‘चराति चरतो भग:’ हे संपादकीय (८ सप्टेंबर) वाचले. आशा-निराशेच्या हिंदूोळय़ावर राजकारण चालत नाही. राजकारण व्यवहारशुद्ध व्यावहारिक नियमांच्या गरजेवर चालते. त्यामुळे उशिरा का होईना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू होत असलेली ‘भारत जोडो’ यात्रा लोकशाहीच्या रक्षणाकरिता अत्यंत आवश्यक आहे. सध्याचे वातावरण लोकशाहीला फारसे अनुकूल नाही. कारण सत्ताधारी पक्षाचा अध्यक्षच विरोधी पक्षाचे समूळ उच्चाटन करायला निघालेला असताना, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स इत्यादी नियामक संस्थांद्वारे निवडकपणे राजकीय विरोधकांची कोंडी केली जात असताना, देशद्रोही, खलिस्तानी, शहरी नक्षलवादी असे शिक्के मारून राजकीय विरोधकांचा आवाज दाबून टाकला जात असताना, माध्यमांना आपले बाहुले बनवून सत्य दडविले जात आहे, लोकशाही संस्था ताब्यात घेऊन तिचा स्वार्थासाठी वापर करून घेतला जात आहे, अशा स्थितीत देशातील राजकीय संघटनांना सोबत घेऊन, जनतेत जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस करीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.

प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे, नांदेड

काँग्रेसमध्ये चुका मान्य करण्याची परंपरा आहे

‘चराति चरतो भग:’ हा अग्रलेख वाचला. राहुल गांधी यांच्यावर जी वेळ आली आहे त्यास केवळ तेच जबाबदार आहेत, याचे भान या पदयात्रेमागे असेलच, हे अग्रलेखातील वाक्य वाचले.  या संदर्भात नमूद करावेसे वाटते की, आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी दिलगिरी व्यक्त केली होती, तसेच ऑपरेशन ब्लू स्टारबद्दल मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनीही माफी मागितली होती. नेहरूंच्या बाबतीत बोलायचे तर चूक झाली तर त्यांच्या खास शैलीत ते म्हणायचे, ‘हिमालयाएवढी चूक झाली.’ थोडक्यात काँग्रेसमध्ये चुका मान्य करण्याची परंपरा आहे.                                             

जयश्री कारखानीस, तळेगाव दाभाडे

पदयात्रेतून काहीही साध्य होणार नाही

‘चराति चरतो भग:’ हा राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा ठिसूळपणा मांडणारा अग्रलेख वाचला. काँग्रेस पक्षाला २०१४च्या पराभवानंतरच घरघर लागली होती पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यावर उपाययोजना न करता राहुल गांधी यांना अध्यक्ष करून पक्षाला तरुण (?) नेतृत्व दिले, पण त्यांच्या बेजबाबदारपणामुळे काँग्रेसला २०१९मध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदही मिळविता आले नाही. त्याची जबाबदारी घेत त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आजपर्यंत काँग्रेसला स्थायी अध्यक्ष मिळालेलाच नाही.

जनता हे उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहे. विरोधी पक्ष हा खंबीर असावा लागतो, त्याला देशातील जनतेची नाळ सापडणे आवश्यक असते, पण दुर्दैवाने राहुल गांधी यांना ना भारत कळला ना इंडिया. आज ते कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा करत आहेत, त्याचे स्वागतच आहे पण त्यातून ते काही भरीव धडा घेतील वा पक्षाला त्यांची काही मदत होईल असे वाटत नाही.

माया हेमंत भाटकर, चारकोप (मुंबई)

चरातिनव्हे, ‘चरति’!

‘चराति चरतो भग:!’ हे अग्रलेखाचे संस्कृतप्रचुर शीर्षक ऐतरेय ब्राह्मण ग्रंथाच्या ३३ व्या अध्यायातील असून ते अतिशय बोधप्रद असे आहे. पण ‘चराति’ ऐवजी ‘चरति’ असे समजण्यात यावे. कारण ‘चरति’ हे धातुरूप संस्कृत व्याकरणानुसार र्च (चालणे) या लट् लकारातील (वर्तमान कालवाचक) प्रथम पुरुषी एकवचनी आहे. ज्याचा अर्थ ‘चालत राहावे!’ किंवा ‘गतिशील असावे’, असा होतो. वरील मूळ ग्रंथात एक प्रसंग येतो. रोहित नावाचा विद्यार्थी आपल्या आचार्याकडे जातो आणि जीवनात सफल होण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी इच्छा व्यक्त करतो. तेव्हा आचार्य त्यास ‘चरैवेति चरैवेति !’ म्हणजेच चालत राहावे, चालत राहावे..!, असा उपदेश देतात. यातील चार श्लोकांपैकी अग्रलेखाच्या शीर्षकाचा मूळ श्लोक खालील प्रमाणे आहे-

आस्ते भग आसीनस्य, ऊर्ध्व तिष्ठति तिष्ठत:।

शेते निपद्यमानस्य, चरति चरतो भग: ।।

म्हणजेच जो एके ठिकाणी बसून राहतो, अशा कर्महीनाचे भाग्यही बसते. जो उभा ठाकतो, अशा कार्यारंभ करणाऱ्याचे भाग्य उभे राहते, जो झोपलेला आहे, त्याचे भाग्यही झोपते आणि जो चालत राहतो, अशा गतिशील माणसाचे भाग्यदेखील चरति म्हणजेच चालत राहते.

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य, परळी वैजनाथ (बीड)

बुडीत कर्जाला सगळे राजकीय पक्ष जबाबदार

भाजप सरकारने २०१५ साली ‘मुद्रा कर्ज’ योजना सुरू केली, भाजपला वाटले की सगळे प्रामाणिकपणे कर्ज फेडतील. पण तसे कधीच होत नाही कारण अनेक व्यवसाय, उद्योग यशस्वी होत नाहीत तर काही कर्जदार लबाड असतात, ते मुद्दाम कर्ज फेडत नाहीत.

नवीन सरकार नवीन नावाने कर्ज योजना आणते. आपल्या देशात सरकारी योजनेत कर्ज देतानाच ते ‘सब प्राइम’ समूहातील लोकांना दिले जाते, कारण योजनेचा हेतू तोच असतो. ही कर्जे बुडणार हे कर्जे देतानाच ठाऊक असते पण सरकारी आदेश असल्याने, पंतप्रधान, अर्थमंत्री, पक्षाचे नेते यांना खूश ठेवण्यासाठी बँकांचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे दिले जातात आणि बँकांच्या बुडीत कर्जात वाढ होते. असल्या बुडीत कर्जाला सगळे राजकीय पक्ष जबाबदार आहेत, कारण कर्ज माफ करण्याची स्पर्धा, फुकट वीज, पाणी, अन्नधान्य देण्याची आश्वासने सर्वच पक्ष देतात.

सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई)

बेरोजगारीवर गांधीविचारांचे उत्तर

भारत हा आजही खेडय़ांचा देश आहे. खेडय़ांच्या गरजा खेडय़ांतच पूर्ण व्हाव्यात हा गांधीजींचा दृष्टिकोन होता. केंद्रीभूत व्यवस्थेत आणि यांत्रिकीकरणाच्या युगात देशामधले कुटिरोद्योग जर मागे पडले तर कोटय़वधी लोकांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. खेडय़ात राहणाऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ येईल, हे गांधीजींनी त्या काळी जाणले. ते स्वत: आपल्या आश्रमामध्ये अनुयायांकडून सुतारकाम, लोहारकाम, विणकाम, चांभारकाम करून घेत. आज खेडय़ातील लोकांना पोट भरण्यासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते.

आजच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर शोधताना गांधीविचारांचा अभ्यास व्हायला हवा. गांधीजींचा ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर होता. गावांना आत्मनिर्भर करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी तयार केलेल्या वाटेवर चालण्याची गरज आहे.

– अमोल आढळकर, डिग्रसवाणी (हिंगोली)