हे प्रशासनातले ‘बाबू’ संतांना समजतात काय? देवाचा संदेश जनतेपर्यंत पोहचवण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या महंताचा अपमान करण्याची हिंमत होतेच कशी यांची? अयोध्येतील हनुमानगढीचे प्रमुख राजू दास यांच्याविषयी देशात किती आदर आहे हे ठाऊक नाही का यांना? मग सुरक्षारक्षक काढून त्यांचा उपमर्द केलाच कसा? हा अपमान म्हणजे धर्माभिमानी राष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीतील मोठा अडथळाच. असतील ते जिल्हाधिकारी पण त्यांच्यावर योगींनी तातडीने कारवाई करायलाच हवी. अयोध्येतला पराभव पक्षापेक्षाही या संतांना जिव्हारी लागला, पण त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होणार, गर्दी ओसरणार हा केवळ कल्पनाविलास. हो, केली असेल त्यांनी कुणाला दमदाटी, दिल्या असतील काहींना शिव्या, दाखवला असेल काही राष्ट्रद्रोह्यांना बंदुकीचा धाक तर यात त्यांची चूक काय? धर्माच्या प्रसारासाठी हे करणे क्षम्य ठरवले आहे पुराणात याची कल्पना या उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या बाबूंना कधी येणार? या साऱ्यांना आता संतांच्या वचनाला प्रमाण समजणारी आध्यात्मिक लोकशाही शिकवण्याची गरज आहे. तेव्हाच दुरुस्त होतील हे. सुरक्षा घेऊन फिरणारे राजकारणी तर सर्रास गुन्हे करतात. त्यांचा रक्षक काढण्याची हिंमत हे बाबू कधी दाखवणार?
हेही वाचा >>> अन्वयार्थ – शक्तिपीठ महामार्ग: प्राधान्यक्रमांचा प्रश्न!
संत, महंत हे तर देवाचे दूत. त्यांना कशाला हवी सुरक्षा असले प्रश्न फिजूल हो! समाजात असतात काही धर्मद्वेष्टे, त्यांच्यापासून अशा महनीयांचे संरक्षण व्हायलाच हवे. एक महंत तयार व्हायला दोन ते तीन तपे लागतात. त्यामुळे त्यांना जपायलाच हवे. राजकारणातल्या पराभवाचा जाब प्रशासनाला विचारणे योग्य कसे? बैठकीचे निमंत्रण नसताना त्यात घुसखोरी करणारे हे महंत कोण असले प्रश्न तर अजिबात नको. संतांचा संचार हा कुठल्याही राजशिष्टाचारापासून मुक्त असतो. त्यामुळे दास महाराजांनी काहीही चुकीचे केले नाही. निवडणुकीच्या काळात सामान्य मतदारांना खूश ठेवणे हे प्रशासनाचे काम. त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून त्यांचा संताप अनावर झाला तर त्यात गैर काय? काय गरज होती घरे रिकामी करण्याच्या नोटिसा या काळात द्यायची. नंतरही हे करता आले असते. त्यामुळे नाराज मतदारांची समजूत काढायला पाच वर्षे मिळाली असती. हा साधा तर्क या बाबूंना समजत नसेल तर महंत चिडणारच ना! या गढीच्या प्रमुखांनी धमकावल्यामुळे मते गेली हा आरोप तर तद्दन खोटा. धर्माच्या मुद्दयावर रागावण्याचा, इशारा देण्याचा अधिकार या देवदूतांना आहेच. लोकही या बोलण्याचे काही वाटून घेत नसतात. त्यामुळे प्रशासनाने अशा आरोपाच्या माध्यमातून संतांची बदनामी थांबवणे केव्हाही चांगले. अयोध्येचा फायदा लोकसभेत झाला नाही या त्राग्यातून त्यांनी जाब विचारला यातही तथ्य नाही. संत, महंतांना काटय़ांवरून चालण्याची सवय असतेच. ते पुन्हा भरारी घेतील हे लिहून ठेवा. हनुमानाप्रमाणेच नि:स्वार्थ भावनेने लल्लाची सेवा करणाऱ्या महंतांचा जीवही महत्त्वाचा. त्यामुळे त्यांची काळजी ‘संतो की सरकार’ने घ्यावी व या बाबूला त्वरित हाकलावे हाच या पराभवावरचा तात्कालिक उपाय. बाकी संत, महंत बघून घेतील.