लोकसभेतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केल्याचे वृत्त (लोकसत्ता- २३ सप्टें.) वाचले. घटना अर्थातच संतापजनक. त्याहून चीड आणणारी गोष्ट म्हणजे मागच्या बाकावर बसलेले भाजपाचेच खासदार हर्षवर्धन व रविशंकर प्रसाद (ज्यांनी भाजपच्या २०१४-२०१९ च्या सत्ताकाळात मंत्रीपदे भूषवली आहेत) त्या वेळी हास्यकल्लोळात मशगूल आहेत. रविशंकर प्रसादांचा दिलखुलासपणे हसणारा चेहरा तर कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. निवडणुका जवळ आल्या असून या तिघांचे वर्तन पाशवी बहुमताने चढलेला मद अजूनही ओसरलेला नाही याचेच लक्षण नव्हे का? महत्त्वाचे म्हणजे २०१४ साली संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पायऱ्यांवर माथा टेकवणाऱ्या पंतप्रधानांची यावर प्रतिक्रिया काय? ज्या संसदेला तेव्हा त्यांनी वंदनीय मानले त्याच संसदेची त्यांच्याच पक्षाच्या खासदाराकडून झालेली ही अप्रतिष्ठा नव्हे काय?
श्रीकृष्ण साठे, नाशिक
कारवाईचे धाडस दाखवावे
रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांना जातीवाचक बोलून स्वत: ते व त्यांचा पक्ष, किती मुस्लीमद्वेषी आहे हे पुन्हा सिद्ध केले. भाजप सबका साथ, सबका विकास म्हणत, देशवासीयांना सोबत घेऊन चालण्याचे ढोंग करत आहे यातून परत सिद्ध झाले. सच्चा भारतीय मुसलमान असल्याने या घटनेने मन सुन्न झाले असून एवढा मुस्लीम द्वेष का, या विचाराने घेरले आहे, संबंधित खासदारावर योग्य कारवाई करण्याचे धाडस पक्ष दाखवेल का हेही पाहणे महत्त्वाचे आहे. अशा घटनांमुळेच मुस्लीम समाज भाजप पक्षावर नेहमी संशय करीत आला आहे. रमेश बिधुरी यांना निलंबित करून त्यांना त्यांची ‘जागा’ भाजपने दाखवावी अशी अपेक्षा या वेळी रास्त ठरते.
शेख आयेशा यकीन, अंधारी (ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर)
हेही वाचा >>> लोकमानस : ‘८० सी’ची मर्यादा चार लाख करा
सत्ताधाऱ्यांपुरती उरलेली ही सवलत रद्दच करा
ज्या संसदेच्या सभागृहात वेगवेगळय़ा विचारसरणीच्या दिग्गजांची भाषणे व्हायची पण विरोधी विचारसरणीच्या खासदाराबद्दलदेखील योग्य आदर होता किंबहुना त्यांची आपापसात मैत्री असायची, त्याची जागा आता पक्षापक्षातील द्वेषाने घेतली आहे. हेच उद्गार जर विरोधी पक्षाच्या खासदाराने काढले असते तर तात्काळ त्याचे किमान पुढील सत्रासाठी निलंबन झाले असते. सत्ताधारी पक्षाने या खासदाराकडून मागवलेल्या स्पष्टीकरणाची काय वासलात लागेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. वास्तविक, अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना संसदेत किंवा विधानसभेत त्यांनी केलेल्या कुठल्याही विधानापासून संरक्षणाची सूट जर काढून घेतली तर कामकाजातील संवाद व दर्जात थोडीतरी सुधारणा होण्याची आशा आहे.
शरद फडणवीस, पुणे
यातून संस्कार दिसतात!
अपशब्द, जातीवाचक संबोधने भाजपच्या सदस्याने संसदेत वापरल्याच्या बातमीतून, भाजपचे संस्कार समोर आले. कारण हे सुरू असताना भाजपच्या खासदारांनी अडविले पाहिजे होते, परंतु मुस्लीम द्वेषामुळे त्यांनी तसे केले नसावे.
कुंजबिहारी रावत, भुसावळ
रिच जनप्रतिनिधी, पुअर जनता
‘..मग सरकार काय करते’ हा लेख (अन्यथा- २३ सप्टें.) वाचून रॉबर्ट टी. कियोसकी यांच्या ‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाची आठवण झाली. आपल्या सरकारने जनतेच्या पैशासोबत जो खेळ चालवला आहे, त्यास या पुस्तकातील ‘कॅश फ्लो’ खेळाची उपमा देता येईल. करस्वरूपात जनतेकडून जमवलेल्या पैशांचा वापर स्वत:ची आर्थिक परिस्थिती आणि भविष्य सुधारण्यासाठी हे जनप्रतिनिधी करतात आणि जनतेच्या सुविधेसाठी असणारी सरकारी खाती मात्र कफल्लक होत जातात. ‘जनसेवा’ हा आपला उद्योगच नाही, हे सरकारने पक्के ओळखले आहे (मग ते सरकार कोणाचेही असो). हा ‘कॅश फ्लो’ मग एखाद्या मोठय़ा (मित्र) उद्योजकाकडे वळता होतो. नफावसुली झाल्यावर हेच उद्योग कर-चोरीसाठी आणि फक्त नियम आहे म्हणून सरकारनेच दाखवून दिलेल्या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ पार पाडतात. हे असेच होत राहणार असेल तर मग जनतेने कर सरकारला देण्याऐवजी थेटच आपल्या आवडत्या उद्योजकाला द्यावा आणि त्या बदल्यात उद्योजकाने आपला सीएसआर चालू द्यावा! सरकारने फक्त समन्वयकाची भूमिका करावी. किमान अंधाऱ्या विहिरीत जाणारा ‘कॅश फ्लो’ तरी थांबेल.
निशांत किशनराव भवर, नांदेड</strong>
हेही वाचा >>> लोकमानस : राजकारण लांडग्यांचा खेळ झाला आहे का?
भारतीय सामान्यजन हेच खरे धार्मिक
राजा देसाई लिखित ‘‘भेदाभेद अमंगळ’ हेचि तो अर्थ ‘सनातन’’ हा लेख (रविवार विशेष- २४ सप्टें.) वाचला. सनातन म्हणजे शाश्वत, अविनाशी असे असूनसुद्धा हजारो वर्षांपासून या धर्माने नव्हे तर त्याच्या धर्ममरतडांनी व त्यांच्या दलालांनी केलेले भेदाभेद आजही चालू असल्यामुळे रुढीग्रस्त कर्मठ धार्मिकांसाठी सनातन हा शब्द वापरला गेला. उदयनिधी स्टॅलिन यांचे भाष्य त्या अर्थाने चुकीचे ठरत नाही. मात्र तथाकथित हिंदू धर्माभिमान्यांनी आणि अगदी पंतप्रधानांनीसुद्धा ‘इंडिया’ आघाडीचा हिंदू धर्मावरील हल्ला-सनातन धर्म नष्ट करण्याचा छुपा अजेंडा असा पलटवार करून आम्ही हिंदू धर्माभिमानी आमच्याच धर्माविषयी किती अज्ञानी आहोत हेच दाखवून देते.
लेखकाने उद्घृत केल्याप्रमाणे ‘यतो वा इमानि भूतानि जायन्ते..’ (तैत्तिरीय उपनिषद) – ‘त्या सनातनी चैतन्यातूनच सारे वस्तुजात/प्राणीमात्र जन्मतात, जगतात, विलीन होतात..’ यासारखे बंधुत्व हिंदू धर्माने सांगितले आहे. इतर धर्म तर मानवाचे बंधुत्व सांगतात पण हिंदू धर्म चर-अचरांचेही बंधुत्व सांगतो. असा हिंदू धर्म-सनातनी धर्म नष्ट व्हावा असे का बरे कोणास वाटेल? यातच तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ सामावलेले आहे. मात्र भारतात धर्माधर्मात भेदभाव केल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना झोपच येत नाही. वास्तविक या देशात कोसाकोसावर रीती, रिवाज, रुढी, परंपरा, भाषा, वेश, जात, धर्म बदलत राहतात, तरी सामान्य भारतीय जन सुखेनैव राहात असतात. त्यामुळे असे वाटते की, ‘प्रभाती’ बरळणारे तथाकथित सनातनी आणि किंचाळणारे कट्टर जिहादी हे खरे धार्मिक नव्हेतच. भारतीय सामान्यजन हेच खरे धार्मिक – बाकी सारी राजकारण्यांची पिलावळ.
डॉ राजेंद्र कांकरिया, पुणे