न्यायमूर्तींच्या निवासस्थानातील कार्यालयात नव्यानेच रुजू झालेल्या तरुण न्यायिक अधिकाऱ्याने सर्व प्रकरणांच्या फायली दिवसभरात वाचून त्यातील टिपण टेबलवर ठेवले, तोवर सायंकाळ झाली होती. भनरुळलेले अधिकारी या कृतीवर फिदीफिदी हसत असल्याचा भास त्याला झाला, पण त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. सहाच्या सुमारास सुहास्य वदनाने न्यायमूर्तींनी कक्षात प्रवेश करत ‘जय यमाईदेवी’ म्हणून अभिवादन करताच या नवख्या अधिकाऱ्याने ‘गुड ईव्हिनिंग सर’ हा शब्द तोंडातच गिळला. आता चर्चा सुरू होईल, त्यातील वस्तुस्थिती व कायद्यातील कलमांवर चर्चेचा कीस पाडला जाईल असे त्याला वाटले पण झाले भलतेच. या ‘वीकेण्ड’ला मी या देवळात गेलो, तिथली मूर्ती खूप सुंदर आहे. तिकडच्या देवळात आदिशक्तीचा सुवास दरवळतो.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : पन्नू, निज्जरविषयी खुलासे करावेतच.

अमूक देवी नवसाला पावणारी आहे. तमूक देवाचा कौल अचूक असतो, असे न्यायमूर्ती भरभरून सांगू लागले तेव्हा आपण पुजाऱ्याकडे कामाला आहोत की काय, असा प्रश्न या अधिकाऱ्याला पडला पण विचारण्याचे धाडस मात्र झाले नाही. इतर अधिकारी त्याच्याच चेहऱ्याकडे बघत असल्याचे त्याला जाणवले. मग न्यायमूर्तींनी एकेक फाइल पुढ्यात घ्यायला सुरुवात केली. हे बघून उत्साहात आलेल्या नवख्याने टिपणाचा कागद समोर केला, पण त्यांनी त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. उलट, डोळे मिटून न्यायमूर्ती काही क्षण ध्यान लावल्यासारखे बसले. मग अचानक त्यांनी त्यातल्या दहा फायली देवघरात नेऊन ठेवण्याचे निर्देश दिले. बाजूलाच असलेल्या शिपायाने तत्परतेने ती कामगिरी पार पाडली. नंतर ते देवघरात गेले. संधी साधून या अधिकाऱ्याने इतरांना हे काय म्हणून विचारले. त्यावर एक जुनाजाणता उद्गारला. ‘९ नोव्हेंबर २०१९ला अयोध्येचा निकाल दिल्यापासून सरांनी निवाड्यासाठी हीच पद्धत अनुसरली आहे. ते काहीही वाचत नाहीत.

फायली देवासमोर ठेवून कौल मागतात. तो मिळाला की कोणत्या प्रकरणात काय निवाडा करायचा ते सांगतात. मग आपण साऱ्यांनी तो कायद्याच्या कक्षेत बसवायचा.’ हे ऐकून नवख्याचे डोळे विस्फारले. इथे काहीतरी नवे शिकायला मिळेल, असे त्यालाही वाटले होते पण जे अनुभवतोय ते कल्पनेपलीकडचे नवे! त्याच्या चेहऱ्यावरली चिंता पाहून आणखी एक जुना म्हणाला ‘काळजी करू नको, सवय होईल तुला. या बंगल्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या न्यायदानाच्या तऱ्हा वेगळ्या असतात. आताचे सर फारच देवभोळे आहेत.’ तेवढ्यात प्रसन्नचित्ताने न्यायमूर्ती बाहेर आले. हे बघताच शिपायाने दुधाचे वाडगे व लाह्यांचे ताट त्यांच्यासमोर ठेवले. मग खाताखाता ते म्हणाले ‘मी इतर कुठल्याही देवाणघेवाणीपेक्षा देवाशी देवाणघेवाण करण्यावर विश्वास ठेवतो. शेवटी देवाचा कौल कधीही श्रेष्ठच.’ तेवढ्यात या नवख्याने भीतभीतच त्यांच्यासमोरच ठेवलेली महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाची फाइल वर काढून दाखवली. त्यावर हसत न्यायमूर्ती म्हणाले ‘यावर देव काय कौल देणार हे ठाऊक आहे मला. त्यामुळे सध्या तरी ती देवघरात ठेवायची नाही.’