“सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! राजकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या होतकरूंसाठी सुवर्णसंधी!!! २०१४ नंतर देशाच्या राजकारणाचा नूर पूर्णपणे पालटून गेल्याचे तुम्ही जाणताच. सत्तेला कमालीचे महत्त्व आलेल्या या काळात विविध कसरती करून ती टिकवायची कशी याचे प्रशिक्षण देण्यासाठी आमच्या ‘नितीश’ अकॅडमीतर्फे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी वाजवी शुल्क आकारले जाईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापासून प्रेरणा घेत आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यांनीही त्यांचे नाव वापरण्याची संमती अतिशय आनंदाने दिली. मुळात नितीश ही एक व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे व त्याचा सार्वत्रिक प्रसार होऊन ती सर्वार्थाने रूढ व्हायला हवी असा मानस त्यांनी व्यक्त केल्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लेख: आंतरवली आंदोलनाचा आर्थिक अंतर्नाद!

महिनाभर चालणाऱ्या या कार्यशाळेत कधी पक्ष न बदलता तर कधी बदलून सत्तेची खुर्ची कायम कशी राखायची, फारसा वादविवाद न होऊ देता सुलभ सत्तांतर कसे घडवून आणायचे, हे करताना चेहऱ्यावरचे भाव निरागस कसे ठेवायचे, यासंदर्भातील प्रत्येक कृतीला नैतिकतेची जोड कशी द्यायची, यातून समजा प्रतिमाभंगाचा धोका उद्भवलाच तर त्याचे संवर्धन कसे करायचे, सामान्य लोक तसेच माध्यमांनी ‘पलटूराम’ म्हटले तरी न चिडता निर्व्याज कसे हसायचे, आधी विरोधकांविषयी केलेली वक्तव्ये नंतर त्यांनाच सोबत घेतल्यावर कशी विसरायची, त्यासंदर्भात कुणी आठवण करून दिलीच तर ऐकू न आल्याचा अभिनय कसा करायचा, पलटी मारण्याच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करताना त्याला राज्य तसेच जनतेच्या हिताशी कसे जोडायचे, मागास असल्याचा आव कधी व केव्हा आणायचा, यावर मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाईल. यात सहभागी होणारा प्रत्येक होतकरू पक्ष काढू शकणार नाही. प्रत्येकालाच मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार नाही याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. मात्र माननीय नितीशकुमारांनी केलेला हा ऐतिहासिक प्रयोग सत्ताकारणात समाविष्ट असलेल्या अगदी खालच्या पदापर्यंत झिरपावा हाच या कार्यशाळेमागील हेतू आहे.

देशभरात सर्वत्र असे ‘पलटूराम’ तयार झाले तर आपसूकच या प्रवृत्तीला प्रतिष्ठा प्राप्त होईल व त्याचे जनक म्हणून नितीशकुमारांचे नाव इतिहासात अजरामर होईल. यात सहभागी होणाऱ्या होतकरूंच्या राजकीय विचाराची पाटी शक्यतो कोरी असावी. तो समाजवादी असला तरी काही हरकत नाही. अलीकडे अस्ताला गेलेला हा विचार किमान या माध्यमातून तरी जिवंत ठेवता येईल अशी खुद्द कुमारांचीच अपेक्षा आहे. कार्यशाळेत दिवसभराच्या मार्गदर्शनानंतर सायंकाळच्या सत्रातील एक तास विविध प्रजातींचे सरडे न्याहाळण्यासाठी राखीव ठेवला जाईल. काचेच्या पेटीत ठेवलेले हे सरडे किती काळात रंग बदलतात, केशरी, पांढरा, हिरवा, पिवळा रंग त्यांच्या शरीरावर कसा उमलतो याचे निरीक्षण तुम्हाला अगदी बारकाईने करावे लागेल. उद्देश हाच की हे रंग बदलणे बघताना तुमच्या मनातील राजकीय विचारसुद्धा त्याच वेगाने बदलावेत. तेव्हा त्वरा करा व यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा.” हे जाहिरातपत्रक नितीशकुमारांच्या हाती पडताच ते खुदकन हसले. त्यांनी लगेच साहाय्यकाला बोलावून या अकॅडमीला १० लाखांची देणगी देण्याचा आदेश दिला. हसतच ते शयनकक्षात गेले तेव्हा विविधभारतीवर गाणे सुरू होते. ‘मौसम की तरह तुम भी बदल तो न जाओगे…’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on bihar cm nitish kumar s return to nda zws