नेहमीप्रमाणे भरलेला भक्तांचा दरबार ऐन भरात असताना एक शिष्य लगबगीने येऊन बाबा बागेश्वरांच्या कानात कुजबुजला. ‘दिल्लीहून चाणक्यांच्या कार्यालयातून फोन आहे’ हे ऐकताच बाबा ताडकन उठले. यांच्याच सांगण्यावरून आपण चेंगराचेंगरीत मेलेल्यांना मोक्ष मिळाल्याचे वक्तव्य केले. त्यावर या अविमुक्तेश्वरानंदांनी थेट आव्हानच दिले. या गंगेत, मारतो धक्का व मोक्ष मिळवून देतो म्हणून. आता यावर हे चाणक्य पुन्हा कामाला लावणार असे म्हणत त्यांनी फोन घेतला. ‘ये देखो बाबा, हा जो कुणी अविबाबा आहे, तो सतत आपल्या विरोधात गरळ ओकत असतो. बाकी सारे साधूसंत आपल्या बाजूने झालेत. हाच जरा वाकडा चालतोय. आता याला सरळ करण्याची नामी संधी आलीय. तुम्ही फक्त त्याचे आव्हान स्वीकारा. बाकी घाटावरचे आम्ही बघून घेऊ.’ हे ऐकताच बागेश्वरांचे डोळे चमकले. त्यांनी लगेच आजूबाजूला घुटमळत असलेल्या दांडकेश्वरांना बोलावून आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले.

वृत्त प्रसारित होताच वाहिन्यांवर बातम्यांचा भडिमार सुरू झाला. मोक्ष म्हणजे काय यावर अनेक साधू एका सुरात बोलू लागले. साहजिकच मृत्यूच्या तांडवाचा मुद्दा मागे पडला. आव्हान स्वीकारण्याची तारीख जशी जवळ येऊ लागली, तशी बाबाच्या आश्रमात नव्या चेहऱ्यांच्या भक्तांची गर्दी जमू लागली. ‘त्यांनी धक्का देण्यास माझी काही हरकत नाही. त्यानंतरही मी पाण्यात पडलो नाही तर आमचे भक्त त्यांना धक्का देतील. या लढाईत खरोखर कुणाचा कपाळमोक्ष होईल ते जनतेला लवकरच कळेल,’ असे बाबा म्हणू लागले तर त्याला प्रत्युत्तर देताना अविबाबांनी ‘मृत्यू हा सरकारप्रणीत असू शकतो, पण मोक्ष मिळवून देण्याचे काम सरकारचे नाही. त्यामुळे या वादापासून यंत्रणेने दूर राहावे. लुडबुड करू नये’ असे आवाहन करण्यास सुरुवात केली. यावर चिडलेल्या बागेश्वरांनी ‘सध्याचे सरकार सर्वशक्तिशाली आहे. त्यांच्याकडे असलेली शक्ती जन्ममृत्यूचा फेरा पुसून टाकेल एवढी आहे. त्यामुळेच ३० भाविकांना मोक्ष मिळाला या मतावर मी ठाम आहे.

सरकारशिवाय इतर कुणीही साधूसंत मोक्ष मिळवून देऊ शकत नाहीत, हे सिद्ध करण्यासाठीच आम्ही घाटावर येणार आहोत. सरकारचे समर्थन करणाऱ्याला साधा धक्का देण्याची हिंमत आज कुणात नाही. जो ती करेल तो मृत्यूच्या दाढेत जाईल. मोक्षाचा विचारही त्याने करू नये’ असे प्रत्युत्तर देऊन वाकयुद्धात रंगत आणली. हे ऐकल्यावर अविबाबा थोडे चिंतेत पडले. या आव्हानाच्या आडून आपला ‘गेम’ करण्याचा सरकारचा विचार तर नसेल या शंकेने त्यांना ग्रासले. आता काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार करून त्यांनी पिठातील समर्थकांना गोळा केले व मी मृत्यू तसेच सत्तेला घाबरणारा नाही, असे जाहीर केले. मग तो दिवस उजाडला. पहाटे चारपासूनच दोन्ही बाजूंचे भक्त ‘धक्कास्थळी’ जमू लागले. बागेश्वरांच्या भोवती पाचशे पोलिसांचे कडे होते तर अविबाबा त्यांच्या मोजक्या समर्थकांसह हजर झाले. ठरलेल्या मुहूर्तावर अविबाबांनी बागेश्वरांना धक्का देताच ते जसे पाण्यात पडले तसे पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. इथे पोलीस कशाला असे अविबाबांनी विचारताच बागेश्वर भक्त त्यांच्यावर तुटून पडले. ते बघून पोलीस बागेश्वरांना सोडून तिकडे धावले. तसा शंभरेक जणांचा एक समूह अचानक समोर आला व त्यांनी ‘थांबा तुम्हाला मोक्ष दाखवतो’ असे म्हणत बागेश्वरांना पाण्यात बुडवायला सुरुवात केली. जिवाच्या भीतीने ते ‘बचाओ’ म्हणून ओरडू लागले. कशीबशी त्यांची सुटका केल्यावर पोलिसांनी त्या समूहाला ताब्यात घेऊन विचारणा केली तेव्हा कळले की त्यातले सारे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे आप्त होते.

Story img Loader