समतेचे स्वप्न साकारण्यासाठी संपत्तीच्या हक्कावर नियंत्रण येणे गरजेचे होते. चव्वेचाळिसाव्या घटना दुरुस्तीने त्यासाठीचे पाऊल टाकले…

संपत्तीच्या हक्काच्या अनुषंगाने संविधानसभेत मोठा वाद झाला. एखाद्याकडे अमर्याद संपत्ती असेल तर त्यातून विषमतेचे प्रश्न निर्माण होतात, असा युक्तिवाद केला जात होता. पाश्चात्त्य जगतात जॉन लॉकसारख्या विचारवंताने संपत्तीचा हक्क नैसर्गिक हक्क असल्याची मांडणी केली होती. भारताच्या संदर्भात मात्र संपत्तीचा मूळ संदर्भ होता तो जमिनीच्या मालकीशी. आपल्याकडच्या जमीनदारांकडे शेकडो एकर जमिनी होत्या. हाच संपत्तीचा मुख्य स्राोत होता. या पार्श्वभूमीवर संविधानसभेत यावर वाद घडत होते. संविधानसभेतील अत्यंत अभ्यासू सदस्य के. टी. शाह यांच्या मते, व्यक्तीकडे संपत्तीबाबतचे खासगी हक्क असता कामा नयेत. सरकारला खासगी संपत्ती किंवा जमीन सामाजिक कल्याणासाठी वापरता आली पाहिजे. त्यांच्या मताला विरोध होता के. एम. मुन्शी यांचा. मुन्शींच्या मते, सरकारने खासगी संपत्ती बळकावल्यास व्यक्तीचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. त्यामुळे संपत्तीच्या हक्काचे संरक्षण झाले पाहिजे. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि सरकारची त्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्याची सीमा या दोन्हींमध्ये ताण होता. शाह आणि मुन्शी यांच्या दोन टोकांमध्ये संतुलन असावे, अशी आग्रही मांडणी अल्लादी कृष्णास्वामी अय्यर आणि डॉ. आंबेडकर करत होते. दीर्घ चर्चेनंतर निर्णय झाला. संविधानाच्या १९व्या आणि ३१व्या अनुच्छेदाने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क असेल, असे जाहीर केले गेले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan fundamental right to property amy
First published on: 19-06-2024 at 05:02 IST