‘तसे त्यांच्यात व आपल्यात आता फारसे अंतर उरलेले नाही. त्यांचा स्ट्राइक रेट ७०.३७ तर आपला ६९.४९. म्हणजे फरक केवळ ०.८८ चा. एक टक्कासुद्धा नाही. तसेही हे ‘स्ट्राइक रेट’ प्रकरण त्यांच्यातल्या कुणाला समजण्यासारखे नाही. त्यांना फक्त ‘रेट’ ठाऊक (सारे हसतात). त्यामुळे आमचीच विजयाची सरासरी जास्त असे म्हणत दोन चार जास्तीची मंत्रीपदे पदरात पाडून घ्यायची.’ मिश्कील हसत बोलणाऱ्या छगनरावांचे हे वाक्य ऐकताच दादांच्या बंगल्यावर जमलेल्या ‘कोअर ग्रुप’मधील प्रत्येकाचे कान टवकारले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : निम्मेशिम्मे प्राध्यापक!
थोडा काळ शांततेत गेल्यावर तटकरे म्हणाले, ‘तसेही शिंदे सध्या रुसून बसलेत. हा तिढा एवढ्यात सुटण्याची शक्यता नाही. हा मधला काळ सत्कारणी लावायचा असेल तर हा मुद्दा पुढे रेटून पक्षाचा फायदा करून घेणे योग्यच.’ दादा गप्पच. मग वळसे पाटील बोलू लागले, ‘आजवर भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना मधला तर आपण लहान भाऊ अशी रचना होती. आता शिंदे सेना व आम्ही जुळे भाऊ. या स्थितीत त्यांना १२ मंत्रीपदे मिळत असतील तर आपल्यालाही तेवढीच हवी. हे म्हणणे चाणक्यांच्या कानावर घालण्यासाठी दादांनी दिल्लीला जायला हवे.’ याला साऱ्यांनी अनुमोदन दिल्यावर दादा पटेलांच्या कानात कुजबुजले व हो म्हणाले तसे छगनराव उत्साहाच्या भरात म्हणाले, ‘ठरले तर मग. मी हा ‘रेट’चा मुद्दा जोरकसपणे माध्यमांत मांडतो. हे आम्ही जे काही करत आहोत ते नाराज असलेल्या शिंदेसेनेची आणखी कोंडी करण्यासाठीच असे तटकरेंनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला सांगायचे. दादा भुसेंसारखे अनेक आमदार अस्वस्थ होतील व एकनाथरावांवरचा दबाव वाढेल असेही त्यांना पटवून द्यायचे व दुसरीकडे दादांनी तडक दिल्ली गाठायची. गृहनिर्माणसारखे खाते मिळाले, तरी पुरे.’ मग सारेच कामाला लागले.
हेही वाचा >>> संविधानभान : परिवर्तनाच्या शक्यतांची प्रशस्त वाट
नवा मफलर गुंडाळून छगनराव माध्यमसंवादासाठी सज्ज झाले. तटकरे दिल्लीतील त्यांच्या कार्यालयातील साहाय्यकांना कसेही करून अमित शहाजींच्या कार्यालयात जाऊन भेटीची वेळ मिळवा, अशी सूचना देऊ लागले. कारण काय सांगायचे असे साहाय्यकाने विचारताच ‘हम छोटे नही जुळे भाऊ है, संख्याशास्त्र के हिसाबसे’ असे तटकरे बोलून जाताच पटेल मध्ये पडले व त्यांनी फोन हातात घेत शुद्ध हिंदीत भेटीचा हेतू समजावून सांगितला. दादा दिल्लीत पोहोचले तसे मुंबईतील भाजपच्या गोटातसुद्धा समाधान पसरले. हट्टी एकनाथराव आता नक्की वठणीवर येतील, असे वाटू लागले. दिल्लीत पोहोचलेल्या दादांना २४ तास लोटले तरी शहांची वेळ मिळेना. पटेलांनी ‘गुजरात कनेक्शन’ वापरून बघितले तरीही यश गवसेना. ३२ तासानंतर दादांना निरोप मिळाला. भेट शक्य नाही. का, असे विचारताच उत्तर मिळाले. ‘ये स्ट्राइक रेट के बारे में साब को सबकुछ पता है. उन्हें तो बूथवाईज स्ट्राइक रेट मालूम है. ये सब शपथग्रहण के बाद.’ हे ऐकून दादा हिरमुसले होऊन परतले व शहांच्या भेटीसाठी गेलोच नव्हतो, असे माध्यमांना सांगण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू लागले.