..त्या गोष्टीतली मुलगी स्वत:च मोराइतकी उत्फुल्ल झाली, तसं आपल्यालाही स्वातंत्र्याचे वाहक होता आलं तर अनुच्छेद १९ सार्थ ठरेल..
एक म्हातारी आणि तिची एक छोटी नात – लच्छी – गावाबाहेर राहत होती. एकदा तिच्या झोपडीपाशी एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचू लागली. मोरही नाचू लागला. लच्छीनं हट्ट धरला की मोराला अंगणातच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, ते कसं होणार? आपल्यापाशी त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा काही निर्णय होईना. तेव्हा मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा काही नको. रान तर भवतालीच आहे; मात्र एका अटीवर. मी येईल तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहिजे. ती नाचायची थांबली तर मी येणार नाही. अट साधी होती. लच्छी लगेच कबूल झाली. म्हातारीचंही काम झालं; पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं; तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हापासून आनंदीच राहू लागली. मोर केव्हा येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला की काय याचंही तिला भान राहत नसे. हे सांगून निवेदिका म्हणते, या गोष्टीचं तात्पर्य सांगितलं जात नाही पण मला वाटतं, ‘‘मोर हवा तर आपणच मोर व्हायचं. जे जे हवं, ते ते आपणच व्हायचं.’’
पु.शि.रेगे यांच्या ‘सावित्री’ या लघुकादंबरीतली ही गोष्ट. स्वातंत्र्य हवं तर आपलं मन मुक्त हवं, हे सांगणारं हे रुपक. एकदा हा आनंद गवसला की मोराच्या अस्तित्वाशिवाय नाचता येतं. स्वातंत्र्याचं अस्तित्व असं अटींच्या पलीकडे असू शकतं. स्वातंत्र्याचा हा अनोखा आयाम आपल्या लक्षात येतो. ब्रिटिश निघून गेले आणि देश स्वतंत्र झाला; मात्र स्वतंत्र होणं म्हणजे काय? ब्रिटिशांचा अभाव हाच स्वातंत्र्याचा अर्थ होता का? कशाचा तरी अभाव असणं हा स्वातंत्र्याचा भाग असू शकतो; मात्र स्वातंत्र्याची संकल्पना तेवढय़ापुरतीच मर्यादित नाही. स्वातंत्र्य हा मनाचा प्रवासही आहे. म्हणून तर गांधी म्हणतात- बी द चेंज यू बिलीव्ह इन. तुम्हाला ज्यावर विश्वास आहे तो बदल तुम्ही स्वत:च व्हा! एकदा हे करता आलं की लच्छीला मोरही होता येतं आणि आपल्याला स्वतंत्र परिवर्तनाचे वाहकही.
त्यातून स्वतंत्र विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. यातून जन्माला येते अभिव्यक्ती. अभिव्यक्ती हे विचारांचं प्रकटीकरण आहे. भारतीय संविधानाचा एकोणिसावा अनुच्छेद भाषणाच्या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काचं रक्षण करतो. हा अनुच्छेद सर्वाधिक वादग्रस्त आहे. संविधानसभेतही यावर दीर्घ चर्चा झाली. स्वातंत्र्योत्तर भारतात शेकडो खटले या अनुच्छेदाच्या अनुषंगाने झाले आहेत; कारण हा अनुच्छेद मूलभूत स्वरूपाचाच आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांइतकीच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ही महत्त्वाची गरज आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ देकार्त म्हणतो, ‘मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे’. अभिव्यक्ती हे विचारांचं प्रकटीकरण असल्यानं ती जिवंतपणाची खूण आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय व्यवस्थेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कार्यकक्षा काय आहे, हे महत्त्वाचं ठरतं. त्यानुसार राज्यसंस्था आणि संविधान किती उदार आहे, हे ध्यानात येतं. भारतीय संविधानानं अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार मान्य केल्यामुळे मुक्तीचा दरवाजा खुला झाला कारण अभिव्यक्ती हा श्वास आहे.
बहिणाबाई चौधरी म्हणतात- अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर. हे श्वासाचं अंतर अभिव्यक्त होता येतं की नाही याच्यामधलंच आहे. त्यासाठी स्वतंत्र बुद्धीनं विचार करण्याची प्रक्रिया विकसित व्हावी लागते; त्यामुळेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा गुणात्मक जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे, हे विसरता कामा नये.
– डॉ. श्रीरंजन आवटे