‘इंडक्शन मीटिंग’साठी जमलेल्या सर्व नवीन सहकाऱ्यांनो, हवामान खात्याचा प्रमुख या नात्याने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. हवामानशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊन तुम्ही येथे रुजू झाला असला तरी येथील कामकाजाची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. सर्वप्रथम मी शरद जोशींचे एक व्यंगात्मक वाक्य उद्धृत करतो. ते म्हणाले होते ‘आलंपिक उस जगह का नाम है जहा भारतीय टीम हारती है’. त्याच धर्तीवर ‘भारत उस जगह का नाम है जहा मौसम के अंदाज गलत होते है’. येथे काम करताना हे दुसरे वाक्य (व्यंगात्मक नाही) कायम लक्षात ठेवायचे. १०० टक्के अचूक अंदाज देण्याचा प्रयत्न करेन असा अभिनिवेश बाळगायचा नाही. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होईल. चुकीचे अंदाज वर्तविणे हीच या खात्याची परंपरा आहे व गेली १०० वर्षे आपण त्याचे अगदी निष्ठेने पालन करत आलो आहोत. सध्या आपला देश परंपरावादी झालेला असल्याने सर्वांना त्याच मार्गाने चालावे लागेल. चुकीच्या अंदाजांची सवय तमाम भारतीयांनी लावून घेतली आहे. लोक आपल्या कार्यशैलीवर विनोद करतात, पण आंदोलन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अनेकजण तर अंदाज चुकल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडतात. त्यांच्यातली ही सोशिकता हेच आपल्या खात्याचे बलस्थान.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : सामाजिक न्यायाचे कुंठित राजकारण

अचूक अंदाजांसाठी अनेक देश ओळखले जातात. त्यांच्या पंक्तीत आपल्याला बसायचे नाही. नाही तर आपली प्रगती कशी होणार? (थोडे थांबून) या प्रश्नाने गोंधळून जायची गरज नाही. आपण चुकीचे अंदाज देत राहिलो तरच सरकार खात्याच्या सुधारणेत लक्ष घालेल. पैसा ओतेल. ते होत नाही तोवर अंदाज चुकवत राहायचे. भारतीयांना प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्याची वाईट सवय लागली आहे. ती मोडून काढण्याचा विडा आपण उचलला आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला रडारवर प्रचंड पाऊस येण्याची चिन्हे दिसत असतील तरीही स्वच्छ ऊन पडेल असा अंदाज बिनधास्त वर्तवा. आपल्या या कामगिरीमुळेच देश व राज्यांमधील मदत व आपत्ती निवारण खात्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ते कायम आपले आभार मानत असतात. यापेक्षा दुसरे समाधान ते काय?

चुकीचे अंदाज वर्तवल्यामुळे लोक टिंगलटवाळी करतील. शिव्याशाप देतील अशी भीती मनात बाळगू नका. तुम्ही कितीही चुका केल्या तरी शासकीय नोकराकडे आदराने बघण्याची वृत्ती भारतीयांमध्ये बऱ्यापैकी शिल्लक आहे. आपल्या कृतीमुळे शेतीचे नुकसान होते, शेतकरी चिडतात याचीही काळजी नको. सरकारने आता शेतकऱ्यांना लाभार्थी बनवून टाकले आहेच. अंदाज सत्यात उतरणे ही आपली परंपरा नाही. त्यामुळे ते कसे चुकतील याकडे लक्ष देत तशाच पद्धतीने काम करा. धन्यवाद!’ प्रमुखांचे भाषण संपताच सर्वजण बाहेर पडले. मोठ्या आशेने रुजू झालेल्या त्यातल्या काहींचे चेहरे पडले होते. बाहेर ताटकळत असलेल्या एक्झिट पोल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना बरोबर हेरले व पुढील निवडणुकीत अचूक अंदाजासाठी तज्ज्ञ म्हणून या अशी ऑफर दिली. त्यावर पडलेल्या चेहऱ्यांपैकी एक म्हणाला ‘अहो, आम्ही हवामानातज्ज्ञ आहोत’ त्यावर कंपनीवाला उत्तरला ‘पाच वर्षांत आम्ही तुम्हाला राजकीय हवामानतज्ज्ञ करू, शेवटी अचूक अंदाज द्यायचेत कोणाला?’