हिंदूंसाठीच्या वैयक्तिक कायद्यांप्रमाणेच इतर धर्मांच्या कायद्यांमध्येही बदल होण्याची आवश्यकता आहे, पण जमातवादासाठी नव्हे…
समान नागरी कायद्याचा मुद्दा अनुच्छेद ४४ च्या निमित्ताने पटलावर आला खरा; पण त्याआधीच याबाबत चर्चा सुरू झाली होती. १९३८ साली काँग्रेसअंतर्गत एक उपसमिती नेमण्यात आली. भारतातील स्त्रियांची सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर स्थिती अभ्यासण्याचे काम या समितीवर सोपवण्यात आले होते. हिंदू वैयक्तिक कायद्यानुसार स्त्रियांच्या परिस्थितीची पाहणी करण्यात आली आणि या उपसमितीने १९३९ साली अहवाल सादर केला. या अहवालावर बरीच चर्चा झाली आणि १९४१ साली बी. एन. राव यांच्या अध्यक्षतेखाली ‘हिंदू कायदा समिती’ स्थापन करण्यात आली. याशिवाय हिंदू संहितेसाठीची एक समिती राव यांच्याच अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. स्त्रियांना समान अधिकार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू झाले. संविधान सभेत नेहरूंनी हिंदू संहिता विधेयक मांडले आणि त्यानंतर हिंदू संहिता विधेयकाच्या मसुद्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे आले. बाबासाहेबांनी तयार केलेले विधेयक स्त्रियांसाठी मुक्तिदायी होते. हिंदू वैयक्तिक कायद्याच्या कचाट्यात स्त्रिया सापडल्या होत्या. बाबासाहेबांचे हिंदू कोड बिल ही स्त्रियांना त्या कचाट्यातून सोडवणारी वाट होती. पं. नेहरूंचा बाबासाहेबांना पूर्ण पाठिंबा होता; मात्र काँग्रेसमधील पुराणमतवादी सदस्य नाखूश होते. शंकर पिल्लई या व्यंगचित्रकाराने बाबासाहेब स्त्रियांना सनातन्यांच्या पकडीतून सोडवून पळवून घेऊन चालले आहेत, असे दाखवणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. हिंदू कोड बिलाला विरोध वाढत गेला आणि एकुणात वारसाहक्क, पोटगी, घटस्फोट आदी बाबतीत प्रागतिक मांडणी करणारे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी कॅबिनेटमधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा राजीनामा दिला तेव्हा संसदेचा कार्यकाळ संपण्यास अवघे काही दिवस बाकी होते. हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही, हे बाबासाहेबांच्या राजीनाम्याचे एक कारण होते.
आंबेडकरांच्या राजीनाम्याच्या पत्राला २७ सप्टेंबर १९५१ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांनी उत्तर दिले. नेहरूंनी लिहिले होते: ‘‘मत्प्रिय आंबेडकर, तुमची निराशा मी समजू शकतो. अधिवेशनाच्या या सत्रात हिंदू कोड बिल संमत होऊ शकले नाही. या संहितेकरता तुम्ही किती कष्ट घेतले आहेत आणि हे विधेयक तुमच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे मी जाणतो. या संहितेच्या कामात मी स्वत: सामील होऊ शकलो नसलो तरी या विधेयकाची आवश्यकता मला पटते म्हणूनच हे विधेयक संमत व्हावे म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले; पण दुर्दैव असे की संसदेच्या कामकाजाचे नियम आडवे आले. मी तुम्हाला आश्वस्त करतो की हे विधेयक संमत होण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन कारण हे विधेयक आपल्या सर्वांगीण प्रगतीशी निगडित आहे.’’ नेहरू केवळ पत्र लिहून थांबले नाहीत तर त्यांनी हिंदू कोड बिल संमत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले.
नेहरूंनी हिंदू कोड बिल चार भागांत विभागले. त्यानुसार हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक व पोटगी कायदा हे चारही कायदे १९५५-५६ मध्ये पारित केले गेले. याशिवाय १९५४ मध्ये विशेष विवाह कायदा मंजूर करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले वचन नेहरूंनी पूर्ण केले. हे चारही कायदे केल्याने हिंदू स्त्रियांच्या प्रगतीसाठीची दारे खुली झाली. बाबासाहेब आंबेडकर आणि पं. जवाहरलाल नेहरू या दोघांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. इतर धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये अशाच प्रकारचे बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता आहे. समान नागरी कायदा आणताना जमातवादी वृत्तींना खतपाणी घालण्याऐवजी समतेचा मुद्दा ऐरणीवर येणे गरजेचे आहे.
– डॉ. श्रीरंजन आवटेे
poetshriranjan@gmail. com