‘फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातेकडे’ हे वृत्त (लोकसत्ता- १४ सप्टेंबर) वाचले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला जाणारच होता. तिथे विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. गुजरातमध्ये भाजपपुढे आम आदमी पक्षाने आव्हान उभे केले आहे. ‘गुजरात मॉडेल’ विरुद्ध ‘दिल्ली मॉडेल’ अशी चढाओढ आहे. गुजरात ही भाजपची हिंदूत्वाची प्रयोगशाळा आणि बालेकिल्लाही आहे. भाजपला हा गड सुरक्षित राखायचा असताना फॉक्सकॉनसारखा मोठा प्रकल्प कितीही प्रयत्न केला असता, तरीही महाराष्ट्राच्या पदरात पडणे मुश्कील होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पाचे तुळशीपत्र गुजरातच्या पारडय़ात टाकले असणार आणि पारडे भारंभार भरले असणार.

‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे. हा प्रकल्प देशासाठी लाभदायक ठरेल. जगभर सेमीकंडक्टर्सचा तुटवडा आहे. ‘टीएसएमसी’ (तैवान), ‘इंटेल कॉर्पोरेशन’ (अमेरिका) आणि ‘सॅमसंग’ (दक्षिण कोरिया) हे सेमीकंडक्टर्सचे जगातील प्रमुख उत्पादक आहेत. तर सेमीकंडक्टर उत्पादनाला लागणाऱ्या यंत्रसामग्रीची निर्मिती करणारी ‘एएसएमएल’ (नेदरलँडस) ही प्रमुख कंपनी आहे. एक मोठा आणि अद्ययावत सेमीकंडक्टर प्रकल्प भारतात येणे हे भाजपप्रणीत मोदी सरकारसाठी महत्त्वाचे आहे. 

डॉ. विकास हेमंत इनामदार, पुणे

महाराष्ट्रातील नेत्यांना गुजरातच्या तरुणांची चिंता

महाराष्ट्रातील अनेक बेरोजगारांना आणि लघु उद्योगांना कामधंदा मिळवून देऊ शकेल, असा फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे गेल्यामुळे महाराष्ट्राचे एक लाख ६६ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प ताळेगावला होणार याबद्दलचा निर्णय मविआ सरकारच्या काळात शेवटच्या टप्प्यापर्यंत आला होता. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तो गुजरातकडे वळवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना येथील बेरोजगारांपेक्षा गुजरातमधील बेरोजगारांची अधिक चिंता आहे, हे यामागचे कारण असावे.

तीन वर्षांपूर्वी फडणवीस सरकार अस्तित्वात असतानाही महाराष्ट्रात होऊ घातलेले अनेक उद्योग ‘देशाच्या भल्यासाठी’ (?) गुजरातला बहाल करण्यात आले. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी आणि अहमदाबादचे महत्त्व वाढवण्यासाठी या उठाठेवी करण्यात आल्या. आज मराठी तरुणांनी नोकरी आणि कामधंदे करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा दहीहंडय़ा फोडण्यासाठी, गणपती, नवरात्रोत्सव आणि इतर बारा महिने होणाऱ्या हिंदूंच्या सणांमध्ये नाचण्यासाठी त्यांच्याकडे मोकळा वेळ असणे आवश्यक आहे, असे सरकारला वाटत असावे. त्यांनी फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला बहाल केला त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

जगदीश काबरे, सांगली

काँग्रेसने वाचाळवीरांना लगाम घालणे गरजेचे

‘भारत जोडो विरोधकांच्या ऐक्यासाठी नव्हे तर काँग्रेसच्या मजबुतीसाठी!’ हे जयराम रमेश यांचे विधान वाचून (लोकसत्ता- १३ सप्टेंबर) हसावे की रडावे तेच कळेना! भारत जोडो आंदोलन हे ‘लोकशाही बचाव’ आणि ‘देश बचाव’ आंदोलन आहे, असे जनतेला दाखवण्याची काँग्रेसची इच्छा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात ‘शरद पवार हे विरोधी ऐक्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात,’ असे विधान पी. सी. चाको यांनी केले. या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांच्या ‘ठणकावण्याचा’ ‘ठसका’ आणि ‘ठणका’ काँग्रेसलाच लागण्याची शक्यता अधिक वाटते. काँग्रेसमध्ये विद्वानांची कमतरता नाही, मात्र बहुतेकांना लोकप्रिय होणे साध्य झालेले नाही. लोकप्रिय नेत्यांवर काहींचा राग असतो. असे वाचाळवीर स्वत:च्या मानसिक समाधानासाठी काहीतरी बडबड करतात. भाजपमध्येही असे अनेक आहेत परंतु त्यांना समाजासमोर तोंड उघडण्याची मुभा नसावी. काँग्रेस सदस्यांचे वर्तन नेहमी ‘समर्थाघरचे श्वान, त्यास सारे देती मान’ असे असते. सर्व प्रादेशिक आणि छोटे पक्ष यांचेही काही विचार, अजेंडा असतात. त्यांना सभ्यपणे वागवणे हे मोठय़ा पक्षांना फायद्याचे असते. पराजित राजालाही अलेक्झांडरने आदराने वागवले याबद्दल त्याचे खूप कौतुक होते. ‘समर्थाघरचे’ असूनही समर्थाचे भलेबुरे कळण्यात बहुतेक काँग्रेसजन अयशस्वी ठरले आहेत.

काँग्रेसमधील जनसंपर्कशून्य सदस्यांना आपली जबाबदारी समजावून देण्यात काँग्रेस नेतृत्व सर्वस्वी अपयशी ठरत आहे. ज्याप्रमाणे भाजपमधील प्रत्येकाला कोणती बाब पक्षहिताची हे कळते तसे काँग्रेसजनांनाही ते कळावे यासाठी पक्षनेतृत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जोपर्यंत काँग्रेस नेतृत्व वाचाळवीरांना लगाम घालत नाही, तोपर्यंत प्रादेशिक आणि डाव्या पक्षांनी काँग्रेसपासून दूर राहणेच बरे.

प्रवीण ठिपसे, मुंबई

खोटारडय़ा, दांभिक लोकांचा देश

सोमवार आणि मंगळवार (१२ आणि १३ सप्टेंबर २०२२) रोजी मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई असा द्रुतगती महामार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रवास केला. ताबडतोब जाणवलेली गोष्ट म्हणजे बेशिस्त आणि बेदरकार वाहतूक अगदी पूर्वीप्रमाणे सुखेनैव चालू आहे. पहिली मार्गिका अडवून संथ गतीने जाणे, डावीकडून ओव्हरटेक करत मधल्या अथवा पहिल्या मार्गिकेत सुसाट वेगाने घुसणे, मालमोटारी आपल्याच सोयीने जात राहाणे इत्यादी सर्व पराक्रम परंपरेनुसार अखंड आहेत. पोलीस कोठेही गस्त घालताना दिसले नाहीत. अर्थात त्यामुळे अपेक्षाभंग झाला नाहीच. 

विनायक मेटे यांचा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे अनेक घोषणा करण्यात आल्या. त्या सर्व अपेक्षेनुसारच कागदावर राहिल्या आहेत. 

कोणतीही घटना घडली की तात्पुरती मलमपट्टी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क झाला आहे. आग लागली की सर्व इमारतींचे फायर ऑडिट, अपघात झाला की एक-दोन दिवस वाहतूक नियंत्रण, खड्डे पडले की बुजवण्याची प्रतिज्ञा हे आपल्या इतके अंगवळणी पडले आहे की शासन यंत्रणा खोटे बोलत आहे याची खात्री असूनही आपण ते चालवून घेतो. त्यामुळे आपल्या लायकीचेच सरकार आपल्याला मिळणार हे उघड आहे.

शासकीय आणि अशासकीय खोटेपण आपल्यासमोर रोज दिसत असते. मात्र आपण स्वत:च कायदे मोडत असल्याने ‘चलता है’ या मनोवृत्तीचे बळी असतो. कोणाला ना खेद ना खंत. 

दिलीप चावरे, अंधेरी, मुंबई

प्रदूषण न करताही परंपरा जपता येतात

कोरोना संकट टळल्यामुळे यंदा सर्व सण मोठय़ा उत्साहात साजरे करण्यात आले. उत्सव उत्साहात साजरे करण्यात गैर काहीच नाही, मात्र प्रदूषण समर्थनीय नाही. यंदा कर्कश विसर्जन मिरवणुकांमुळे ध्वनिप्रदूषणात प्रचंड भर पडली. फुलांच्या पाकळय़ांचा वर्षांव करण्याचा पर्याय असूनही गुलालाची अतिप्रमाणात उधळण करून प्रदूषणात भर घालण्यात आली. पाडव्याला पुण्या-मुंबईत जे डोळय़ांचे पारणे फेडणारे आल्हाददायक दृश्य असते तसे गणेशोत्सवातही दिसले, तर आनंदच होईल. लेझीम, ढोल-ताशा ही आपली परंपरा आहे. या वाद्यांमुळे परंपरा जपली जाईल आणि ध्वनिप्रदूषणही काही प्रमाणात नियंत्रणात राहील. एका गणेशोत्सव मंडळाने लेसर किरणांची आतषबाजी केली आणि काही नागरिकांच्या डोळय़ांवर परिणाम झाला. असे दुष्परिणाम उद्भवणार असतील, तर लेझर शोवर कायमची बंदी घालणे आवश्यक आहे. डीजेचा व्यवसाय बंद पडावा असे वाटत नाही, त्यांनीही ध्वनिमर्यादा पाळल्यास संगीत सुसह्य होईल. गणेशोत्सव मंडळांनी जबाबदारीने वागावे.

यशवंत चव्हाण, बेलापूर (नवी मुंबई)

मग सण कोण साजरे करणार?

सण-उत्सवांमुळे तरुणांना जल्लोष करण्याची संधी मिळते. अशी संधी असताना कशाला हवा आहे रोजगार? सरकारने उत्सवांवरील निर्बंध उठवले आहेत. नवरात्रीत रात्रभर नाचायचे, दिवाळीत फटक्यांवरचे निर्बंध उठवले जातीलच, मग मनसोक्त फटाके फोडायचे. पाठोपाठ होळी, धुळवड येईलच. राज्यात फॉक्सकॉन आला तर रोजगार निर्माण होईल, तरुण कामाला लागतील, लोकांना रोजगार मिळेल. असे झाले, तर उत्सव कोण साजरे करणार? रोजगार नंतरही निर्माण करता येतील, पण सण साजरे करण्यात अजिबात कमतरता राहाता कामा नये.

आशीष जाधव, रत्नागिरी

सरवणकर यांची निष्पक्ष चौकशी होईल?

गणेशोत्सवात प्रभादेवी येथे शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक यांच्यात राडा झाला. सरवणकर यांनी आपल्या पिस्तूलातून गोळय़ा झाडल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस याआधीही गृहमंत्री होते, त्या वेळी भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले? ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा भाजप वगळता, अन्य पक्षांच्या नेत्यांच्या मागे सतत लागलेला असतो. या यंत्रणांनी किती भाजप नेत्यांची चौकशी केली? त्यामुळे सरवणकर यांची निष्पक्ष चौकशी होणार, हे आश्वासन विनोदीच वाटते.

– अरुण पां. खटावकर, लालबाग (मुंबई)

Story img Loader