‘तशी मी स्वत:हून फारशी कधी व्यक्त होत नाही. माझ्या माध्यमातून जे लोक व्यक्त होतात ते न्याहाळणेच माझ्या नशिबी. निवडणुकीच्या काळात तर मी कमालीची शांत असते. माझ्या पोतडीतल्या जहाल शब्दांचा वापर अनेकदा उबग आणत असतो. तरीही मी मौन ढळू देत नाही. मात्र आज मला बोलणे भाग पडतेय. त्याला कारण ठरले ते काँग्रेसचे जयराम रमेश यांचे वक्तव्य. अचानक त्यांना माझा कळवळा का आला असेल? प्रचारातला मुद्दा होण्याएवढा माझा प्रश्न मोठा आहे का? हा मुद्दा चर्चेत आणल्याने किमान दोन आकड्यातली मते तरी काँग्रेसकडे वळतील का? मतदारांच्या खिजगणतीत मी आहे का? अनेक प्रश्नांनी मी हैराण झाले. एकीकडे माझ्याविषयीची काळजी इंग्रजीतून वाहणाऱ्या जयरामांविषयी मला प्रेमही दाटून आले तर दुसरीकडे यांच्याकडचे राजकारण फिरवणारे मुद्दे संपले की काय अशी शंकाही मनी चाटून गेली.
तर, प्रश्न माझ्या अभिजात दर्जाविषयीचा. केंद्र सरकार का देत नाही हा रमेश यांचा आक्षेप. पण जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा तरी काय झाले? चार भाषांना तेव्हा दर्जा दिला म्हणता मग माझी बोळवण नुसती समिती स्थापून का केली? तेव्हा माझ्या वाट्याला आला तो केवळ दुस्वास. कधी माझ्या पातळीवर तर कधी माझा वापर करणाऱ्या नेत्यांच्या पातळीवर. हिंदी आई व मी मावशी अशी तेव्हाची वचने म्हणजे नुसती बोलाची कढी व बोलाचा भात! दहा वर्षे हिंदी, गुजराती व मल्याळमसाठी पायघड्या घातल्या जात असताना माझी आठवण झाली नाही. निवडणूक येताच प्रेम ऊतू चालले. हे कसे काय हो रमेश? तुम्ही तर मुंबईत शिकलात, वावरलात. तेव्हा माझे प्राचीनत्व कधी ध्यानात आले नाही का?
हेही वाचा >>> अन्वयार्थ : नारीशक्तीचा सन्मान’ अशाने वाढतो का?
अहो, मरो तो तुमचा दर्जाबिर्जा! दोन हजार दोनशे वर्षांची आहे मी, ज्ञानेश्वरी हाती घ्या, तुकोबाची गाथा चाळा, एकनाथी भागवतावर नजर टाका, विवेकसिंधू वाचा. मी कायम आहे, लिखित व बोली स्वरूपात. अकराव्या शतकापासून माझ्या स्वरूपात बदल होत गेले, पण आत्मा तसाच राहिला. ताजा व टवटवीत. बदलत्या काळात अनेकदा माझ्या वाट्याला अवहेलनाही येत गेली. कुणा हिरेव्यापाऱ्याला माझा वापर करणारी व्यक्ती नोकरीत नकोशी तर कुठल्या गुजराती सोसायटीला माझ्या माध्यमातून व्यक्त होणारे कार्यकर्ते नको असतात. माझ्यावरून राजकारण आधीही सुरू होते व आताही. नेमके तेच मला नकोसे झालेले.
माझ्या बळावर मोठे झालेले नेते भाषिक संमेलनांत दर्जाच्या नावाने गळा काढतात. ‘पाठपुरावा सुरू’ असे खोटेनाटे का होईना पण सांगतात. माझ्यावर संशोधन व्हावे, सरकारी पाठबळ मिळावे, माझा जगभर प्रसार व्हावा असे मला वाटणे स्वाभाविक पण ते माझा वापर करणाऱ्या समाजातील प्रत्येकाला वाटायला हवे ना! त्यांनाच जर काही वाटत नसेल तर मी दु:ख करण्यात काय हशील? त्यामुळे रमेशजी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी प्रचारात याची दखल कुणी घेणार नाही. तरीही इतक्या व्यग्रतेत माझी आठवण काढल्याबद्दल मी तुमची आभारी आहे.’ – मी मराठी भाषा