आपापली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा हक्क ‘अनुच्छेद २९’ने दिला आहे…
युनेस्कोने जगभरातील भाषांविषयीचा एक अहवाल २०१० मध्ये प्रसिद्ध केला. जगातील सर्व देशांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची स्थिती यामध्ये मांडली होती. साधारण २५०० भाषांच्या अस्तित्वालाच धोका आहे, असे या अहवालात म्हटले होते. धोका असलेल्या सर्वाधिक भाषांची संख्या होती भारतात. भारतातल्या १९७ भाषांना धोका आहे, असे यात नोंदवले होते. युनेस्कोच्या निकषांनुसार एखादी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या १० हजाराहून कमी होते तेव्हा त्या भाषेला धोका आहे, असे मानले जाते. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस अशा शेकडो भाषा मरून जातील, अशी भीती युनेस्कोने व्यक्त केली होती. एखादी भाषा मरून गेली तर त्यात काय विशेष, असे वाटू शकते. भाषा म्हणजे केवळ शब्द नसतात किंवा व्याकरणाच्या नियमांनीही भाषा आकाराला येत नाही. भाषा हा बोलणाऱ्या समूहाचा आत्मा असतो. त्यामुळे एखादी भाषा नष्ट होते तेव्हा त्या समूहाचा आत्मा मरतो. रघुवीर सहाय एका कवितेत म्हणतात :
‘‘भाषा को शक्ति दे यह प्रार्थना करके
कवि माँगता है बचे रहने का वरदान’’
भाषेचे हे मोल अपरंपार आहे. भाषेच्या या प्रेमासाठी बलिदानाची उदाहरणे आहेत. २१ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मातृभाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो; त्यालाही असाच संदर्भ आहे. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी काही बंगालीभाषक विद्यार्थी तेव्हाच्या ‘पूर्व पाकिस्तान’मध्ये आंदोलन करत होते. त्यांची मागणी होती बंगाली भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा. आंदोलकांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. या गोळीबारात चार बंगालीभाषक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानामुळे २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिवस असेल, असे युनेस्कोने जाहीर केले. भारतातही पोट्टि श्रीरामलु या क्रांतिकारकाने तेलुगू भाषेचे स्वतंत्र आंध्र राज्य हवे, यासाठी आमरण उपोषण केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अखेरीस स्वतंत्र आंध्र प्रदेशची स्थापना झाली. अशा मोठ्या घुसळणीतून भाषेचा इतिहास घडला आहे. संविधानातील अनुच्छेद २९ मध्ये भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा मांडलेला आहे. एवढेच नव्हे तर, न्यायालयाने जगदेव सिंग सिद्धांती विरुद्ध प्रताप सिंग दौलता (१९६४) या खटल्यात भाषेच्या रक्षणाकरिता आंदोलन करण्याचा हक्क मान्य केला आहे. आजही भाषेच्या रक्षणासाठी अनेक समुदाय लढत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची भाषा आहे पाली. ही एक महत्त्वाची प्राचीन भाषा आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ संदर्भ पालीमध्येच आहेत. विशेष म्हणजे पाली भाषा वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहिली जात होती. मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक संचित या भाषेत उपलब्ध आहे. त्यासाठी पाली भाषेचे रक्षण जरुरीचे आहे. अलीकडे संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होताना दिसतात; मात्र तुलनेने पाली भाषेकडे दुर्लक्ष होते.
पालीप्रमाणेच उर्दूने भारतीय संस्कृतीला समृद्ध केले आहे; मात्र उर्दू या भाषेला केवळ मुस्लिमांशी जोडले आहे. वास्तविक उर्दूला पूर्वी ‘हिंदवी’ नावाने ओळखले जात असे. ही भाषा हिंदू, मुस्लिमांसह इतर अनेक धर्माचे लोक बोलत असत. हळूहळू उर्दूलाही मुख्य प्रवाहातून दूर फेकले गेले. त्यामुळे आज उर्दूसारख्या भाषेचे रक्षण करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे. इकबाल अशहर यांनी उर्दूविषयी एका कवितेत लिहिले आहे:
‘‘उर्दू है मेरा नाम, मै खुसरौ की पहेली
मै मीर की हमराज हूं, गालिब की सहेली!’’
गालिबची मैत्रीण असलेली उर्दू आपल्या सगळ्यांचीच मैत्रीण ठरू शकते. त्यासाठी साने गुरुजींनी सांगितलेला ‘आंतरभारती’चा भाव आपल्या मनात हवा. मग भाषेचे मातृत्व आणि भाषाभाषांमधला भगिनीभाव लक्षात येऊ शकतो. संविधानाचा अनुच्छेद २९ हेच सांगण्याचा प्रयत्न करतो.
– डॉ. श्रीरंजन आवटेे
poetshriranjan@gmail. Com