व्यंगचित्रांमधून सडकून टीका केल्यावरही नेहरूंनी के. शंकर पिल्लई यांना तुरुंगात धाडले नाही उलट त्यांच्या व्यंगचित्रांचे कौतुक केले..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवाहरलाल नेहरू पुढे चालले आहेत आणि त्यांच्या मागे उभे आहेत नेहरूच. मागे उभे असलेले नेहरू पुढच्या नेहरूंना मागे ओढतायत. दुसऱ्या एका व्यंगचित्रात नेहरूंच्या अंगावर नेहरूच बसले आहेत आणि इतर चार नेहरू त्यांचे हातपाय ओढत आहेत. नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात कसे अंतर्विरोध आहेत, हे या व्यंगचित्रांमधून दाखवले होते. त्यांची निर्णयप्रक्रिया सुसंगत नाही, अशी टीका त्यात आहे.

अशी एक ना दोन, चक्क शेकडो व्यंगचित्रे काढली होती के शंकर पिल्लई यांनी. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रख्यात व्यंगचित्रकार शंकर या नावाने सुप्रसिद्ध होते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी व्यंगचित्रे काढली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या नेहरूंकडे त्यांचा रोख होता. भारतातली पहिली लोकसभा निवडणूक थोडी लांबणीवर पडली, तेव्हा शंकर यांनी काढलेल्या व्यंगचित्रात नेहरूंनी संसदेलाच रबर स्टॅम्प केले असल्याचे दाखवले होते. काही व्यंगचित्रांत तर नेहरू शीर्षांसन करताना दिसतात तर काही व्यंगचित्रांत त्यांचे भांबावलेले, फजिती झालेले रूप आहे.

व्यंगचित्रांमधून इतकी सडकून टीका झाल्यावर पंतप्रधान नेहरूंनी काय प्रतिक्रिया दिली असेल? तुम्ही देशाचा अपमान केला आहे, असे म्हणत नेहरूंनी शंकर यांना तुरुंगात धाडले नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांच्या व्यंगचित्रांचे तोंड भरून कौतुक केले. पुढे शंकर यांनी व्यंगचित्रांचे साप्ताहिक सुरू केले. ती तशी अनोखीच कल्पना! आणि गंमत म्हणजे या साप्ताहिकाचे प्रकाशन झाले चक्क पंतप्रधान नेहरूंच्याच हस्ते. याच साप्ताहिकातून नेहरूंवर टीका करणारी असंख्य व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. नेहरूंनी लोकशाही राज्यव्यवस्थेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व काय आहे, हे अधोरेखित केले. ‘शंकर, मला माफ करू नकोस. माझ्यावर कठोर टीका करत रहा.’ असे नेहरू व्यंगचित्रकार शंकर यांना म्हणाले. अनेकदा ही व्यंगचित्रे पाहून नेहरू खळखळून हसून दाद देत. ते स्वत:वर मोकळेपणाने हसू शकणारे पंतप्रधान होते. नेहरू गेल्यानंतर नेहरूंवरील व्यंगचित्रांवर ‘डोन्ट स्पेअर मी शंकर’ असा एक गुरुचरण दास दिग्दर्शित अ‍ॅनिमेटेड लघुपटच भारत सरकारच्या चित्रपट विभागाने प्रदर्शित केला. 

शंकर यांनीही नेहरूंच्या ‘सल्ल्या’नुसार शेवटपर्यंत नेहरूंवर टीका केली. अगदी नेहरूंचे निधन होण्याच्या दहा दिवस आधीही शंकर यांनी व्यंगचित्र काढले होते. त्यात नेहरूंच्या हातात मशाल आहे.

नेहरू अत्यंत काटकुळे दिसतात तर त्यांच्या मागे कृष्णा मेनन, गुलझारीलाल नंदा, इंदिरा गांधी सारेच धापा टाकताना दिसतात. नेहरू त्यावरही हसले; पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मशाल तेवत राहील, याची त्यांनी दक्षता घेतली. भारताच्या संविधानातला एकोणिसावा अनुच्छेद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ग्वाही देतो; मात्र केवळ पुस्तकी ग्वाही उपयोगाची नसते. प्रत्यक्षात रक्षण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर असते. असहमतीला, टीकेला, आपल्यापेक्षा वेगळय़ा मताला किती अवकाश मिळतो, यावरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कार्यकक्षा ठरते. त्यातून लोकशाहीचीही परीक्षा होत असते. जिथे वेगळय़ा मताला स्थान नसते तिथे सारेच एकसुरी होण्याची शक्यता असते. वाद प्रतिवाद संवाद ही भारतातील परंपरा राहिलेली आहे. अमर्त्य सेन यांनी ‘आग्र्युमेंटेटिव इंडियन्स’ या पुस्तकात या परंपरेचा आलेख मांडला आहे. वैचारिक मंथनाकरिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूलभूत पूर्वअट असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जिथे असते तिथेच सर्जनाच्या नव्या शक्यता असतात त्यामुळे सरकारवर टीका केली म्हणून शंकर यांना शिक्षा तर झाली नाहीच; उलट त्यांना नंतर ‘पद्मविभूषण’ या किताबाने गौरवले गेले.

– डॉ. श्रीरंजन आवटे 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta sanvidhan bhan jawaharlal nehru k shankar pillai was not jailed but his cartoons were appreciated amy
Show comments