‘हा काय प्रकार आहे? प्रदेशाध्यक्ष असले म्हणून काय झाले? यांना शपधविधीची तारीख परस्पर जाहीर करण्याचा अधिकार कुणी दिला? राजभवनाचा शिष्टाचार ठाऊक नाही काय? असू आम्ही एकाच विचारसरणीतून पुढे आलेले पण पदाचा मान राखायलाच हवा. साधी सभ्यता यांच्या ठायी नाही ?’ असे अनेक प्रश्न उपस्थित करत महामहीम भवनाच्या हिरवळीवर वेगात चालत होते व त्यांना शांत कसे करायचे या विवंचनेत असलेला लवाजमा त्यांच्या मागेपुढे करत होता. थोडे थकल्यासारखे वाटल्यावर महामहीम एका वेताच्या खुर्चीत विसावले. अचानक पुन्हा त्यांना बोलण्याची उबळ आली. ‘यांना मंत्री व्हायचे आहे की राजभवनात जागा शोधायची आहे? जरा घ्या बरं माहिती. प्रतिमहामहीम होण्याची एवढीच हौस असेल तर तसे सांगावे ना पक्षनेतृत्वाला. उगीच अधिकारात लुडबूड करण्याचा अधिकार यांना दिला कुणी? ती माध्यमे काहीही म्हणोत.
हेही वाचा >>> पहिली बाजू : ‘त्या’ ७४ लाख मतांची उकल…
आजकालचे महामहीम रबरी शिक्के असतात. राजभवन म्हणजे वृद्धांची राजकीय सोय होण्याचा आश्रम वगैरे वगैरे. पण काहीही झाले तरी हे संविधानिक पद आहे हे इतकी वर्षे राजकारणात वावरणाऱ्या, मंत्री म्हणून काम केलेल्या या अध्यक्षांना कळू नये हे अतिच झाले. ते काही नाही. हा अपमान गृहमंत्रालयाच्या कानावर तात्काळ घालायला हवा. नपेक्षा एक खरमरीत पत्र तरी लिहायला हवे.’ हे ऐकताच उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टवकारले. त्यातला एक हळूच त्यांच्या कानात कुजबूजला. ‘तसे काही करू नका. शेवटी आपलेच दात व आपलेच ओठ’ हे वाक्य कानी पडताच महामहीम प्रश्नार्थक नजरेने बघू लागले तसा त्याने दात व ओठ या शब्दामागील भावार्थ त्यांना इंग्रजीत समजावून सांगितला. तो ऐकून ते पुन्हा विचारमग्न झाले. थोडा काळ शांततेत गेल्यावर ते म्हणाले ‘विरोधक उचकवू लागल्याच्या व्यथा तरी त्यांच्या कानावर घातल्यात का?’ हा प्रश्न ऐकताच दुसरे एक वरिष्ठ हळूच म्हणाले ‘हो सर, आम्ही त्यांच्या कानावर सर्वकाही घातले पण ते ऐकण्याच्याच मन:स्थितीत नव्हते. प्रचंड बहुमत मिळाले, असे म्हणत त्यांनी आम्हालाच पेढा भरवला. बरोबर पाऊणेपाचला तुमचे साहेब आझाद मैदानावर हजर होतील याची काळजी घ्या. बाकी राजशिष्टाचार खात्याचे अधिकारी त्यांना भेटून ‘ब्रीफ’ करतीलच, असे सांगत ते गर्दीत मिसळले.
आम्ही पुन्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करून बघितला पण विजयाची खूण दाखवत ते पाचला भेटू पाच वाजता असे म्हणून दुसरीकडे वळले.’ हा घटनाक्रम ऐकल्यावर महामहीम पुन्हा उठून वेगाने येरझारा घालू लागले. ‘हे राज्य प्रगतिशील, नियमांचा आदर करणारे आहे, असा समज होता, पण पार भ्रमनिरास झाला. अरे मीही पक्षाचा अध्यक्ष होतो. दुर्दैवाने मला तिकडे असा आगाऊपणा करण्याची संधी मिळाली नाही. याचा अर्थ असा नाही की यांनी असे वागावे. नाराजी किमान दिल्लीला तरी फोन करून कळवायलाच हवी. तसे केले नाही तर भविष्यात हे प्रकार वाढतच जातील.’ असे म्हणत त्यांनी फोन हातात घेतला. तेवढ्यात एक अधिकारी म्हणाला. ‘सर तुम्ही झारखंडचे नाही तर महाराष्ट्राचे महामहीम आहात.’ हे ऐकून ते शांतपणे भवनाकडे चालू लागले.