‘ती तक्रार कशी मागे घ्यायची ते तातडीने ठरवा व आज सायंकाळपर्यंत मला ‘तोंडी’ अहवाल द्या’ मंत्रालयातून दूरध्वनीवर आलेल्या निरोपामुळे पालिका आयुक्तांना अजिबात धक्का बसला नाही. निवडणूक निकालांनतर असा फोन कधीही येऊ शकतो याची कल्पना त्यांना होतीच. त्यामुळे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलावली. ती सुरू होताच आलेला निरोप सांगून झाल्यावर ते म्हणाले ‘बोला’. तसे सर्व अधिकारी हसू लागले. ‘बी सिरीयस’ असे आयुक्तांनी म्हणताच सर्वांचे चेहरे गंभीर झाले. मग त्या भूखंडवाल्या वार्डाचा अधिकारी बोलू लागला. ‘प्रकरण गंभीर आहे. यात सरळ सरळ कराराचा भंग झालाय, हे कागदपत्रातून सिद्ध होते. त्यामुळे तक्रार मागे कशी घेणार?’ त्यावर एक अतिरिक्त आयुक्त म्हणाले, ‘हे बघा आपल्या अंगावर काहीही बालंट न येता मार्ग काढणे यालाच प्रशासन म्हणतात.
हेही वाचा >>> लालकिल्ला: आता भाजपच्या हिंदुत्वावर घाव?
तुमच्यापैकी अनेकजण यात माहीर आहेत याची कल्पना आहे आम्हाला. नियम, कायद्याचा कीस काढण्यापेक्षा मार्ग काय ते सांगा.’ हे ऐकताच आयुक्तांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मग एक उपायुक्त उभे झाले. ‘या प्रकरणात आमदार ‘रंगेहाथ’म्हणावे असेच सापडलेत. मग माघारीसाठी सबळ कारण शोधायचे तरी कसे? आपल्याकडे वॉशिंग मशीन थोडीच आहे?’ हे ऐकताच सर्वजण खळखळून हसले तसे आयुक्तांनी दरडावले. ‘नो पोलिटिकल कॉमेंट’. मग दुसरे अतिरिक्त म्हणाले, ‘प्रशासन हे जनतेसाठी काम करते हे आता साऱ्यांनी विसरायला हवे. आपण फक्त सरकारसाठी काम करतो हेच सत्य.’ त्यावर आयुक्तांनी ‘करेक्ट’ म्हणत दाद दिली. मग दुसरे उपायुक्त बोलू लागले ‘माघारीसाठी कारण असे हवे जे न्यायालयात टिकेल. अन्यथा पालिकेवर ताशेरे ओढले जातील’ हे ऐकताच सर्वजण विचार करू लागले. कुणालाही काही सुचेना! तेवढ्यात एका उपायुक्ताच्या मागे फाइल घेऊन उभा असलेला अभियंता बोलून गेला ‘गैरसमज’. हा शब्द ऐकताच सारे त्याच्याकडे बघू लागले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: इराणचे मतदार सुधारणावादी!
‘गेल्या सप्टेंबरमध्ये मी जेव्हा पालिकेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा वायकरांनी मला फोन करून तुमचा काही तरी गैरसमज झालाय असे म्हटले होते. हे ऐकताच सारे वरिष्ठ एका सुरात म्हणाले ‘मिळाले सबळ कारण.’ मग प्रत्येकात जणू उत्साहच संचारला. ‘गैरसमजातून तक्रार दाखल केली असे म्हटले तर कुठलाही वादंग होणार नाही, कुणाला चिडताही येणार नाही. अनेक मोठी युद्धे, पेशवाईतले खून गैरसमाजातून घडलेत. त्याच परंपरेला जागून हा शब्द वापरला असेही म्हणता येईल. शेवटी ही माघार सन्मानजनक होईल. विरोधकांचे ओरडणे सरकार बघून घेईल. न्यायालयालाही विश्वास ठेवावा लागेल.’ तिसऱ्या अतिरिक्तानी हे म्हणताच सर्वांचे चेहरे दबावमुक्त झाले. तेवढ्यात तो अभियंता म्हणाला ‘आपली मनोरंजनाची व्याख्या चुकली असेही एक वाक्य त्यात जोडू म्हणजे प्रश्नच मिटला.’ हे ऐकताच आयुक्त खूश झाले. ‘याला एकस्तर पदोन्नती देऊन टाका’ अशी सूचना देत त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले. दुसऱ्या दिवशी माध्यमांत बातम्या आल्यावर त्यांना कायदा क्षेत्रातील एका ओळखीच्या जाणकारांचा लघुसंदेश आला. ‘वा! काय मस्त कारण शोधले. प्रशासनातील सर्वांनीच याचा वापर सुरू केला तर देशातील खटले ५० टक्क्यांनी कमी होतील व आमचे ओझे उतरेल.’ तो वाचून आयुक्तांनी त्यांना एक ‘स्मायली’ पाठवून दिला.