‘अरे, समजतात काय हे स्वत:ला? पायाला भिंगरी लावून मी फिरलो. सत्ता मिळाली ती माझ्यामुळे आणि आता मलाच बदनामीच्या डागण्या देताहेत? त्या आधीच्या प्रमुखासारखा पडद्याआड लपणारा मी नाही. दोन हात करण्याची सवय अगदी टेंभी नाक्यापासून माझ्या रक्तात भिनलेली. नाथांचा नाथ आहे मी. आवडतीचे नावडती करता काय मला. थोडा काळ जाऊ द्या, दाखवतोच तुम्हाला. आधी खुर्ची हिसकावली. आता बसलोय त्या खुर्चीचे पाय मोडायला निघालात? १३३ जागा कशा मिळवल्यात ते ठाऊक आहे मला. अनावर झाले तर सारी गुपिते फोडायलाही मागेपुढे पाहणार नाही मी.’ ठाण्यातल्या घरी शयनकक्षातील आरशासमोर उभे राहून ते तावातावात बोलत होते.
तेवढ्यात गोगावले, शिरसाठ आदी मंडळी भेटायला आल्याची वर्दी आली. रागाने थरथरणाऱ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून ते खालच्या दालनात आले. ‘हं, बोला’ असे म्हणताच एक मंत्री म्हणाले, ‘साहेब, आता नुकतीच सुरुवात झालेली, तेव्हा जरा दमाने घ्यावे. त्यांच्याकडे रोख जाईल अशी वक्तव्ये टाळावीत.’ हे ऐकताच त्यांचा चेहरा पुन्हा रागाने लालबुंद झाला. ‘अरे किती काळ दमाने घेणार? आधीचे सारे विसरून सत्तेची वाटणी झाली ना! मग जुन्या खपल्या काढण्याची गरजच काय त्यांना? आम्ही भ्रष्ट व हेच तेवढे स्वच्छ अशी वातावरणनिर्मिती करू लागलेत ते. जाणीवपूर्वक. तुम्हीच सांगा हे वास्तव आहे काय? यांच्याही कुंडल्या आहेत की आपल्याजवळ. अडीच वर्षे थांबा असे चाणाक्याने म्हटले म्हणून मी शांत बसलो.
मग त्यांनीही शांत बसावे ना! कशाला एकेक निर्णय रद्द करताहेत ते. जे काही चालले ते वाईट हेतूने. तरीही मीच शांत बसायचे?’ यावर दुसरे मंत्री म्हणाले, ‘आता कुठे आपण स्थिरस्थावर होतोय. काही काळ शांत बसू. मग काय ते ठरवू.’ हे ऐकताच ते पुन्हा भडकले. ‘तुम्हाला तुमच्याच खुर्चीची पडली आहे. एक दिवस ते आपल्या साऱ्यांच्याच खुर्च्या काढून घेतील. मग या आमच्या पक्षात असे म्हणतील. आहे का तुमची तयारी? एक लक्षात ठेवा. जोवर तुम्ही आपल्या या अधिकृत सेनेत आहात तोवरच तुमची ठाकूरकी आहे. तिथे गेलात तर वाघाची शेळी होऊन राहावे लागेल. गवत खातानासुद्धा दहादा विचार करावा लागेल. त्यांचा पक्ष बाहेरून जेवढा चांगला दिसतो तसा आतून नाही. त्यांच्यातले अनेक जण माझ्याकडे येऊन एकाधिकारशाहीचे रडगाणे गातात.’ हे ऐकताच सारेच शांत झाले. हे बघून ते सुखावले. इतक्या स्पष्ट शब्दांत सांगितल्यामुळे आता काहीही केले तरी पक्ष फुटत नाही, हे लक्षात आल्यावर बदनामीची मोहीमसुद्धा थंडावेल असेही त्यांना क्षणकाळ वाटून गेले. तेवढ्यात एक आमदार आले.
‘आम्ही साऱ्यांनी एकत्र येत बदनामीची मोहीम थांबवा असे आवाहन करायचे का?’ हे ऐकताच जमलेल्या मंत्र्यांनी मान खाली घातली. हे लक्षात येताच आमदारांना चेव चढला व प्रत्येक जण यासाठी परवानगी द्या असे म्हणू लागताच गोंधळ वाढला तसे ते पुन्हा जोरात गरजले. ‘नाही. आधीची लढाई मी एकटाच लढलो व आताचीही मीच लढेन. तुम्ही तुमच्या फायद्याच्या गोष्टी तेवढ्या बघा. राज्यात चिमटे काढण्याचे काम सुरू ठेवून दिल्लीला कसे खूश करायचे ते मला ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. फक्त गद्दारीचा विचार मनात येऊ देऊ नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे. जा आता’ असे सांगून ते उठले व पुन्हा वर जाऊन आरशासमोर उभे राहिले.