‘भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’’ हा ‘लालकिल्ला’मधील महेश सरलष्कर यांचा लेख वाचला. भाजपने सर्वसामान्यांवर ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतात तिथे डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले. हे भारताच्या परंपरेला शोभणारे नव्हे. माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाले तेव्हा काँग्रेस सरकारने त्यांच्या अंत्यविधीसाठी खास जागा दिली व तिथेच त्यांचे स्मारक उभे केले तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार झाले तेव्हाही बाळासाहेबांच्या विरोधातले सरकार केंद्रात व राज्यात होते. डॉ. सिंग यांच्या बाबतीत, ही परंपरा भाजपला जोपासता आली नाही. भाजपकडून काँग्रेसबद्दल जी आगपाखड होत आहे ती भाजपची सारवासारव आहे. जागतिकीकरणानंतर अवघे जग गोंधळले होते. त्या कोलाहलात भारताला आपला सूर डॉ. मनमोहन सिंग यांच्यामुळे सापडला. जगाला हेवा वाटावा असे त्यांचे कार्य आहे. तरीही त्यांच्या वाट्याला हेटाळणी, अवमान, उपहास आणि मृत्यूनंतरही अवहेलना आली. भविष्यातील मनमोहन सिंग यांचे भव्य स्मारक उभे राहील आणि अवघ्या जगासाठी ते प्रेरणादायी ठरेल, पण भाजपला संधी साधता आली नाही, हेच खरे.
● ज्ञानेश्वर हेडाऊ, हडपसर (पुणे)
यावेगळी अपेक्षाही नव्हती!
‘भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’’ हा ‘लालकिल्ला’ मधील लेख (३० डिसेंबर) वाचला. सत्ताधारी म्हणून राजधर्माचे पालन करण्याची गरज असताना टोकाचा विद्वेष (तोदेखील बराचसा खोटा इतिहास फेक नॅरेटिव्हद्वारे मांडून) पसरवला जात आहे आणि जणूकाही काँग्रेसने सर्वांचाच अपमान केला, द्वेष केला असे चित्र रंगवले जात आहे. हे राजधर्माचे पालन असू शकत नाही. विश्वविख्यात अर्थतज्ज्ञ, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशभर दु:खाचे सावट असताना मोदी सरकारने त्यातही राजकारण साधले आणि त्यांचा अत्यंविधी निगमबोध घाटावर उरकला.
हेही वाचा : लालकिल्ला : भाजपने गमावलेल्या संधीचे ‘स्मारक’!
प्रत्येक गोष्टीत गांधी- नेहरू घराण्याच्या चुका शोधण्याच्या वृत्तीचा अतिरेक झाला आहे. डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे माजी पंतप्रधान होते. त्यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. देशाच्या अडचणीच्या काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते केवळ काँग्रेसचे नेते नव्हते तर पक्षापलीकडे जाऊन त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. काँग्रेसने कोणाचा मानसन्मान केला, नाही केला हे किती काळ उगाळत बसणार? बरे भाजप किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कोणाचा सन्मान करतात? डॉ. मनमोहन सिंग यांवर त्यांनी किती टीका केली होती, हे जनता जाणून आहे. अपघाती पंतप्रधान म्हणून त्यांना हिणवले गेले. मौनीबाबा म्हटले गेले, मात्र डॉ. सिंग यांनी त्यांना आपल्या सद्वर्तनातून उत्तर दिले. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर अनेक आरोप झाले, त्यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली गेली आणि यात भाजपच आघाडीवर होता. मोदी तर आपल्या पक्षातील वरिष्ठांचादेखील सन्मान करत नाहीत. डॉ. मनमोहन सिंग यांचा शेवटच्या क्षणीदेखील सन्मान करण्यात आला नाही आणि स्मारकाबाबत नेहमीप्रमाणे राजकारण केले गेले. मोदींच्या राजवटीत यापेक्षा वेगळे घडेल अशी शक्यता नाही.
● अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)
…कारण ‘ते’ प्रचाराला बळी पडले नाहीत
‘महाराष्ट्राचे उत्तरायण’ हा अग्रलेख (३० डिसेंबर) वाचला. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे उत्तरेकडे सरकणे सुरू असण्याचे कारण भाजपचा राज्यात वाढत असलेला प्रभाव म्हणावा लागेल. ‘सब का साथ, सब का विकास’ म्हणत प्रत्यक्षात भाजपने हिंदुत्ववादाची कास धरून एकेकाळच्या पुरोगामी, श्रीमंत, प्रगत तसेच सहिष्णुतावादी महाराष्ट्राला उत्तरेकडील राज्यांच्या पंक्तीत (जिथे भाजपची सत्ता हिंदुत्वाच्या आसऱ्याने गेल्या काही वर्षांत फळफळली) नेऊन बसविण्याचे काम केले. त्या नादात राज्यातील कित्येक प्रकल्प अन्य राज्यांनी पळवले. अशावेळी राज्यातील राजकारणी मात्र स्वत:चा विकास साधण्यासाठी आपापले पक्ष फोडून भाजपच्या वळचणीला जात राहिले. दक्षिणेकडील राज्यांनी भाजपच्या प्रचाराला बळी न पडता आपला विकास साधण्यास प्राधान्य देत नागरिकांची सांपत्तिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिले. परिणामस्वरूप तेथील लोकांचे जीवनमान उंचावले असे ठामपणे म्हणावे लागेल.
● डॉ. किरण गायतोंडे, चेंबूर (मुंबई)
राज्याच्या खालावलेल्या प्रकृतीची काळजी घ्या
‘महाराष्ट्राचे उत्तरायण’ हा अग्रलेख ३० (डिसेंबर) वाचला. योग्य मोबदला मिळणारीच व्यक्ती खर्च करू शकते, हे साधे तत्त्व आहे. राज्याची खरी हीच बोंब आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांतील सामान्य नागरिकांना पुरेसे उत्पन्न, योग्य मोबदला मिळत नाही, त्यामुळे ते शहरांकडे धाव घेतात. तिथेही कमीअधिक प्रमाणात सामन्यांची तीच स्थिती आहे. राज्याच्या खालावलेल्या प्रकृतीमागे अनेक कारणे आहेत.
हेही वाचा :चिप – चरित्र : भविष्यवेध!
गेल्या २५ वर्षांत अनेक उद्याोग बंद पडले, स्थलांतरित झाले. त्या तुलनेत नव्याने आलेल्या उद्याोगांचे प्रमाण अल्पच आहे. उत्पादन क्षेत्राचा इतर राज्यांच्या तुलनेत मंदावलेला वेग, शेती क्षेत्राची दुरवस्था, शैक्षणिक गुणवत्तेत घसरण, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी अशा अनंत कारणांनी समृद्ध महाराष्ट्र गरीब झाला. जीएसटी आणि आयकरात सर्वाधिक योगदान देणारे राज्य हळूहळू दक्षिणेतील राज्यांच्या मागे पडले. महाराष्ट्राच्या कर रचनेत आणि परवाना प्रक्रियेत अजूनही काही त्रुटी आहेत. त्यामुळे उद्याोग आकर्षित होत नाहीत. दक्षिणेतील राज्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे प्रगती केली. पोर्ट आणि लॉजिस्टिकसाठी प्रभावी पायाभूत सुविधा उभारल्या, त्यामुळे ती व्यापारासाठी अधिक अनुकूल ठरली. तमिळनाडू आणि कर्नाटक यांनी तंत्रज्ञान शिक्षण आणि आयटी क्षेत्रांवर भर दिला. त्याउलट महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह सर्व महत्त्वाची शहरे बकाल अवस्थेत आहेत. राज्याने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्याोग-अनुकूल धोरण तयार करणे, ग्रामीण भागांतील मूलभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. राज्याला केंद्राकडून अधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
● विजय वाणी, पनवेल</p>
‘चुकून’ पाडले हे कोणालाही पटणारे नाही
‘रशियन युद्धखोरीचे हकनाक बळी?’ हा ‘अन्वयार्थ’ (३० डिसेंबर) वाचला. ‘मांजराचा खेळ होतो, पण उंदराचा जीव जातो,’ असे म्हटले जाते; तद्वतच रशियाच्या युद्धखेळीने इतर देशांतील निष्पाप नागरिकांचा बळी गेला, याचे ताजे उदाहरण म्हणजे अझरबैजानचे विमान कझाकस्तानमध्ये पाडले गेले, हे होय! वास्तविक युद्धशास्त्रात शत्रू पक्षाच्या नागरी वस्त्यांत हल्ले न करण्याचा युद्ध-नियम आहेच, त्याच नियमान्वये युद्धप्रसंगी मित्र किंवा त्रयस्थ तर सोडाच पण खुद्द शत्रूचेही प्रवासी विमान पाडणे युद्धनियमांस मुळीच धरून नाही; तरीही अति-अत्याधुनिक यंत्रणांची रेलचेल असलेल्या रशियासारख्या प्रगत देशाचा ‘चुकून प्रवासी विमान पाडण्याचा’ इतिहास पाहता अझरबैजानचे विमान ‘चुकून’ पाडले गेले हा दावा जागतिक स्तरावर कुणासही पटणारा नाही. आजघडीला प्रवासी विमानोड्डाण फारच धोकादायक झाले असून, जीव मुठीत घेऊनच हवाई प्रवास करण्यावाचून गत्यंतरच उरलेले नाही, एवढे मात्र खरे!
● बेन्जामिन केदारकर, नंदाखाल (विरार)
पंतप्रधानांना गंगेच्या प्रदूषणाचा विसर?
‘‘महाकुंभ’ हा एकतेचा संदेश’, ही बातमी ( लोकसत्ता ३० डिसेंबर) वाचली. १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी प्रचंड गर्दी जमणार आहे. समाजातील द्वेष आणि फाटाफूट या हीन भावना संपवून भारतीयांना महाकुंभच्या कार्यक्रमात एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केले आहे. कार्यक्रमाची माहिती ‘एआय चॅट बॉट’च्या मदतीने भारतातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध होणार, पाण्याखाली ट्रेथर्ड ड्रोन, बहुभाषिक चिन्हे, वगैरच्या साहाय्याने कुंभ मेळ्याची प्रसिद्धी जगभर होणार असल्याचे कळते. लोकभावना प्रफुल्लित करणारी विधाने भारताच्या पंतप्रधानांनी केली, तीसुद्धा प्रेरणादायी आहेतच. मात्र यामध्ये कुंभमेळ्यासाठी जमणाऱ्या अफाट जनसमुदायामुळे गंगा नदीच्या विशाल पात्रात अमर्याद कचरा जमा होणार, निर्माल्य पूजा सामग्री, अन्नधान्यातील टाकाऊ घटक, पवित्र गंगा नदीतील प्रदूषण वाढवणार, त्यामुळे जीवसृष्टी संकटात येणार. याची दखल घेण्याची आठवण पंतप्रधानांना का झाली नाही? नदीचा परिसर स्वच्छ ठेवा, पर्यावरणाचे रक्षण करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले असते तर गंगा स्वच्छ राखण्यास हातभार लागला असता.
● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)