शरद पवार हे जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी यांच्या एवढे प्रभावशाली नेते कधीच नव्हते. के. चंद्रशेखर राव (तेलंगणा), अरिवद केजरीवाल (दिल्ली, पंजाब), योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश), ममता बॅनर्जी (प. बंगाल), नितीशकुमार (बिहार) हे आपापल्या राज्यातील आणि देशातीलही कर्तृत्ववान राजकारणी आहेत. त्याच जोरावर ते मुंबई व महाराष्ट्रावर धडका मारत असतात. ६३ वर्षांच्या राजकीय प्रवासात पवार महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणू शकलेले नाहीत. उलट आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गमावून बसले आहेत. याला कारण आहे, पवारांचे सतत संभ्रमात टाकणारे राजकारण. कधी भाजपला पाठिंबा देत शिवसेनेची कोंडी कर आणि आम्हाला दोघांत भांडणे लावायचीच होती, म्हणून फुशारकी मार तर कधी आघाडय़ा- युत्यांच्या कुरघोडय़ा कर. यामुळे पवार देश पातळीवर स्वत:विषयी विश्वासार्हता निर्माण करू शकले नाहीत. भाजपमध्ये राहूनही स्वतची स्वतंत्र, कार्यक्षम आणि लोकप्रिय अशी प्रतिमा निर्माण करण्यात नितीन गडकरी यशस्वी ठरले, ते पवार यांना शक्य झाले नाही. शिवसेना फुटते आहे हे अननुभवी उद्धव ठाकरे यांना कळले नसेलही, पण त्याचा अंदाज पवारांनाही आला नव्हता हे मविआचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवार यांचे अपयश नाही का? पहाटेच्या शपथविधीतील सत्य फडणवीसांच्या पुस्तकातून पुढे यायचे आहे. पण अजित पवार तेव्हा ते धाडस करू शकले, हे सत्य तर नाकारता येत नाही. पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत ही त्यांच्याच लोकांनी उठवलेली आवई आहे.
अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी (मुंबई)
पक्षाला मजबूत करणारा ‘मास्टरस्ट्रोक’
‘पाय माझा मोकळा’ हा अग्रलेख (३ मे) वाचला. एक बाब स्पष्ट आहे, की शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे त्यामागे नक्कीच त्यांचे काही राजकीय गणित असणार. पवारांची कारकीर्द पाहता आगामी निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून घेतलेला हा निर्णय केवळ पक्षांतर्गत गळतीच थांबविणार नाही, तर फोडाफोडीही कमी करेल. त्याही पुढे जाऊन त्यांना पक्षावर विनापद वर्चस्व मिळविता येईल. पवारांचा हा ‘मास्टरस्ट्रोक’ नक्कीच त्यांना वैयक्तिक पातळीवर लाभ देणारा आणि पक्षाला मजबूत करणारा असेल.
सत्यसाई पी. एम. गेवराई, जि. बीड
अजित पवार यांना वास्तवाचे भान
शरद पवार यांना पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज ना उद्या घ्यावा लागणारच होता. पक्षातील सर्वोच्च पदावरून आपण बाजूला झाल्यावर अन्य नेते पक्ष कसा चालवतात, हे त्यांना पाहता येईल. सर्व नेत्यांच्या क्षमतेची चाचणी घेता येईल. वेळप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी ते असतीलच. मात्र निर्णय जाहीर होताच, तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून धोषा लावला. काही नेत्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व नेत्यांमध्ये अजित पवारांना वास्तवाचे उत्तम भान असल्याचे दिसले. शरद पवार यांच्या वयाचा विचार करता त्यांचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी ओळखले. सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना समजावले. या प्रसंगामुळे अजित पवार यांच्यातील धीरोदात्त राजकारणी समोर आला.
मनमोहन रो. रोगे, ठाणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप चाचपडत आहे
‘पाय माझा मोकळा..’ हा अग्रलेख (३ मे) वाचला. शरद पवार यांना आता इतर पक्षांची मोट बांधण्यास अधिक वेळ मिळेल. बंडखोरीला चाप लावता येईल. राष्ट्रीय स्तरावर पक्षाची पीछेहाट झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला नाही. शिवाय साखर कारखाने, बाजार समित्यांवरील पकडही पूर्वीएवढी भक्कम राहिलेली नाही. पूर्वी फक्त काँग्रेसशी युती होती आता शिवसेनाही सोबत आहे. निवडणूक काळात जागा वाटपावरून संघर्ष होऊ शकतो. ही तारेवरची कसरत नकोच हाही दृष्टिकोन यामागे असू शकतो. पक्षाच्या स्थापनेला दोन तप उलटले तरीही पक्ष अद्याप चाचपडत आहे.
गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)
इतरांसाठी उत्तम वस्तुपाठ
‘पाय माझा मोकळा..’ हा संपादकीय लेख वाचला. शरद पवारांनी भाकरी फिरविण्याचा निर्णय निश्चितच पूर्ण विचारांती घेतला आहे. कार्यकर्त्यांनी भावनिक लाटेत वाहवत जाणे योग्य नाही. पवार कुटुंबीयांकडून वाढते वय हे कारण सांगितले जाते, ते उचितच! एका विशिष्ट वयानंतर पायउतार होऊन पुढील पिढीकडे सूत्रे सोपवणे आवश्यकच ठरते. त्यामुळे भावी नेते, कार्यकर्ते यांना संधी मिळते, ते तयार होतात. पक्षासाठी ही बाब महत्त्वाची असेल. पवारांच्या निर्णयाने भारतीय राजकारणात एक चांगला पायंडा पडण्याची शक्यता आहे. भारतात व्यक्तिकेंद्रित पक्ष व त्या व्यक्तीच्या मर्जीनुसार चालणारे राजकारण दिसते. वर्षांनुवर्षे एकच व्यक्ती पक्षाचे अध्यक्षपद भूषवत असते. अंतर्गत लोकशाहीच्या नावाखाली ते खपवलेही जाते. बसप (मायावती), राजद (लालू यादव), द्रमुक (करुणानिधी) अशी अनेक उदाहरणे आहेत. पक्षात इतरांना वाव न मिळाल्याने आयाराम- गयाराम संस्कृती वाढते. हे थांबणे गरजेचे आहे. म्हणून पवारांचा निर्णय आश्वासक वाटतो. अर्थात पवारांच्या यापूर्वीच्या धक्क्यांप्रमाणे ही चाणक्यनीती नसावी!
नवनाथ रुख्मनबाई डापके, सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर)
टाटा आणि मूर्तीचे उदाहरणही असेच!
‘पाय माझा मोकळा’ या अग्रलेखात शरद पवार यांच्या राजीनाम्याची औद्योगिक कंपन्यांशी केलेली तुलना आणि रतन टाटा यांचे दिलेले उदाहरण चपखल आहे. सायरस मिस्त्री कंपनीच्या विचारधारेच्या विपरीत काम करू लागल्यावर रतन टाटांनी सक्रिय होऊन पावले उचलली. ‘इन्फोसिस’मध्ये निवृत्त झालेल्या नारायण मूर्ती यांनी सिक्का आर्थिक पातळीवर उत्तम काम करत असूनही इतर बाबी न पटल्याने पुन्हा कंपनीत लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि सिक्का पायउतार झाले. शरद पवार यांचे वय आणि प्रकृती पाहता हा निर्णय त्यांच्यासाठी व्यक्ती म्हणून आवश्यक आहे. भावना आणि कर्तव्य यात गल्लत करता कामा नये.
सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)
पोलिसांचा धाक हवाच, पण..
‘पुण्यात रहमानची मैफल पोलिसांनी थांबविली’ हे वृत्त (लोकसत्ता- २ मे) वाचले. खरे तर ही चांगली बाब आहे. पुणे पोलीस यासाठी अभिनंदनास पात्र ठरतात. संगीतकार ए. आर. रहमान यांनीही चूक लक्षात येताच लगेचच कार्यक्रम आवरता घेतला. तर दुसरीकडे एका राजकीय व्यक्तीच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत पहाटे तीन वाजेपर्यंत ग्राहक एका बारमध्ये असल्याचे दिसत आहेत. बार बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी वाद घातल्याचा दावा केला जात आहे. यातून पोलिसांना जुमानले जात नसल्याचे समजते. वर उल्लेख केलेल्या दोन घटनांपैकी पहिली घटना ही आदर्शवत मानता येईल ज्यात पोलिसांनी आपल्या कर्तव्याचे पालन करत नियमबाह्य वर्तनाला आळा घातला. तर दुसऱ्या घटनेत मात्र अधिकारांचे पालन करणाऱ्यांनाच न जुमानण्याचा प्रकार घडला. असा विरोधाभास थोडय़ाफार फरकाने सर्वत्र दिसू लागल्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका येऊ लागली आहे.
दीपक काशीराम गुंडये, वरळी
पुरोगाम्यांनी दांभिक भूमिका सोडावी
‘हिंदूंनाही दलवाईंची गरज का आहे?’ हा लेख (३ मे) वाचला. मानवी मूल्यांवर आधारलेली राज्यघटना अमलात आल्यानंतर समाजाचे आधुनिकीकरण होईल, हा आशावाद फोल ठरल्यामुळे मुस्लीम समाजात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना झाली. दोन्हीकडील पुरोगामी आणि प्रतिगामी वर्तुळातील मंडळींनी त्याला कसा प्रतिसाद दिला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जमातवादी प्रतिगामी राजकारणाचा अजेंडा सगळीकडे सारखाच असतो. मूलतत्त्ववादी भूमिकांवरच त्यांचे भरण-पोषण होत असल्यामुळे उभयतांना त्यांच्या भूमिका परस्पर पूरक होत्या व आजही आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे तेव्हाही चुकीचे होते व आजही आहे. मुख्य मुद्दा पुरोगाम्यांनी काय केले व आज काय करत आहेत, हा आहे. महाराष्ट्रात नरहर कुरुंदकर, हमिद दलवाईसारख्या बुद्धिवाद्यांचा अपवाद वगळता, फाळणीच्या पाश्र्वभूमीवर समाज मानस दूषित झाले असताना या देशातील पुरोगाम्यांनी हिंदूू कोड बिलाच्या बाबतीत जशी भूमिका घेतली, तशी मुस्लीम सुधारणावादाच्या संदर्भात घेतली नाही. या अनुनयाच्या राजकारणाचा काँग्रेसच्या मतपेढीला फायदा झाला, परंतु मुस्लीम सुधारणा मागे पडून जमातवादाला मोकळे रान मिळाले, तर साहित्यिक वर्तुळात अनुनयालाच पुरोगामीत्व म्हणून मिरविले जाऊ लागले. मंडल राजकारणाने समाज घुसळून निघत आहे, असे दिसताच हिंदू जमातवादाने ९० च्या दशकात घट्टपणे पाय रोवण्यास आरंभ केला. आज देशभरात हिंदूत्ववादीशक्ती बलशाली होत असताना पुरोगामी वर्तुळात नैराश्य आहे. संविधान ही क्रांती होती तर जमातवादी राजकारण ही त्याची प्रतिक्रांती आहे. पुरोगाम्यांच्या दांभिक भूमिकांची ती किंमत असून नजीकच्या काळात हे दांभिकपण सोडले नाही तर या देशातील लोकशाही समोरचे संकट अधिक गडद होत जाईल.
प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे, नांदेड</strong>