भरगच्च दरबारात अकबर अत्तर अंगावर शिंपडत असताना नेमका एक थेंब खाली पडला. रुमालाने तो टिपताना त्याचे लक्ष बिरबलाकडे गेले. त्याला ही कृती आवडली नाही हे लक्षात आल्यावरही अकबर काही बोलला नाही. दोनच दिवसांनी त्याने एक हौदच अत्तराने भरला व ज्याला हवे त्याने ते घेऊन जाण्याचे आवाहन केले. उसळलेली गर्दी बघून आनंदित नजरेने अकबराने बिरबलाकडे बघितले. त्यावर बिरबल म्हणाला ‘जो बूँदसे गयी वो हौदसे आती नही’. या वाक्यासरशी ‘सागर’मध्ये गाढ झोपलेल्या भाऊंना जाग आली. मग झोपच येईना. त्यांनी आलेल्या लघुसंदेशांना उत्तरे पाठविण्यास सुरुवात केली खरी, पण ते वाक्य मनातून जाईना. त्या पत्रकार भाऊ व शालिनीजींच्या वादात परिवाराला तडे गेल्याचे लोकांना दिसलेच शेवटी.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : आशादायी बांगलामैत्रीकडून फलदायी अपेक्षा

भाऊंनी पण असे करायला नको होते. परिवाराची पत्रकाराविषयीची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. जो सातत्याने टीका करतो तो पत्रकार नाहीच. तो केवळ विरोधक. जो सतत वाहवा करतो तोच खरा पत्रकार. या व्याख्येमुळेच अनेकांना दूर ढकलून भाऊंना जवळ केल्याची जाण त्यांनी ठेवायला हवी होती. शेवटी पराभव कसा पचवायचा हे नेत्यांना जेवढे कळते तेवढे वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्यांना कळत नाही हेच खरे! अशी भूमिका बजावताना आपल्या लेखणी वा वाणीमुळे नॅरेटिव्ह सेट होते असेच यांना वाटू लागते. त्यातूनच ही गडबड झाली असावी. भूमिका वठवायची ठरली की पदरची वाक्ये नकोत. जे पटकथेत आहे तेच बोलायला हवे. इथेच भाऊ चुकले. आता या भाऊंसकट पटावरच्या सगळ्यांची कार्यशाळा उत्तनला घ्यायला हवी. त्या शालिनीजींनी तरी नोटीस पाठवताना दहादा विचार करायचा होता. अशी घाई सतत विरोधात लिहिणाऱ्या ‘कथित’ पत्रकारांच्या बाबतीत दाखवावी लागते.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : कायद्यांतील लिंगभेद आणि सांविधानिक समानता

तटस्थता व निष्पक्षपणाचा आव आणत परिवाराची बाजू उचलून धरणाऱ्या ‘खऱ्या’ पत्रकाराच्या बाबतीत नाही, हेही त्यांना कळलेले दिसत नाही. सततच्या विजयामुळे समाजमाध्यमे हे दुधारी शस्त्र आहे, हेच विसरून गेलेत सारे. कदाचित निधीवापरावरून झालेल्या आरोपामुळे त्या व्यथित झाल्या असाव्यात. मुळात असा काही निधी असतो याची जाहीर वाच्यता होणेच चुकीचे. या भूमिका वठवणाऱ्यांना निवडणुका कशा लढवाव्या लागतात हेच ठाऊक नसते. निधी वगैरेच्या गोष्टी यांना सांगणेही गैरच. त्यापेक्षा साचेबद्ध भूमिका कशी वठवायची यावरच भर द्यायला हवा. आजकाल ‘खोटे’ हेच ‘खरे’ पटवून देणारे व त्यातल्या त्यात आपल्या विचाराचे पत्रकार मिळत नाहीत फारसे. त्यामुळे जे आहेत त्यांना सांभाळून घ्यायला हवे हे या बाईंना कळले पाहिजे. एकीकडे म्हणायचे मला कोणतेही अधिकार नव्हते व दुसरीकडे तेच अधिकार असलेल्या पदांची जंत्री एक्सवर ठेवायची. हे कसे, असा प्रश्नही या बाईंना पडलेला दिसत नाही. कितीही संकटे आली तरी परिवार अभेद्या दिसायला हवा. यावेळसारखा हस्तक्षेप वारंवार करण्याची पाळी पुन्हा येऊ नये हेच खरे! येणाऱ्या काळात प्रत्येकाने त्याची भूमिका चोख वठवायलाच हवी यासाठी कठोर नियम करायलाच हवेत असा विचार करत भाऊंनी दिवा मालवला पण बिरबलाचे वाक्य झोपेतही त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते.