अतुल सुलाखे

केवळ निर्दोष एका परमेश्वराशिवाय कोणीही नाही; पण तसेच या जगात दोषपूर्ण असेही काही नाही, ही गोष्ट महाभारत स्पष्टपणे सांगते..

(गीता प्रवचने अध्याय १)

आत्मविषयक अज्ञान हे प्राथमिक अज्ञान. आपल्या ठिकाणी हे अज्ञान आहे याची जाणीव नसणे म्हणजे ‘अज्ञानाचे अज्ञान’ किंवा गणिताच्या भाषेत ‘अज्ञानवर्ग’. आपण या अज्ञानवर्गात सामील आहोत, या गोष्टीचा स्वीकार न करणे म्हणजे ‘अज्ञानघन’. यालाच ‘विद्वत्ता’ म्हणतात.

– विनोबा (विचार क्र. २२, विचारपोथी)

विनोबांच्या गीतार्थाबद्दल आणि त्यांच्या क्रांतदर्शी विद्वत्तेविषयी सहसा दुमत नसते. भूदान यज्ञ आणि सर्वोदयाचा विकास यावर मुख्य आक्षेप असतात. हे आक्षेप आणि विनोबांचे विचार एकत्रितपणे पाहिले तर काय चित्र दिसते?

साम्ययोगाच्या अर्थनीतीप्रमाणेच समाजनीती आणि राजनीती यावर विनोबा लिहितात, ‘याच प्रकारे राजकीय क्षेत्रातही आपली मूल्ये बदलत जातील. आम्हाला केवळ शोषणरहितच नव्हे तर शासनमुक्त समाजरचना हवी आहे. साम्ययोगाच्या कल्पनेनुसार शासन खेडय़ा-खेडय़ांत वाटले जाईल. मुख्य केंद्रात नाममात्र सत्ता राहील.’ याप्रमाणे शासनमुक्त समाज आकारास येईल.

सामाजिक क्षेत्रातही जातिभेद किंवा उच्च-नीच भेद राहणार नाही. केवळ तथाकथित उच्चवर्णीय कुटुंबात जन्मल्यामुळे कोणीही स्वत:ला इतरांपेक्षा उच्च समजण्याचे कारण नाही. तसेच इतर निम्न मानल्या गेलेल्या जातींतील लोकांनाही तुच्छ लेखण्याचे कारण नाही. त्यांच्यावाचूनही समाजाचे काम होऊ शकत नाही. विनोबांची ही भूमिका नेहमीप्रमाणे अतिआदर्शवादी ठरवली जाते. तथापि, या आदर्शाच्या दिशेने जाण्याची त्यांची योजना काय होती, याचा नकळत विसर पडतो.

समाजातील साधनसंपत्तीचे समान वाटप व्हावे, ही विनोबांची इच्छा होती. तथापि, त्यांनी ही जबाबदारी सर्वप्रथम राज्यसंस्थेवर सोपवली. केवळ सरकारच्या भरवशावर राहता येत नाही म्हणून त्यांनी भूदान-यज्ञाचा मार्ग चोखाळला. संकल्प मोठा होता आणि कृती शिस्तबद्ध होती. एरवी त्यांनी ‘दानपत्रे’ भरून घेतली नसती. भारतात भूदान यज्ञाच्या तोडीचे दुसरे आंदोलन झाले नाही, हे लक्षात घेतले की त्याच्या यशापयशाची चर्चा करताना मोठीच जबाबदारी येते.

शासनाविषयी त्यांची भूमिका अशीच व्यवहार आणि मिलाफ साधणारी होती. शासनमुक्त समाज निर्माण करायचा आहे हे खरेच. तथापि, भारतात आता लोकनियुक्त सरकार आहे. ते पसंत नसेल तर जनतेचे मत आपल्या बाजूला वळवा. निवडणूक लढवा आणि सत्तेत येत आपले प्रश्न धसास लावा ही त्यांची भूमिका होती. तत्त्वत: ते या गोष्टींच्या विरोधात होते, पण त्यांना आपद्धर्माचा विसर पडला नव्हता. सत्य आणि अहिंसेची कास सोडून उभी राहणारी कोणतीही गोष्ट त्यांना मान्य झाली नसती. क्रांतिकारी समाजकारणाची कास त्यांनी आरंभापासून धरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कामाविषयी कुतूहल वाटले यातच सर्वकाही आले.

कोणतीही गोष्ट भरकटू द्यायची नाही हे विनोबांचे तत्त्व त्यांच्या नित्याच्या व्यवहारात होते. व्यापक परिवर्तनाच्या कार्यात त्यांना या तत्त्वाचा विसर पडला असेल असे मानणे फार धाडसाचे ठरेल. मग तथाकथित विद्वान काहीही म्हणोत. jayjagat24@gmail.com

Story img Loader