अतुल सुलाखे

सर्वोदयात, वर्णाश्रम व्यवस्था, ट्रस्टीशिप आणि विकेंद्रीकरण या तिन्ही संकल्पनांना महत्त्वाचे स्थान आहे. यातील पहिल्या दोन संकल्पना जवळपास बाद ठरल्यासारख्या आहे. पहिली मागास आणि विषमता जोपासणारी, दुसरी अव्यवहार्य आणि तिसरी इथल्या परिस्थितीसाठी संपूर्ण नवी असे चित्र दिसते. शब्दांपेक्षाही विचार महत्त्वाचा असतो. तो स्वीकारायचा की नाही हे ठरवण्यापूर्वी किमान तो समजून घेणे हे समंजसपणाचे लक्षण आहे.

या अनुषंगाने विनोबांचे विकेंद्रीकरणाचे चिंतन पाहायला हवे. त्यांच्या मते, हा विचार केवळ उद्योगांपुरता सीमित नाही. विकेंद्रीकरणाची प्रक्रिया राज्य सत्तेलाही लागू होते. अहिंसक समाजरचनेची घोषणा करणारे विचारकही ही गोष्ट विसरतात. परिणामी, औद्योगिक विकेंद्रीकरण होते आणि त्याच्या बचावासाठी मजबूत केंद्रीय सत्ता आकाराला येते. तिचे समर्थक म्हणतात, ही तात्पुरती सोय आहे. एकदा समाजातील दुर्बल वर्गाचा समग्र विकास होऊ लागला की हे सत्तेचे केंद्रीकरण क्रमश: कमी होईल. अंतिमत: ही केंद्रित सत्ता नष्ट होईल. त्यानंतर वर्गहीन समाज आकाराला येईल, असा बचाव असतो.

ही विचारसरणी अगदी जुनी असून भारतीय परंपरेमध्येही या विचाराला कळीचे स्थान आहे.

न राज्यं न च राजासीत्

न दाण्डय़ो न च दाण्डिक: ।

धर्मेणव प्रजा: सर्वा:

रक्षन्ति स्म परस्परम् ॥

महाभारतामध्ये भीष्मांच्या तोंडी परंपरेने, हे आदर्श समाज-वर्णन घातले आहे. अनेक मातब्बर विचारकांनी या रीतीने विचार केल्याचे ध्यानी येते. सर्वोदयाने, पर्यायाने, गांधीजींनी मात्र सार्वकालिक आणि समग्र विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला.

गांधीजींच्या या आग्रहाला व्यवहारी म्हणवणाऱ्यांनी नेहमीच हरकत घेतली. हा विकेंद्रीकरणाचा विचार सर्वोदयाचे अंतिम ध्येय असू देत, पण आता राज्यसत्तेचे केंद्रीकरण झाले पाहिजे ही भूमिका सातत्याने घेतली गेली आणि जाते. चांगल्या हेतूसाठी सत्तेचे केंद्रीकरण, संपूर्ण समाजाच्या विकासासाठी एका वर्गाने समस्यांना सामोरे जावे असे युक्तिवाद सतत होतात आणि होत राहतील. अशा युक्तिवादांची झाडाझडती घेण्याऐवजी शास्त्रीय भूमिकेला अव्यवहार्य ठरवून ती चेष्टेच्या पातळीवर नेली जाते.

विकेंद्रीकरणाच्या अनुषंगाने विनोबांनी रचलेल्या साम्यसूत्रातील तीन सूत्रे आहेत. श्रमाचे महत्त्व सांगणारे ‘श्रम-संजात- वारिणा।’ अंतिमत: शासनमुक्त समाजाचा निर्देश करणारे ‘तत: शासनमुक्ति:।’ आणि सगळय़ाचा पाया म्हणावे असे ‘अभिधेयं परम साम्यम्।’ हे सूत्र. लोकशक्ती, ग्रामदान, ग्रामस्वराज या संकल्पनांची आणि तदनुषंगिक प्रयोगांची वाटचाल विकेंद्रीकरण आणि अंतिमत: शासनमुक्ती अशी दिसते.

विनोबांचे विकेंद्रीकरणावरील चिंतन किमान ७० वर्षे जुने आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रयोगाचीही जोड आहे. विनोबा एक दिवस गांधीजींना म्हणाले, ‘मी सर्व संस्थांची पदे सोडू इच्छितो. तथापि, त्यांचे काम करत राहीन.’ गांधीजींनी हसत संमती दिली आणि सांगितले की, ‘यामध्ये अहिंसेची खरी कसोटी आहे.’ सत्ताविहीन सेवेचे हे उत्तम उदाहरण आहे आणि विकेंद्रीकरणामागे असणारा सखोल विचार यात पाहता येतो.

jayjagat24@gmail.com

Story img Loader