‘अदृश्य चलनाचे दृश्य वलन’ या अग्रलेखाने (१ डिसेंबर) डिजिटल रुपयाबाबत अनेक मूलभूत प्रश्न पुढे आणले आहेत. सर्वसाधारणपणे चलनातील नोटा या ‘कागज का टुकडा’ नसतात. कारण त्यावर ‘मैं धारक को..’ हे रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांचे वचन असते. जी रक्कम कागदी नोटा वा नाणी या स्वरूपात नसून बँकेत खात्यात जमा केलेली असते ती डिजिटल स्वरूपात असली तरी अप्रत्यक्षपणे ‘तेच’ वचन एक प्रकारे त्याला लागू असते. कारण (बँक न बुडल्यास!) ती रक्कम नोटांच्या स्वरूपातही काढता येते. कूटचलनाच्या बाबतीत त्याचे मूल्य कसे ठरते, त्यात हे वचन कोणी दिलेले असते, ते न पाळल्यास कोणाकडे दाद मागायची, हे मुद्दे कळीचे असतात. ‘तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कूटचलनाच्या वापरकर्त्यांनीच एकमेकांना दिलेले ते वचन असते’ असे मानले तर ते तंत्रज्ञान तरी नक्की कोणी निर्माण केले आणि कसे काम करते हे कोणाही वापरकर्त्यांला माहीत नसते. शेअरबाजार कसा चालतो हे माहीत नसूनही लोक त्यात गुंतवणूक करतात, काही पैसेही कमावतात व बरेचसे हात पोळून घेतात. तसेच काहीसे कूटचलनाचे असते असे वाटते. सहकारी बँका ना धड सरकारी असतात, ना धड खासगी. त्याचे परिणाम काय होतात हे अनेकदा दिसतेच. डिजिटल रुपया हे ना धड कूटचलन आणि ना धड सरकारमान्य नेहमीचाच परिचित रुपया असे होऊ नये. त्याच्या बाबतीत ‘मैं धारक को..’ हे वचन ‘कोणी दिले आहे’, किंवा ‘कोणी दिले आहे का’ हे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी सामान्य लोकांना समजेल अशा प्रकारे स्पष्ट करावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा