अनुच्छेद ५१ (क)नुसार वैज्ञानिक दृष्टी अंगीकारण्यासोबतच सुधारणावादाचा पुरस्कार करणे हेदेखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे…
‘‘पोथी ऐकली की नाही मघाशी? त्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार रसातळाला गेली. मग बाईने प्रसाद खाताच ठणठणीत होऊन पाण्यावर आली. काय?’’ गाडगेबाबा हसत हसत समोरच्या श्रोत्यांना म्हणाले आणि मग खोचकपणे विचारलं, ‘‘देवाचा चमत्कारच हाय का नाय? गेल्या दोन महायुद्धात फ्रान्स अमेरिकेच्या लै बोटी बुडाल्या मग त्या वर आणायची सोपी युगत कुणी त्यांना सांगितली कशी नाय, कोण जाणे! अहो बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला आन त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला की सगळ्या बोटी वर येतील का नाय? सांगा तुम्ही. इलायतेचं लांब ऱ्हायलं. मुंबई बंदरात बुडालेली रामदास बोट कुणी भगताने वर आणून दाखवावी. बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा हा लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका.’’ गाडगेबाबांच्या कीर्तनातला हा संवाद आहे. गाडगेबाबा कधीही शाळेत गेले नाहीत; पण विवेकी विचार कसा करावा, याचे धडे देत राहिले. प्रत्यक्ष परिसर स्वच्छ करताना प्रत्येकाच्या मनातला अंधश्रद्धेचा कचरा दूर करत राहिले. प्रबोधनकार ठाकरेंनी गाडगेबाबांवर चरित्रपर पुस्तकच लिहिले आहे. वैज्ञानिक दृष्टीने विचार करण्याची शिदोरी गाडगेबाबांनी दिली. त्यांचा विचार परिवर्तनाचा, सुधारणावादाचा होता. मानवतेला कवेत घेणारा होता. भारतीय संविधानाच्या ५१ (क) अनुच्छेदानुसार वैज्ञानिक दृष्टी अंगीकारण्यासोबतच सुधारणावादाचा आणि मानवतावादाचा पुरस्कार करणे हेदेखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
वैज्ञानिक दृष्टी अंगीकारली की सुधारणावादी विचार समजू शकतात. घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणे महत्त्वाचे असते. कार्यकारणभाव म्हणजे घटना आणि परिणाम यामधील तार्किक सहसंबंध लक्षात घेणे. उदाहरणार्थ, हातामध्ये गंडेदोरे घातल्याने भविष्य बदलेल, असा विचार अनेक जण करतात. काही जण कुंडली पाहतात. तळहातावरच्या रेषा ज्योतिषाला दाखवतात. खरे तर या बाबींना काहीही अर्थ नाही. हे पूर्णपणे थोतांड आहे कारण हातामध्ये काही परिधान करणे आणि भविष्य बदलणे यामध्ये कोणताही तर्क नाही. अशा अंधश्रद्धांना फाटा दिल्याशिवाय सुधारणावादी विचार अंगीकारता येत नाहीत.
या अंधश्रद्धा सर्व धर्मांमध्ये आहेत. त्यांच्या विरोधात लढे दिले गेले आहेत. युरोपमध्ये पुनर्जागरण (रेनेसांस) आणि प्रबोधन (एनलायटनमेंट) या दोन चळवळींनी धर्मामधील पुराणमतवादी गोष्टींना आव्हान दिले. रॉजर बेकनसारख्या विचारवंतांनी ‘प्रयोग करा, प्रयोग करा’, असे आवाहन केले. आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मागच्या जन्मीचे पाप, पुढच्या जन्मीचे रूप या सगळ्या भाकडकथा आहेत, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भारतामध्ये एकोणिसाव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची सुरुवात झाली असली तरी त्याही आधी सुधारणावादाचा रस्ता सर्व धर्मांमध्ये होता.
गौतम बुद्ध म्हणाले, माझा शब्द अंतिम मानू नका. तुम्ही ऐकताय, ते तपासून घ्या. गार्गी, मैत्रेयी यांसारख्या विदुषींनी हिंदू धर्मातील कर्मठतेला प्रश्न विचारला. महानुभाव, वारकरी परंपरेने मानवतेला कवेत घेतानाच अनिष्ट रुढींचा त्याग केला. सुफी पंथाने इस्लाम धर्माला अधिक खुले केले. गुरू गोविंदसिंगांनी शीख परंपरेला नवा आयाम दिला. हे सुधारणावादी विचार आत्मसात केले पाहिजेत कारण त्यातच मानवतेचे हित आहे. नरबळीसारखी भीषण प्रथाही एके काळी होती. यज्ञात माणसाचा बळी दिला जायचा. यांसारख्या नृशंस प्रथांना मोडीत काढल्याशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी, सुधारणावाद आणि मानवता यांना अनुसरून वर्तन करावे आणि देशाच्या प्रगतीसाठी व्यक्तीने अविरत प्रयत्न करणे ही दोन महत्त्वाची कर्तव्ये संविधानाने सांगितली आहेत. व्यक्तीमध्ये आणि देशामध्ये परिवर्तन व्हावे, म्हणून ही कर्तव्ये आहेत, याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. हे भान राखले की अंधाराचे जाळे दूर होऊ शकते कारण ‘‘विवेक भेदितो अंधाराचे जाळे, आभाळी देखणी पहाट उजळे ’’
– डॉ. श्रीरंजन आवटे
poetshriranjan@gmail. com