‘‘भारत जोडो’ने एककल्लीपणा हटेल?’ हा लालकिल्ला सदरातील महेश सरलष्कर यांचा लेख (१६ जानेवारी) वाचला. या यात्रेत सामील होणाऱ्या गर्दीकडे कोणताही उद्दिष्टपूर्ण कार्यक्रम नाही. मग ही यात्रा नक्की कशासाठी आहे? मोदी सरकारच्या काळात चीनने तीन वेळा मघार घेतली असून पाकिस्तानचा तर आवाजच बंद झाला आहे. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी नेतृत्व आणि प्रौढत्व – इंग्रजीमध्ये ‘मॅच्युरिटी’ म्हणतात, ते राहुल गांधी यांच्यामध्ये आहे का? शिवाय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा या यात्रेतील सहभाग अत्यंत नगण्य आहे. म्हणजे त्यांची अध्यक्षपदी नेमणूक ही केवळ एक औपचारिकता आहे असे जनतेने समजावे का? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दर तीन ते चार वर्षांनी एका नवीन व्यक्तीकडे दिले जाते परंतु सूत्रे मात्र ज्येष्ठ नेत्यांच्या हातात राहतात. हे शहाणपण काँग्रेसला उशिरा सुचले. फक्त भाजपमध्ये घराणेशाही नाही हाच काय तो फरक आहे. कोणत्याही कार्यक्रमाला खास उद्दिष्ट असावे परंतु, काहीही ठोस कार्यक्रम नसताना फक्त गर्दी जमवून यात्रा काढणे यात काय तथ्य आहे याचा काँग्रेसने विचार करायला हवा.-चंद्रशेखर देविदास चांदणे, पुणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षात नवीन प्राण फुंकले; परंतु..
‘‘भारत जोडो’मुळे एककल्लीपणा हटेल?’ या‘लालकिल्ला’ सदरातील लेखाचा (१६ जानेवारी) सूर पटला नाही. काँग्रेसची विचारसरणी एककल्ली नसून तो मध्यममार्गी पक्ष आहे. जसजसा काँग्रेस मूळ पदावर येत आहे तसतसा काँग्रेसला पाठिंबा वाढताना दिसतो याचे कारण या देशातील नागरिक एककल्ली नसून मध्यममार्गी आहेत आणि काँग्रेस ही ‘नस’ बरोबर पकडताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ (३५०० किलोमीटर १५० दिवसांत ) ही ‘भारत जोडो’ पदयात्रा कार्यान्वित करून राहुल गांधी यांनी मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षात प्राण फुंकले आहेत. परंतु या पदयात्रेच्या पुण्याईचे मतपेटीत प्रतिबिंब पाडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व स्तरावरील काँग्रेसजनांना कंबर कसून आणि ‘केडर बेस’ मजबूत करून नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील. तरच याचा लाभ काँग्रेसला २०२३ मध्ये नऊ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळेल. एकूणच या ‘भारत जोडो’ पदयात्रा ते ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानामुळे काँग्रेसचा जनाधार वाढणार हे निश्चितपणे दिसते.-डॉ. विकास इनामदार, पुणे</strong>

नियमभंगाचे गांभीर्य लक्षात आणून द्यावे
‘एकाची चूक; अनेकांना शिक्षा’ हा अन्वयार्थ (१६ जानेवारी) वाचला. अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात, पण समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही. अपघात टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, वाहनचालकांचे नियमित प्रशिक्षण आणि त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. परदेशांत निरनिराळय़ा स्तरांवरील चालकप्रशिक्षणाने अपघातांची संख्या निम्म्यावर आणली आहे. प्रशिक्षण म्हणजे नेमके काय?चालकांचे निरनिराळे स्तर उदाहरणार्थ सायकलस्वार, दुचाकीस्वार, रिक्षाचालक, टेम्पोचालक, टॅक्सीचालक, ट्रकचालक, बसचालक, कंटेनरचालक यांना वाहनचालकाचा परवाना देताना त्यांनी चूक केल्यास किती महागात पडू शकते, याची जाणीव करून दिली जात नाही. अशी जाणीव करून देणारी चित्रफीतही दाखविली जात नाही. परवान्याच्या नूतनीकरणावेळी प्रशिक्षण अनिवार्य करणे गरजेचे आहे. चालकाने नियमभंग केल्यामुळे त्याला दंड झाल्यास तो ऑनलाइन भरताना त्या नियमभंगामुळे कोणत्या स्वरूपाचा अपघात होऊ शकतो, हे दर्शविणारी चित्रफीत चालकाला दाखविल्यास आणि त्यासंदर्भातील चाचणी पुन्हा देण्यास भाग पाडल्यास नियमभंगाची वृत्ती कमी होण्यास हातभार लागू शकतो.सर्व आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी हे प्रशिक्षण घेण्याचे बंधन घातल्यास परिस्थिती सुधारेल. या कामात सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेता येईल. अनेक देशांत चालकाने वेगमर्यादा ओलांडल्यास त्याला २४ तास कारागृहात ठेवले जाते, दंड ठोठावला जातो, शिवाय परवाना एक महिन्यासाठी रद्द केला जातो. अशी यंत्रणा आपण उभारू शकलो, तर अपघातांच्या बातम्या नक्कीच कमी होतील.-प्रभाकर पाटील, नेरुळ (नवी मुंबई)

नियमांची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक
‘एकाची चूक; अनेकांना शिक्षा’ हा अन्वयार्थ वाचला. भारतात वाहनांच्या संख्येच्या तुलनेत अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही दुचाकीच्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. या स्थितीला अनेक घटक कारणीभूत आहेत. एका आपघातामागे बेजबाबदार चालक, निष्कृष्ट रस्ते, गाफील प्रादेशिक परिवहन यंत्रणा, अपुरे प्रशिक्षण, मुदतबाह्य वाहने अशी अनेक कारणे असतात. बहुतेकांना बहुतेक वेळा कुठे तरी पोहोचण्याची घाईच असते. त्यासाठी खासगी आरामदायी वाहनांना प्राधान्य दिले जाते. याचाच फायदा घेत खासगी वाहन चालक- मालक मुदतबाह्य वाहनांतून सेवा देतात. एवढेच नव्हे, तर त्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. हे टाळण्यासाठी शासनाने नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणे, नियमभंग करणाऱ्यांना कठोर शासन करणे, परिवहन यंत्रणेने कोणत्याही दबावाविना काम करणे आणि अन्य देशांतील वाहतूक नियंत्रण आणि नियमनाच्या तंत्रज्ञानातून चांगले ते आत्मसात करणे गरजेचे आहे.-आशुतोष वसंत राजमाने, बाभुळगाव (पंढरपूर)

मांजासंदर्भात राजकीय पक्ष गप्प का?
‘पतंगाच्या मांजाने गळा चिरून दोघांचा मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता, १६ जानेवारी) वाचली. ही बातमी शासनास जाग आणण्यास पुरेशी नाही का? मांजा स्वदेशी असो किंवा परदेशी; प्राणघातक ठरत असेल तर त्याचा वापर थांबवायलाच हवा! याआधी अनेक जीव गेले आहेत, आणखी किती जीव गेले की सरकारला जाग येणार आहे? संवेदनशील, लोकशाही सरकार म्हणवून घेणाऱ्या सरकारने इतके उदासीन राहणे योग्य नव्हे. सर्व फायदे- तोटे बाजूला सारून मांजाबंदी त्वरित लागू करणे लोकहिताचे ठरेल. मांजाबंदीसाठी कोणताही पक्ष आग्रही नाही हे नवलच !-अरिवद करंदीकर, तळेगाव दाभाडे

अमेरिकेने स्वत:ला ‘खास’ समजू नये
‘उदारमतवाद्यांचा अजागळपणा!’ हा अग्रलेख (१६ जानेवारी) वाचला. अमेरिकेच्या राजकारणात असेही काही घडू शकते? संपूर्ण जगाचे राजकारण असो वा अर्थकारण, ते अमेरिकेच्या सत्ताकारणाभोवती खेळते. तिथेही असे काही घडत असेल तर उर्वरित देशांनी काय आदर्श घ्यावा? आपण उगाच आपल्या देशातील राजकारणाला नावे ठेवत बसतो, पण एवढे निश्चित या असल्या प्रकरणांवरून अन्य देशांकडे बोट दाखवताना उरलेली चार बोटे आपल्याकडे आहेत, हे अमेरिकेतील सत्ताधीशांनी विसरू नये, असे वाटते.-डॉ. राजेंद्रकुमार गुजराथी, दोंडाईचा (धुळे)

आदिवासी विकासात विज्ञानाऐवजी हे काय?
नागपूर येथे झालेल्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’त ४ जानेवारीला ‘ट्रायबल काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमात मान्यवरांनी वनौषधी, शेती या विषयावर भाष्य केले, परंतु त्यानंतर झालेल्या चर्चासत्रांत शासकीय अधिकाऱ्याने योजना कशा राबवतात हे सांगितले. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्तीने तिचे अनुभव कथन केले. एका आदिवासी तरुणाने पुण्यात कोचिंग क्लासेस कसे सुरू केले हे सांगितले. स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकाने या परीक्षा कशा द्यायच्या याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतरच्या चर्चासत्रात नागपुरातील आदिवासी संघटनांचे नेते ‘ट्रायबल लिडरशीप स्पीक’ या शीर्षकाखाली एकत्र आले. हे नेते व त्यांची भूमिका नागपूर परिसरात सर्वाना माहिती आहे.संपूर्ण परिषदेत आदिवासी विकासामध्ये विज्ञानाचे स्थान याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. त्यामुळे आयोजकांनी उदात्त हेतूने ‘ट्रायबल काँग्रेस’ आयोजित केली असली तरी हेतू साध्य झाला, असे म्हणता येणार नाही. प्रेक्षक म्हणून नागपुरातील आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना आणून बसावावे लागले, यातच सर्व काही आले.-प्रभू राजगडकर, नागपूर

हसतमुखाने बोलणेसुद्धा ‘समानुभूती’
‘सहानुभूती नव्हे समानुभूती’ हा ‘आरोग्याचे डोही’ सदरातील लेख (१६ जानेवारी) वाचला. पूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना समाजात होती तेव्हा हे समानुभूतीचे उद्दिष्ट अगदी सहजगत्या साध्य होत असे. पण आता मात्र सर्वच शाखांतील विशेषज्ज्ञांचे महत्त्व वाढल्यामुळे डॉक्टर- रुग्ण नाते दुर्मीळ झाले आहे. आपल्याकडे वैद्यकीय साक्षरता फारच कमी असल्याने रुग्णाला भावनिक आधार देण्यासाठी कोणीच नसते. अर्थात डॉक्टरांची संख्या लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून किती अपेक्षा करायची यालाही मर्यादा असतातच. पण तरीही रुग्णाशी हसतमुखाने बोलणेसुद्धा समानुभूतीचे काम करते, हे जर डॉक्टरांनी लक्षात घेतले, तर खूप फरक पडेल.-माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

loksatta@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers opinion lokmanas loksatta readers reaction amy
Show comments