तू तसा, मी हा असा पण

आपल्या रक्तात फरक कसा

तू एक मिथुन, मी एक नाना

राज्यकर्त्यांचा कोणता हा बाणा

तुला पुरस्कार मिळतो अगोदर

त्याच वाटेवर मी सुदूर, दूरवर

फरक काय तुझ्यात माझ्यात

एकच भाषा, एकाच साच्यात

मग तू कसा जवळचा, मी का दूर

साली लागली मनात हूरहूर

लिहिता लिहिता नाना अचानक थांबले. नुसती कविता प्रसवून काय उपयोग असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. सकाळी सकाळी मिथुनला फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली होती त्यांनी. कविता नेहमी अस्वस्थतेतूनच सुचते. पण आज कविताही पूर्णत्वास जाईना. शेवटी उठून ते घरामागेच असलेल्या शेतात गेले आणि वेगाने खुरपणी करायला लागले. त्यात काही झाडे मुळासकट उखडली जाताहेत याकडेही त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी आपले मूळ कोणते या प्रश्नासरशी त्यांचा मेंदू काम करायला लागला. चित्रपटात काम कमी करून शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा अतिशय प्रामाणिकपणे हाताळला; हजारो कुटुंबांना मदतीचा हात दिला; त्यांना पायावर उभे केले.

हेही वाचा >>> चिप-चरित्र : ॲपल टीएसएमसी : एक विजयी संयोग

नुसती सामाजिक बांधिलकी जपून होणार नाही. राजकीय वर्तुळात वावरही वाढवायला हवा हे लक्षात आल्यावर उजव्यांची स्तुती सुरू केली. पण कुणी लक्षच द्यायला तयार नाही आणि तो मिथुन. नाचण्याशिवाय येते काय त्याला? तृणमूलमधून इकडच्या कळपात शिरला काय, खासदारकी मिळवली काय आणि आता थेट फाळके सन्मान. कविता, लेखन, वक्तृत्व, कला या साऱ्यात आपण त्याच्यापेक्षा कितीतरी उजवे. तरीही माझ्या नावाचा विचार नाही? हा अन्याय नाही तर आणखी काय? हा विचार येताक्षणी नाना थांबले. त्यांचा साहाय्यक त्यांच्यावर नजर ठेवून होताच.

अचानक सहायकाचे बखोटे धरून त्याला घेऊन ते तलावाच्या पाळीजवळ गेले. तिथे पडलेले दोन दगड उचलून ते एका सिमेंटच्या चबुतऱ्यावर गेले व स्वत:च्याच एका हाताने दुसऱ्या हाताच्या बोटावर दगड मारायला लागले. ‘देख देख, मेरे खून में और उस के खून में कोई फरक होगा क्या? उसका भी खून ऐसाही होगा ना, फिर ये अन्याय क्यूं’, असा प्रश्न ते ‘तिरंगा’ स्टाइलमध्ये साहाय्यकाला विचारू लागले, तसा तो घाबरला. त्याने रक्ताळलेल्या बोटावर स्वत:चा रुमाल बांधण्याचा प्रयत्न केला पण नानांनी दाद दिली नाही. ते वारंवार तोच हात डोक्याच्या बाजूला मारत बोलत होते.

ते थोडे शांत झाल्यावर साहाय्यक म्हणाला, ‘सर तुम्हाला रक्ताचा नाही तर राजकीय रंगाचा फरक ओळखता यायला हवा’ हे ऐकताच नाना त्याच्याकडे असूयेने बघत राहिले व म्हणाले, ‘जा, त्या नाच्याच्या नावाने अभिनंदनाचे एक ट्वीट करून टाक.’