतो. हे नैसर्गिक सूत्र, बहुधा इथेही लागू पडेल. – सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)

सज्जनांचे मौन अधिक नुकसानकारक

दुसऱ्या महायुद्धाची बीजे व्हर्सायच्या तहात होती, पण या इतिहासातून जग अद्याप धडा शिकलेले नाही. जग बदलले आहे, जवळ आले आहे. त्यामुळे स्थानिक संघर्ष जगभरातील सर्व देशांचे जनजीवन घायकुतीला आणू शकतो. जागतिक नेते इतके हतबल का व्हावेत? हमासने वर्षभरापूर्वी इस्रायलवर हल्ला चढवला तेव्हा त्यात स्वत:च्या सामर्थ्याचा विचार नव्हता. निराशेतून जगाला खड्ड्यात घालायचा तो प्रयत्न होता. अपेक्षेप्रमाणे इस्रायल त्याला बळी पडला. हमासने पकडलेले ओलीस इस्रायलला अद्याप सोडवता आलेले नाहीत. या साऱ्या घडामोडींत सामर्थ्यवान देश गप्प का आहेत? वर्षभर सुरू असलेला हा भयानक हिंसाचार थांबवण्याची संधी सुरुवातीच्या सात-आठ दिवसांत होती, पण समर्थ राष्ट्रांनी इस्रायलला मोकळीक दिली. खरे तर ही संधी साधून जगभरातील दहशतवादी वृत्तींना कायमचा आवर घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत संहिता तयार करता आली असती. विध्वंसक दहशतवादी हल्ला अनुभवलेल्या अमेरिकेलाही त्यासाठी पुढाकार घ्यावासा वाटला नाही. इस्रायल जे करत आहे ते विधीसंमत नाही. याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घ्यावी लागते. ‘तोडता तरु फुटे अधिक भराने’ या न्यायाने इस्रायलने नवीन अतिरेक्यांना जन्म दिला आहेच. पण यात त्याने जगाला ओढले आहे. दुर्जनांच्या वाईट कृत्यापेक्षा सज्जनांचे मौन अधिक नुकसान करते. सारे जग त्याचा अनुभव घेत आहे. – उमेश जोशी, पुणे</strong>

हेही वाचा : चिप-चरित्र: ‘एनव्हिडिया’ : ‘एआय’ चिपचं युग!

नव्या अतिरेक्यांना जन्म देणारे वर्तमान

‘निष्क्रिय सज्जनांचा श्राद्धदिन!’ हा अग्रलेख (७ ऑक्टोबर) वाचला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातील मोठी युद्धे, ताण-तणाव कमी करण्यासाठी अधिक कार्यकारी अधिकार असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. पुढे काही काळ संयुक्त राष्ट्रसंघाने जगभरातील तणाव निवळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यही केले पण आज सुरू असलेली दोन्ही युद्धे थांबवण्यात संयुक्त राष्ट्रे आणि नाटो कुचकामी ठरत आहेत. पुतीन व नेतान्याहू दोघेही क्रूरकर्मा आहेत. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनला पुन्हा उभे करायचे तर काही लाख कोटी डॉलर्स आणि १५-२० वर्षांचा कालावधी जाईल.

निर्वासितांचा शेजारी राष्ट्रांवरील भार हा आणखी एक मोठा प्रश्न आहे. इस्रायल हमास युद्धात गाझा पट्टी संपूर्ण नष्ट झाली आहे. लेबनॉनही त्याच मार्गावर आहे. निष्पापांचे विनाकारण बळी जात आहेत. यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्यामधून आणखी अतिरेकी तयार होतील. याला कोण जबाबदार? हमासला आता आपण कुठल्या सापाच्या शेपटीवर पाय ठेवला, असे वाटत असेल. मध्ययुगीन मानसिकता बाळगून, आपल्या धर्माशिवाय इतर कुठल्याही धर्माचे अस्तित्व स्वीकारण्यास तयार नसणाऱ्या या कट्टरपंथींमुळे जगावर ताण येत आहे. मानवता आणि मानवी हक्क यांना महत्त्व देणारी अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांनाही युद्ध थांबवण्यात रस दिसत नाही. इस्रायलच्या बाजूने अमेरिका, इंग्लंड खंबीरपणे उभे आहेत, म्हणून इस्रायलची हिम्मत वाढली आहे. जगभरातच खंबीर पण शांतताप्रेमी पुरोगामी विचारांच्या नेत्यांची खूपच कमतरता जाणवत आहे. – अनिल दत्तात्रेय साखरे, ठाणे

हेही वाचा : संविधानभान : अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे

सांस्कृतिक शहरात महिला असुरक्षित

बोपदेव घाटात गुरुवारी मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. ही घटना ताजी असतानाच पुण्यातच दोन शाळकरी मुलींवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची बातमी आली. पुण्यात सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याने सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्याची मान शरमेने खाली झुकत आहे. सहा महिन्यांत महिला अत्याचाराच्या सुमारे ३६० घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे. विद्योचे माहेरघर म्हणवणाऱ्या सुसंस्कृत पुण्यात पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नसल्याचेच हे निदर्शक आहे. – श्याम ठाणेदार, दौंड (पुणे)

Story img Loader