‘ट्रम्पोदयाचे टरकणे’ हा अग्रलेख (लोकसत्ता- २० जानेवारी) वाचला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प हाती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शांतता तोडगा हमास- इस्रायलला मान्य होणे हा निव्वळ योगायोग नाही. तसेच हिंडेनबर्गने गाशा गुंडाळणे हेदेखील ट्रम्पोदयाशी निगडित आहे, असे दिसते. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला भारतीय पंतप्रधानांना निमंत्रण न देऊन अमेरिकेने भारताला सुप्त इशारा दिला आहे. ब्रिक्स आणि अमेरिका अशा दुहेरी डगरीवर भारत पाय ठेवत आहे. ब्रिक्सचा ‘डी डॉलरायझेशन’चा अजेंडा अमेरिकेला पसंत पडलेला नाही. त्यातच भारताने अमेरिकी मालावर चढ्या दराने आयात कर आकारला आहे. ‘टेस्ला’ आणि ‘स्टारलिंक’ला भारतात प्रवेश दिलेला नाही, अशी अनेक कारणे आहेत. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर अमेरिकेत तळ ठोकून बसले आहेत. मात्र त्यांनी पूर्वी अतिस्पष्ट आणि आक्रमक विधाने केलेली आहेत ती अमेरिकी प्रशासनाला आवडलेली नाहीत. त्यामुळे तणाव निवळलेला नाही. ट्रम्प प्रथम युक्रेन-रशियात युद्धबंदी घडवून आणतील. ‘क्वाड’ आणि ‘ऑकस’ राष्ट्रगटांद्वारे चीनची अनुक्रमे लष्करी आणि आर्थिक कोंडी करण्याच्या प्रयत्नांवर भर देतील. चीन २०४९ पर्यंत अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वांत मोठी महासत्ता होण्याचे मनसुबे रचत आहे. मात्र तो देश फसलेले एक अपत्य धोरण, फुटलेला बांधकाम उद्याोगाचा बुडबुडा, बेरोजगारी, वृद्धांची वाढती लोकसंख्या, अंतर्गत अशांतता अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. त्यातच अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनी लादलेल्या निर्बंधांमुळे चीनचा विकासदर मंदावला आहे. ट्रम्प यांच्या आगमनानंतर चीन-अमेरिका शीतयुद्धाचा तडाखा चीनला मोठ्या प्रमाणात आणि भारताला काही प्रमाणात बसेल, यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा