‘सर नमस्कार, मी ‘अबप’ वाहिनीचा पत्रकार दिनू चहाबिस्कीटकर, आपण काल भाजप प्रवेशाच्या वेळी ‘आदर्श हा राजकीय अपघात’ असे ‘गंभीर’ विधान केले. त्यावरून शेकडो प्रेक्षकांनी हा अपघात नेमका कसा अशी विचारणा केली. याविषयी आपण सविस्तर सांगाल का?’ प्रश्न ऐकताच ते हसून मोठ्या उत्साहाने बोलू लागतात…
‘तो अशोकपर्वाचा काळ होता. सत्यसाईबाबाच्या कृपेने मी पदावर विराजमान झाल्यावर सारे सुरळीत सुरू होते. पक्षाने माझ्या हाती राज्याचे सुकाणू दिल्यामुळे मी निर्धास्त होऊन राज्यशकट हाकायला सुरुवात केली होती. कधी क्लच तर फारच कमी वेळा ब्रेकवर पाय देत माझे मार्गक्रमण वेगाची मर्यादा पाळून सुरू होते. एक दिवस ‘सौ’ला घेऊन ‘राज्यकारभारा’साठी बाहेर पडलो असताना मला आदर्श गृहनिर्माणच्या फायलीसंदर्भात फोन आला. सदनिकेसंदर्भात प्रकरण आहे हे ‘सौ’ला कळताच तिने बेघर असलेल्या तिच्या आईसाहेबांसाठी एक घर हवेच असा धोशा लावला. क्षणभरासाठी पाय ब्रेकवर गेला पण सावध होत मी ॲक्सिलरेटरवर पाय ठेवत वेग वाढवला. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला मुंबईत घर हवेसे वाटणे स्वाभाविक याची खात्री पटल्यावर मी थोडा वेग कमी करत एक सदनिका ठेवा असे निर्देश दिले. नंतर राज्यभराच्या प्रवासात मी अनेकांना ‘लिफ्ट’ दिली. त्यातल्या काहींना सासू प्रकरण ठाऊक झाल्याने त्यांनीही सदनिका मागितली.
हेही वाचा >>> संविधानभान : भारतीय संस्कृतीचा चित्रमय कोलाज
‘एकसे भले दो’ या युक्तीमुळे शकटातील गर्दी वाढली पण प्रवास अधिक सुखकर होत गेला. नंतर प्रत्येक वेळी मी शकट हाकत असतानाच आदर्शसंबंधी फोन येत गेले. तेव्हा हेही कळले की ही फाइल ज्या अधिकाऱ्यांकडे गेली, त्या प्रत्येकाने एक सदनिका मागितली. हा व्यवहार नियमानुसार पैसे भरून होत असल्याने मी निर्धास्त होत माझ्या ‘विकासरथा’ची गती वाढवली. एकदा प्रवासात असताना इच्छुकांची गर्दी वाढल्याने ‘आदर्श’ इमारतीची उंची वाढवण्याच्या प्रस्तावावरसुद्धा मी डाव्या हाती सुकाणू धरून स्वाक्षरी केली. पण पक्षातील काही असंतुष्ट तसेच विरोधकांना विकासाचे हे ‘आदर्शपर्व’ सहन झाले नाही. त्यांनी माझ्या गतीला बातम्यांचे ब्रेकर लावणे सुरू केले. तरीही मी शकट जोरात दामटणे सुरूच ठेवले. मग विरोधकांनी प्रवासात मोर्चारूपी बाधा आणली. कुणालाही इजा न होऊ देता मी ‘विकास प्रवास’ सुरूच ठेवला. या प्रवासातच मी बातम्या ऐकायचो पण चित्त विचलित होऊ दिले नाही. अखेर एक दिवस मला श्रेष्ठींचा फोन आला व पायउतार होण्यास सांगताच माझे नियंत्रण सुटले व शकट एका झाडावर जाऊन आदळले. त्यात मला अजिबात दुखापत झाली नाही. तेव्हापासून सारे या दुर्घटनेला आदर्श राजकीय अपघात म्हणू लागले. हा घटनाक्रम लक्षात घेऊनच मी काल तसे म्हणालो. त्यामुळे आता भाजपकडे मागणी करणार आहे की हा खटला भ्रष्टाचार प्रतिबंधकऐवजी मोटर वाहन कायद्यानुसार चालवावा.’ हे ऐकताच मुलाखतकर्त्या दिनूचा जबडा बराच काळ बोनेट उघडलेल्या वाहनासारखा आ वासलेला राहिला.