स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासाचे नियोजन स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरू झाले होते. साधारण १९३०च्या दशकात एम. विश्वेश्वरय्या यांनी दहा वर्षांच्या नियोजनाचा आराखडा आखला. ‘प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया’ (१९३४) या आपल्या पुस्तकात त्यांनी कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करत औद्याोगिकतेवर कसा भर देता येईल, या संदर्भात विवेचन केले. पुढे सुभाषचंद्र बोस १९३८ ला काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा मेघनाद सहा यांच्या सूचनेनुसार ‘राष्ट्रीय नियोजन समिती’ स्थापन करण्यात आली होती. पं. नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्य नजरेच्या टापूत दिसू लागले तेव्हा देशाच्या विकासाच्या अनुषंगाने तीन प्रारूपे मांडली गेली: (१) बॉम्बे योजना, (२) गांधीवादी योजना, (३) लोकांची योजना ( पीपल्स प्लॅन). बॉम्बे योजना राज्यसंस्थेच्या किमान हस्तक्षेपाची मागणी करणारी, भांडवलदारांना अनुकूल होती; तर गांधीवादी योजना विकेंद्रीकरण, ग्रामोद्याोग यांवर भर देणारी होती. पीपल्स प्लॅनने जमिनीच्या राष्ट्रीयीकरणासारखी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली होती. बॉम्बे योजनेच्या भांडवलवादी विकास प्रारूपातून आर्थिक विषमता वाढीची भीती; तर गांधीवादी योजनेनुसार सांगितलेल्या ग्रामोद्याोगकेंद्री विकासाविषयी शंका आणि पीपल्स प्लॅन’ ची अव्यवहार्यता हे सारे लक्षात घेऊन या तिन्ही मार्गांमधून वाट काढण्याची कसरत पं. नेहरूंनी केली. मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग निवडताना ‘नियोजन आयोग’ ही संस्था १९५० साली स्थापन करण्यात आली. या संस्थेचा उल्लेख संविधानात नाही. या संस्था बिगर- सांविधानिक आहेत, असांविधानिक नव्हेत. त्यांनी संविधानाशी पूरक असे काम करणे अपेक्षित होते. त्यानुसार पंचवार्षिक योजना आखल्या गेल्या. अनुच्छेद ३९ नुरूप रोजगारनिर्मितीचा विचार करताना, नियोजन आयोगाने पायाभूत सुविधा आणि क्षमतांच्या विकासावर भर दिला. याचा परिणाम म्हणून शिक्षण, ऊर्जा, उद्याोग, रेल्वे, सिचंन या क्षेत्रांतील गुंतवणूक वाढली. कृषी क्षेत्रात भारत स्वावलंबी झाला. राष्ट्रीयीकरण, हरित क्रांती यांसारखे कायापालट घडवणाऱ्या बाबी नियोजन आयोगातूनच पुढे आल्या. सामाजिक न्याय, रोजगार निर्मिती, सुशासन, गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम, आरोग्य आणि कौशल्य विकास या संदर्भातही नियोजन आयोगाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. गरीब आणि अल्पविकसित असलेल्या अर्थव्यवस्थेपासून ‘उदयोन्मुख अर्थशक्ती’ इथवरचा टप्पा नियोजन आयोगामुळे साध्य करता आला. १९९० नंतर बदलेल्या आर्थिक चौकटीत नियोजन आयोगाने नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा