समतेचा हक्क मिळविण्यासाठीच्या संघर्षांत अनेकांचा सहभाग आहे, त्यांच्या या लढय़ाला साथ आहे संविधानाची..
(१) ऐन तारुण्यात त्याने वडिलांसोबत वाद घातला आणि तो घराबाहेर पडला. बराच फिरून अखेरीस तो गंगेच्या किनारी वसलेल्या वाराणसी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आला. हाताला काम नव्हते. खायची मोठी पंचाईत. तिथल्या धर्मशाळेत केवळ ब्राह्मण पुरोहितांनाच मोफत जेवण होते. हा तरुण ब्राह्मण नव्हता म्हणून पुरोहितासारखा पेहराव करून तो आत जाऊ लागला; मात्र फाटकावरच्या सुरक्षारक्षकाने हा ब्राह्मण पुरोहित नाही, हे ओळखले. त्याने याला अपमानित करून हाकलून दिले. बाहेर आल्यावर त्याने धर्मशाळेवरचा फलक वाचला. त्यावर एका श्रीमंत द्रविड व्यापाऱ्याचे नाव होते. त्यानेच ती धर्मशाळा बांधली होती. आता मात्र त्यावर पुरोहितांनी कब्जा केला होता. हे पाहून या तरुणाने समतेसाठी द्रविडांची चळवळ सुरू केली. त्या तरुणाचे नाव होते ई. व्ही. रामास्वामी. पुढील काळात ते ‘पेरियार’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
(२) एक ४२ वर्षांची महिला बसने प्रवास करत होती. ती आफ्रिकन-अमेरिकन वंशाची होती. अमेरिकेतल्या अलाबामा राज्यातल्या मॉन्टगमरी शहरातून तिचा घराकडे प्रवास सुरू झाला. तेव्हा बसमध्ये पुढच्या बाजूस श्वेतवर्णीय आणि मागील बाजूस कृष्णवर्णीय अशी वेगवेगळी आसनव्यवस्था होती. ही महिला श्वेतवर्णीयांच्या जागेवर बसली होती. तेवढय़ात तिथे एक गोरा पुरुष आला आणि त्याने तिला जागेवरून उठण्यास सांगितले; पण ती काही जागची हलली नाही. तिने ठामपणे नकार दिला. तिच्या या नकारामुळे बसमधल्या या गोऱ्या पुरुषाला उभे राहून प्रवास करावा लागला. संतापलेल्या या पुरुषाने या महिलेला अद्दल घडवायची म्हणून तक्रार केली आणि या महिलेला अटक झाली. ही महिला तुरुंगात गेली पण घाबरली नाही. या महिलेच्या मानवी हक्कांच्या समर्थनार्थ एका २६ वर्षांच्या युवकाने मोठा लढा उभारला. न्यायालयात खटला चालला. वर्षभराने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बसमध्ये वंशानुसार वेगवेगळी आसनव्यवस्था करणे असांविधानिक आहे. या महिलेचे नाव रोझा पार्क्स आणि ज्या तरुणाने लढा उभारला त्याचे नाव ज्युनियर मार्टिन ल्युथर किंग. अमेरिकतील वंशवादाच्या विरोधातील नागरी हक्कांच्या चळवळीला या घटनेने एक नवी दिशा दिली.
(३) अवघ्या १५- १६ वर्षांचा तरुण घरात बसलेला असताना अचानक पोलीस त्याच्या घरात आले आणि त्याला अटक झाली. बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली सुरू झाल्या होत्या. या दंगलीत त्याचा हात आहे, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. तब्बल पाच वर्षे हा तरुण तुरुंगात होता. त्याच्यावर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. त्याचा दोष हा होता की तो जन्माने मुस्लीम होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने निरपराध मुस्लिमांना तुरुंगात डांबण्याच्या या कृतीविरोधात लढाई सुरू केली. त्यासाठी वकिली शिक्षण घेतले. त्याने त्याच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत १७ निरपराध मुस्लिमांना सोडवले. ही लढाई लढताना २०१० साली या तरुण वकिलाची हत्या झाली. या धाडसी वकिलाचे नाव शाहीद आझमी. त्याच्या या अवघ्या ३३ वर्षांच्या आयुष्यावर हंसल मेहता यांनी ‘शाहीद’ (२०१२) हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
पेरियार रामास्वामी, रोझा पार्क्स किंवा शाहीद आझमी ही उदाहरणे आहेत वेगवेगळय़ा काळातील, वेगवेगळय़ा ठिकाणची; मात्र ती गोष्ट एकच सांगतात: समतेची! भारताच्या संविधानाचा १५ वा अनुच्छेद धर्म, वंश, लिंग, जात किंवा जन्मस्थान यांवरून भेदभाव करण्यास मनाई करतो मात्र त्यासाठीची लढाई सर्वत्र सुरू होती आणि आहे. माणसाला समतेची वागणूक मिळावी यासाठीची ही संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेत भारतीय संविधान लढणाऱ्या प्रत्येकासोबत आहे.
डॉ. श्रीरंजन आवटे