अतुल सुलाखे  

‘आपल्यापाशी जे आहे ते समाजासाठी आहे हा विचार पसरेल तेव्हा सर्वाच्या बुद्धीचा लाभ देशाला होईल.’

– विनोबा

ट्रस्टीशिप म्हणजे ‘विश्वास शक्ती’. या शक्तीशिवाय साम्ययोगाची स्थापना होऊ शकणार नाही, इतक्या स्पष्टपणे विनोबांनी ट्रस्टीशिप आणि साम्ययोग यांचे नाते सांगितले आहे. समाजाच्या सर्व घटकांमधे परस्पर विश्वास हवा. ‘ट्रस्ट’ साठी संस्कृत शब्द आहे ‘विश्वास’. ट्रस्टीशिप म्हणजे विश्वस्त-वृत्ती.

आपली सारी शक्ती समाजाला समर्पित करून आपल्या आवश्यकतेपुरतेच समाजाकडून घेणे म्हणजेच साम्ययोग. साम्ययोगाचे गीतेप्रमाणेच गांधीजींशी किती जवळचे नाते आहे ते विनोबांच्या अशा प्रकारच्या चिंतनातून दिसते.

गांधीजींच्या चिंतनाला विनोबांनी आध्यात्मिक बैठक दिली, असे म्हणताना विश्वस्त-वृत्तीचा आणि गीतेचा मेळ घालता येतो. गीता प्रवचनांच्या तेराव्या अध्यायातील विनोबांचे विवेचन या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

‘आत्मशक्र्ते भानात्’ या साम्यसूत्राच्या अनुषंगाने त्यांनी ‘विश्वस्त शक्तिमाश्वस्त:’ ही वृत्ती सांगितली आहे. या वृत्तीमधे विश्वस्त शक्तीचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.

विश्वस्त शक्तीशिवाय ही सृष्टी टिकणे अशक्य आहे हे विनोबांनी अत्यंत समर्पक शब्दांत मांडले आहे. यासाठी ते झोपेचे उदाहरण घेतात.

‘मी कोणत्या तरी शक्तीवर विश्वास ठेवून निजतो. ज्या शक्तीवर विसंबून वाघ, गाई इत्यादी सर्व निजतात त्याच शक्तीवर विसंबून मीही झोपतो. वाघालासुद्धा झोप येते. सर्व जगाशी ज्याने वैर बांधले व हरघडी जो पाठीमागे बघतो असा सिंहही झोपतो. त्या शक्तीवर विश्वास नसता तर काही सिंहांनी निजावे, काहींनी जागे राहून पहारा करावा, अशी व्यवस्था त्यांना करावी लागली असती. ज्या शक्तीवर विश्वास ठेवून क्रूर असे वृक, व्याघ्र, सिंहही झोपतात, त्याच विश्वव्यापक शक्तीच्या मांडीवर मीही निजलेला आहे. आईच्या अंगावर बालक सुखाने झोपतो. तो बालक त्या वेळेस जणू दुनियेचा बादशहा असतो. या विश्वंभरमातेच्या अंगावर तुम्ही- आम्हीही असेच प्रेमपूर्वक, विश्वासपूर्वक आणि ज्ञानपूर्वक निजण्यास शिकले पाहिजे. जिच्या आधारावर माझे हे सारे जीवन आहे, त्या शक्तीचा मला अधिकाधिक परिचय करून घेतला पाहिजे. ती शक्ती उत्तरोत्तर मला प्रतीत झाली पाहिजे. या शक्तीबद्दल मला जितकी खात्री पटेल, तितके माझे रक्षण अधिक होईल. जसजसा या शक्तीचा अनुभव येईल तसतसा विकास होईल.’

गांधीजींची विश्वस्त वृत्ती, विनोबांची विश्वस्त शक्ती आणि गीता असा हा मेळ अत्यंत मनोज्ञ आहे. विश्वासाशिवाय सृष्टी टिकणार नाही असे विनोबा सांगतात, तेव्हा सृष्टी जंगली कायद्यानुसार चालते या कुतर्काला आपोआप उत्तर मिळते. परस्पर विश्वासाचे हे तत्त्व माणसाला समजेल तेव्हा जगणे सुंदर होईल. या अनुषंगाने विनोबांनी एक विचार मांडला आहे.

‘सृष्टीची पूजा झाली आहे माझा नमस्कार तेवढा उरला आहे.’ थोडक्यात विश्वास, ज्ञान आणि प्रेम ही वृत्ती बाणवून सृष्टीची सेवा हा विश्वस्त वृत्तीला विनोबांनी दिलेला आयाम जगण्याचे तत्त्वज्ञान सांगतो.

jayjagat24@gmail.com