साधारण २०२२ मधली गोष्ट. परभणीच्या गंगाखेड परळी येथे महामार्गाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाच्या वेळी रस्त्याच्या आसपास वृक्षतोड सुरू होती. येथे दोन वडाची झाडं होती. ती तोडली जाणार होती. अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी ही झाडं तोडण्याऐवजी ती रिप्लांट करण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य झाली आणि ते दोन वटवृक्ष वाचले. झाडं वाचवण्याची मोठी चळवळच सयाजी शिंदे यांनी सुरू केली आहे. हे दोन वटवृक्ष जसे शिंदे यांनी वाचवले त्याच प्रकारे १९७० च्या दशकात सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली ‘चिपको’ आंदोलन झाले. चिपको शब्दाचा अर्थ मिठी मारणे. अनेक स्त्रियांनी झाडांना मिठी मारली आणि त्यांना तोडण्यापासून वाचवले. हिमालयाच्या भागामध्ये उत्तराखंडमध्ये ही चळवळ सुरू झाली. जंगल तोडू नये, झाडं तोडली जाऊ नयेत म्हणून शांत, अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू झाले आणि हळूहळू त्याचे लोण सर्वत्र पसरत गेले. हा लढा यशस्वी झाला आणि झाडांचे प्राण वाचले. काही वर्षांपूर्वीच मुंबई मेट्रोच्या प्रकल्पात आरे वन अडथळा बनत आहे म्हणून तिथे जंगलतोड करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अनेक नागरिकांनी चिपको आंदोलनाप्रमाणेच झाडांना कवेत घेतलं. त्यांच्यावर क्रूर कारवाई केली गेली; मात्र लोक मागे हटले नाहीत. विख्यात शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींना संवेदना असतात, हे सांगितलं खरं; पण हे मानवी संवेदनशील मनाला किती कळलं आहे, हा प्रश्नच आहे. त्यामुळेच संविधानात याबाबत कर्तव्य सांगावे लागले. अनुच्छेद ५१ (क) मध्ये आणखी एक कर्तव्य आहे: वने, सरोवरे, नद्या आणि एकुणात वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे. या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे जरुरीचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा