इंडिया म्हणावे की भारत म्हणावे, असे प्रश्न देशाला अंधारयुगात नेणारे आहेत..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संविधानाच्या मसुद्यावर १७ सप्टेंबर १९४९ रोजी चर्चा सुरू झाली. या चर्चेचा विषय होता संघराज्याच्या नावाबाबतचा. या मसुद्यातील पहिले कलम होते: ‘इंडिया दॅट इज भारत’ हे संघराज्य आहे. ‘इंडिया’ हे नाव असण्याबाबत संविधान सभेतील काही सदस्यांना आक्षेप होता. हे नाव वासाहतिक इतिहासातून आले आहे आणि तो इतिहास पुसून टाकला पाहिजे, असे त्यांचे मत होते. त्याऐवजी ‘भारत’, ‘भारतवर्ष’, ‘हिंदुस्तान’ अशी नावे सुचवली गेली.

एच. व्ही. कामथ यांनी पहिल्याच कलमामध्ये ‘भारत ज्याचे इंग्रजी नाव इंडिया आहे’ अशी शब्दरचना असावी, अशी दुरुस्ती पटलावर ठेवली. कामथांच्या मते, नव्याने जन्मलेल्या बाळाचा जसा नामकरण विधी असतो तसाच उत्सव देशाच्या नामकरण विधीचा व्हावा. सेठ गोिवद दास यांनाही ‘इंडिया’ हे नाव विशेष पसंत नव्हते. ते म्हणाले की, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत आपण स्वातंत्र्यलढा लढलो आहोत तेव्हा भारतच म्हणावे, ‘इंडिया’ हा शब्द नको. कामथांना पािठबा देताना कमलापती त्रिपाठी यांनी भारताच्या गौरवशाली इतिहासाविषयी अभिनिवेशपूर्ण भाषण केले. ते ऐकून एकाच वाक्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘हे सारे जरुरीचे आहे काय?’ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान सभेतील अनेक सदस्य ‘ इंडिया दॅट इज भारत’ ही वाक्यरचना असण्याबाबत आग्रही राहिले.

ब्रिटिशांनी ‘इंडिया’ शब्दाचा वापर सुरू केला, हे अगदीच खरे. त्याच्या व्युत्पत्तीविषयी अनेक मतमतांतरे आहेत. त्याचा एक संदर्भ हा सिंधू संस्कृतीशी आहे. सिंधू या नदीला इंग्रजीमध्ये ‘इंडस’ असे म्हटले गेले. सिंधूच्या

काठांवरचा प्रदेश या अर्थाने ‘इंडिया’ हा शब्द वापरला गेला. भारताच्या ऐतिहासिक घडणीत सिंधू संस्कृतीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळेच इंडिया या नावातही भौगोलिक अर्थाने संदर्भ आलेला असला तरी एकुणात

सिंधू संस्कृतीने सभ्यतेच्या प्रवासाला वळण दिले आहे.

भारत या शब्दाचे मूळही एक नाही. त्याला प्राचीन इतिहास आहे. विष्णू पुराणामध्ये भारताचा संदर्भ येतो तो ‘महासागराच्या उत्तरेला आणि बर्फाळ पर्वतांच्या दक्षिणेला असलेला प्रदेश’ अशा भौगोलिक स्थानाच्या अनुषंगाने. हा भौगोलिक प्रदेश जांबुद्वीपाचा भाग आहे, असे मानले जात होते.

महाभारतामध्ये शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र राजा भरत यांचा उल्लेख आहे. राजा भरत यांचे कार्य आणि त्यानंतरच्या युद्धाविषयीही बऱ्याच आख्यायिका आहेत. आणखी एक संदर्भ आहे तो जैन धर्मातील. जैन धर्मातील पहिले र्तीथकर ऋषभदेव यांचे थोरले पुत्र भरत चक्रवर्ती यांच्या नावातूनही भारत शब्द घडला असावा, अशी मांडणी केली जाते.

मुळात वासाहतिक संदर्भातले नाव स्वीकारावे की एका विशिष्ट ऐतिहासिक घुसळणीतून आलेले नाव स्वीकारावे, हा मोठा प्रश्न होता. संविधान सभेने वासाहतिक संदर्भाला पूर्णपणे नाकारले नाही आणि याच देशातल्या एकाच इतिहासाच्या परंपरेचे गौरवीकरणही केले नाही. दोन्ही नावांचा स्वीकार केला. त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारत हाच इंडिया आहे आणि इंडिया हाच भारत!

इतिहासामध्ये आणि सांस्कृतिक मिथकांमध्ये वेगवेगळे संदर्भ असले तरी व्युत्पत्तीच्या अनुषंगाने भारताचा अर्थ महत्त्वाचा आहे. ‘भा’ म्हणजे तेज, प्रकाश तर रत म्हणजे रममाण होणारा. त्यामुळे भारताचा अर्थ प्रकाशात रत झालेला, तेजाने झळाळणारा, प्रकाशाच्या शोधात असणारा प्रदेश असा होतो.

इंडिया म्हणावे की भारत म्हणावे, असे प्रश्न देशाला अंधारयुगात नेणारे आहेत. त्या वृथा प्रश्नांविषयी चर्चा न करता संविधानाचा पहिला अनुच्छेद ‘इंडिया म्हणजेच भारत’ हे सांगताना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगत प्रकाशाची पायवाट दाखवतो, हे समजून घेतले पाहिजे.

डॉ. श्रीरंजन आवटे 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidan bhan constitution india that is bharat federation india amy