‘आशीर्वाद कसले मागता?’ हा अग्रलेख (१९ जुलै) वाचला. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष व्यवहारवादी म्हणजे राजकारण करणारे आणि वैचारिक बांधिलकी असणे ही राजकीय अटळ गरज म्हणूनच सांभाळणारे आहेत. भाजप हा कधी काळी ‘चारित्र्या’चा टेंभा मिरवणारा पक्ष, पण मोदी-शहांच्या काळात व्यवहारवादी राजकारणालाही विकृत करून सत्तेसाठी ‘साम दाम दंड भेद’ यांचा बिनदिक्कत वापर करत आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या भ्रष्टाचारावर भाष्य केल्यानंतर एक आठवडय़ात तीच मंडळी गंगास्नान केल्यासारखी पवित्र तर झालीच, शिवाय विकासयोद्धेही ठरली.
शरद पवार यांची विश्वासार्हता नेहमीच वादात राहिली आहे, परंतु त्यांचे पुरोगामित्व, प्रसंगी दिल्लीला भिडण्याची हिंमत आणि मोठा जनाधार मात्र वादातीत आहे. महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचे महत्त्व वाढले. उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व आणि सर्वसमावेशक हिंदूत्व जनतेला भावले. अशा परिस्थितीत शिवसेना फोडल्याने जनमानसात शिंदे गटाविरुद्ध मोठा रोष निर्माण झाला. तीच गत अजित पवार गटाची झाली आहे आणि त्यामुळेच त्यांना आशीर्वाद घेणे आवश्यक वाटले असावे. पवार-ठाकरे यांना सोडले म्हणून जनतेत असंतोष आणि मोदींना विरोध केला तर चौकशीचा ससेमिरा, यामुळे ‘धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय’ अशी शिंदे व अजित पवार गटाची अवस्था झाली. तरीही खरे नुकसान भाजपचे होणार आहे, कारण त्यांचे निष्ठावंत नको एवढे दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच बरोबर सत्तेत आले आहेत, हे भाजप समर्थक आणि मतदारांच्या पचनी पडलेले नाही. जनतेच्या पाठिंब्याची शाश्वती नाही. किमान आशीर्वादाचे पुण्य तरी मिळविण्याची ही धडपड आहे.
अॅड. वसंत नलावडे, सातारा
लाटेवर स्वार होण्याची धडपड
‘आशीर्वाद कसले मागता?’ हा अग्रलेख वाचला. राज्याच्या राजकारणाची आजची स्थिती ही अलीकडच्या काळातील सतत बदलणाऱ्या हवामानासारखी झाली आहे. जे सत्तेत आहेत ते विरोधातही आहेत आणि जे विरोधात आहेत ते केव्हा सत्तेत दिसतील, हे सांगता येत नाही. राजकीय नैतिकतेचे भारे घराच्या छतावर ठेवत मोठय़ा पवारांच्या गटातून राष्ट्रवादीच्या एका गटाने काढता पाय घेतला आणि सत्तेची खुर्ची मिळवली. आता विठ्ठलाचे विठ्ठलत्व तर मान्य आहे, परंतु या भक्तीतील बंधने नको आहेत, अशी दुटप्पी भूमिका दिसून येते. अशा वेळी ‘मिल बाट के खाएंगे’ असा समझोता दोघांत झाला नसेल ना, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. शेवटी राजकीय पक्षाचा उद्देशच सत्तासंपादन हा असतो.
सध्या केंद्रीय शक्तीच्या लाटा एवढय़ा बलशाली आहेत, की त्यांच्या माऱ्याच्या विरुद्ध प्रवास करण्याची इतर कोणत्याही पक्षाची तयारी नाही. किंबहुना या लाटेवर स्वार होऊन आपली नौका पैलतीरी लावण्याचा केविलवाणा प्रयत्न मात्र चोहीकडे दिसतो. या लाटेमुळे जनता विकासाच्या किनाऱ्यावर पोहोचल हा धादांत खोटा दावा, जनतेच्या माथी सातत्याने मारला जात आहे. नवल म्हणजे या भाषणबाजीला डोक्यावर घेणारे कार्यकर्ते आपल्याकडे अजूनही सापडतात!
योगेश भानुदास पाटील, मुक्ताईनगर (जळगाव)
मारल्यासारखे आणि रडल्यासारखे
राष्ट्रवादीमधून फुटून सरकारमध्ये सामील होऊन अवघ्या काही दिवसांत अजित पवार आणि मंडळी थोरल्या पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना भेटायला जातात आणि थोरले पवारही त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा करतात, हे चमत्कारिक आहे. थोरल्या पवारांनीच अजित पवारांना चर्चेसाठी बोलावले नसेल ना?
सुरुवातीला आक्रमक असणारे थोरले पवार नंतर एकदम शांत का झाले? पहिले दोन-तीन दिवस प्रचंड टीका करणारे अजित पवार आणि मंडळीही नंतर शांत झाल्याचे दिसले. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरत असू शकते. तुम्ही मारल्यासारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो असेच काही तरी! तिकडे दक्षिणेत विरोधकांच्या बैठकीला थोरल्या पवारांनी पहिल्या दिवशी दांडी मारली होती, हेही या ठिकाणी उल्लेखनीय. देशाच्या विकासासाठी मोदींना मदत करण्याची सध्या जी अहमहमिका लागली आहे त्याकडे पाहणे एवढेच आता आपल्या हाती आहे.
डॉ. संजय पालीमकर, दहिसर (मुंबई)
ज्यांची एकजूट त्यांचेच पारडे जड
२०१४ व २०१९मध्ये लोकसभा निवडणुकांत निर्विवाद बहुमताचा आकडा गाठल्यानंतर भाजपने मित्रपक्षांना खिजगणतीत न धरण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे काही मित्र पक्ष दुरावले. पण नंतर बंगाल व कर्नाटक या राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजपला मित्रपक्षांची आठवण आली असणार. म्हणून त्यांना परत चुचकारले जात असावे. साहजिकच तशा स्वरूपाच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. नुकतीच दिल्लीत झालेली बैठक ही त्याचीच झलक. तर विरोधी पक्षाने बंगळूरुतील बैठकीत ‘इंडिया’ असे नाव धारण करून नव्याने विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे ठरवले आहे. पण परस्परविरोधी विचारधारा असलेल्या पक्षांची सरमिसळ असलेला हा समूह प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होईपर्यंत कितपत तग धरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकूणच काय येत्या काळात जो गट एकजूट टिकवून ठेवण्यात यशस्वी होईल त्याचेच पारडे २०२४च्या निवडणुकांत जड असणार आहे.
दीपक काशिराम गुंडये, वरळी (मुंबई)
हे ‘मित्रप्रेम’ कितपत खरे?
रालोआच्या बैठकीत मोदींनी ‘जुन्या’ मित्रांचे अभिनंदन व नव्या मित्रांचे स्वागत केले. मुळात शिवसेना ‘जुनी’ होण्याची व शिरोमणी अकाली दलाचे मैत्र गमावण्याची वेळ का आली? कर्नाटकातील मानहानीकारक पराभवानंतर आता या वर्षअखेर काही राज्यांच्या व पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे ‘मदांधते’ला थोडा ‘ब्रेक’ लावण्याची गरज भाजपला भासू लागली आहे का? पण या ‘जुन्या’ व ‘नव्या’ मित्रांना हे प्रेम कितपत खरे हे कळत नसेल? सत्तातुर एकत्र आल्यावर वेगळे काय होणार म्हणा?
पंतप्रधान बैठकीत असेही म्हणाले की, घराणेशही, भ्रष्टाचार व घोटाळेबाजांच्या आघाडीमुळे देशाचे नुकसान होते. कथित भ्रष्टाचाराचे आरोप करत ज्यांच्या घरांवर, कार्यालयांवर, कारखान्यांवर धाडी टाकल्या गेल्या त्यांनाच पक्षात, सरकारमध्ये, आघाडीत पावन करून घेऊन देशाचा कसा काय फायदा किंवा उद्धार होतो, हे देशवासीयांना समजावून सांगण्याची जबाबदारी आता पंतप्रधानांचीच आहे. अर्थात त्यावर सुपरिचित मौन राखले जाण्याची शक्यताच अधिक! मग त्याला दुटप्पीपणापेक्षा अधिक सार्थ नाव काय?
श्रीकृष्ण साठे, नाशिक
अभ्यासक्रमानुरूप कामे दिली जावीत
‘‘‘कमवा व शिका’तून नेमके काय मिळते?’’ हा लेख (१९ जुलै ) वाचला. मुळात ही योजना स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी मांडलेल्या मूलभूत शिक्षण योजनेचे पुढील रूप आहे. तत्कालीन परिस्थिती पाहता ब्रिटिश सरकारकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी निधी नव्हता, तो अल्प प्रमाणात असला तरी खर्च करण्याची त्यांची मानसिकता नव्हती. यावर तोडगा म्हणून महात्मा गांधींनी ही नवीन संकल्पना प्रस्तुत केली होती. ज्यानुसार विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच विविध वस्तूंची निर्मिती करून, विभिन्न प्रकारची कामे करून स्वत: कमवतील व आपले शिक्षण पूर्ण करतील. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य होते ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’. त्यांच्या संस्थेतही असे उपक्रम राबवले जात.
लेखात म्हटल्याप्रमाणे आज विद्यार्थ्यांना जी कामे दिली जातात, ती त्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमांशी संबंधित असल्याचे दिसत नाही. यातून त्या विद्यार्थ्यांत अपेक्षित कौशल्ये किंवा त्या विषयाचा दृष्टिकोन विकसित होत नाहीत. अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांला शहरात किंवा गावात विविध सर्वेक्षणे करायला लावणे, दारिद्रय़ाचे प्रमाण किती हे ठरवण्याची संधी देणे, बँकांमध्ये अंध, अपंगांना पैसे काढणे व भरण्यास मदत करण्याचे काम अशा जबाबदाऱ्या देता येतील.उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी किंवा अभ्यासक्रमानुरूप कामे दिली गेली, तरच या योजनेचा उद्देश साध्य होईल.
नवनाथ रुख्मनबाई डापके, सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर)
सोमय्या बळीचा बकरा तर नाहीत?
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या मुहूर्तावर हा व्हिडीओ का पुढे यावा, हे गूढ आहे. एकीकडे भाजप पक्ष आणि आमदार फोडण्यात गुंतला असताना दुसरीकडे किरीट सोमय्या ठाकरे गटाच्या मागे हात धुऊन लागले होते. शेतकरी, कष्टकरी जनता भाजपच्या या कुटिल नीतीला कंटाळली आहे. त्यामुळे राज्यात भाजपची नाचक्की होत आहे. त्याला कुठे तरी बगल देता यावी आणि लक्ष अन्यत्र वळवता यावे, यासाठी हा व्हिडीओ व्हायरल केला गेला नसेल ना? सोमय्या बळीचा बकरा तर ठरलेले नाहीत ना, अशी शंका येते.
दत्ता श्रावण खंदारे, धारावी