‘चला, ठरले तर मग. आता पुन्हा वेळकाढूपणा नको. ठरलेल्या दिवशी जे ठरले तेच घडायला हवे. बाकी मंत्रीपदाचा शब्द माझा’ दादांच्या या वाक्यावर जयंतराव तत्परतेने म्हणाले ‘हो दादा’. तेवढ्यात कक्षाचे दार अचानक उघडले गेले. दोघांनीही तिकडे बघितले तर वळसे पाटील उभे. हे कशाला मध्येच कडमडले असे भाव दोघांच्याही चेहऱ्यावर उमटत असतानाच अचानक थोरल्या पवारांचा कटाक्ष दृष्टीस पडला तसे जयंतराव चपापले. वळसे जाताच चर्चेचा नूरच पालटला. ‘आता कसे’ असे जयंतरावांनी विचारताच दादा म्हणाले. ‘काळजी करू नका. बाहेर काय उत्तर द्यायचे ते ‘या ठिकाणी’ ठरवू. मग चर्चेची गाडी वेगवेगळ्या पर्यायांच्या मार्गावर धावू लागली.

जयंतराव म्हणाले ‘भारतीय साहित्यात कटाक्षाला खूप महत्त्व आहे. कधी तो प्रेमाचा असतो, कधी लटक्या रागाचा तर कधी बघून घेईन असा. साहेबांचा कटाक्ष मला तिसऱ्या प्रकारातला वाटला. आता काही खरे नाही. जे ठरले ते पुढे ढकलूयात का?’ हे ऐकताच चिडून दादा म्हणाले. ‘अरे, किती काळ त्यांना भिणार. मी पुतण्या असून भ्यालो नाही. इतके दबावात राहायचे नसते. ही बैठक काही ठरवण्यासाठी नव्हती तर वेगळ्या विषयावरील चर्चेसाठी होती असे सांगू बाहेर’ यावर ‘कोणता विषय’ असे जयंतरावांनी विचारल्यावर दोघे विचार करू लागले. साखर कारखान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोलत होतो, म्हटले तर बैठकीत चर्चेला येणाऱ्या विषयावर एकट्यात चर्चा कशाला असे साहेब म्हणतील. मुंडेंची नेमकी भानगड काय यावर बोलत होतो म्हटले तर जे सर्वांना ठाऊक त्यावर बंदद्वार चर्चा कशाला असा त्यांचा प्रतिवाद असेल. सरकारमध्ये नेमके काय सुरू आहे यावर माहिती घेत होतो म्हटले तर जे मला ठाऊक ते दादांना विचारायची गरज काय, असा प्रतिप्रश्न ते करतील.

पक्षात येतो का असे विचारले व मी नाही म्हटले, असे सांगितले तर विश्वासार्हता कमी होणाऱ्या गोष्टी करायच्याच कशाला असे ते म्हणतील. माझ्या कारखान्याचे काही प्रश्न सरकारदरबारी प्रलंबित होते म्हणून भेटलो म्हटले तर, मी एक फोन सीएमना केला तर प्रश्न मार्गी लागले असते, असा युक्तिवाद ते करतील. भुजबळांचे काय सुरू हे विचारायला गेलो म्हटले तर जे सर्वांना दिसते ते का विचारायचे, असा सवाल करतील. या वयात साहेबांना कशाला त्रास देता. काहीतरी तोडगा काढून एकत्र येऊ हे सांगायला गेलो असे सांगितले तर सत्ता सोडायला दादा मूर्ख आहेत काय असे म्हणत ते निरुत्तर करतील.

जयंतराव सांगत असलेले एकेक पर्याय व त्यावरची साहेबांची संभाव्य उत्तरे ऐकून दादाही विचारात पडले. मग ते म्हणाले. ‘ते तुम्हाला काहीच विचारणार नाहीत. या भेटीचा निष्कर्ष ते मनात काढून योग्य वेळी बोलतील. तरीही आपल्या समाधानासाठी उत्तर तयार ठेवायला हवे. शेवटी गाठ तल्लख बुद्धीच्या माणसाशी आहे’ हे ऐकताच जयंतराव ओरडलेच. ‘सापडला पर्याय. आपण कृषीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल यावर बोलत होतो’ हे शब्द कानावर पडताच दादा आनंदले. आता बाहेर माध्यमांना हेच उत्तर मी देणार. तुम्ही शांतच राहायचे असे म्हणत ते उठले. आपण सुचवलेला पर्याय क्षणात खिशात टाकणाऱ्या दादांच्या पक्षात खरेच जावे काय? कृत्रिम बुद्धिमत्तेलाही लाजवेल असा तल्लख मेंदू असलेल्या साहेबांना हे कारण पटेल काय यावर विचार करत जयंतराव ‘शुगर इन्स्टिट्यूट’च्या पायऱ्या उतरू लागले.