यावर आमचा अलीकडेपर्यंत विश्वास नव्हता. तथापि नाना पटोले, संजय राऊत, दोन राणे (एक फुल नारायणराव आणि दोन हाफ त्यांचे सुपुत्र असे मिळून दोन), यांनी लावलेल्या दिव्यांचा प्रकाश कमी पडल्यास त्यावर स्वत:च्या अंधाराचे चांदणे पाडणारे दोन चंद्र (जसे की चंद्रकांत पाटील आणि दुसरे चंद्रशेखर बावनकुळे) इत्यादी मान्यवरांचे गेल्या काही महिन्यांतील वर्तन पाहिल्यावर आम्हांस खात्री पटली. की शाब्दिक अतिसार हे एक सत्य आहे आणि मानवप्राण्यांत त्याची साथ येऊ शकते. जसे की सध्याचा महाराष्ट्र. तथापि नियमित अतिसार आणि हा शाब्दिक अतिसार यांत अतिसारकता हे जरी समान सत्य असले आणि प्रसंगी दोन्हीमुळे वातावरण अशुद्ध होत असले तरी त्यात काही भेदही आहेत. ते असे..
१. शाब्दिक अतिसार हा मुखद्वाराद्वारे होतो. (नेहमीच्या अतिसाराचा मार्ग कोणता हे सांगण्याची गरज नसावी बहुधा) २. पारंपरिक अतिसार शरीराच्या दक्षिणगोलार्धास ग्रासतो तर शाब्दिक अतिसार मूलत: उत्तरगोलार्धी-म्हणजे मुखकेंद्री- आहे. ३. नेहमीच्या अतिसाराने रुग्णास अशक्तपणा येतो. पण शाब्दिक अतिसार इतरांस अशक्त करतो. ४. पारंपरिक अतिसार झाल्यास निर्माण होणारी दुर्गंधी घ्राणेंद्रियांस उद्ध्वस्त करू शकते. शाब्दिक अतिसार कर्णपटले, नेत्रपटले आणि तद्नंतर विचारपटले यांवर आघात करतो. ५. पारंपरिक अतिसारात ‘दाखवावे’ असे काहीही नसते. उलट शाब्दिक अतिसार मात्र थेट प्रक्षेपणाच्या लायकीचा असतो. ६. पारंपरिक अतिसार हा अशुद्ध पाणी वा अन्न यांतील विषबाधेने होतो तर शाब्दिक अतिसारास अशुद्ध वाणी आणि वैचारिक विषबाधा कारणीभूत ठरते. ७. नेहमीचा अतिसार टाळण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात. तथापि शाब्दिक अतिसाराचे तसे नाही. मनाचा निर्धार हाच एकमेव त्यावरील इलाज. पण त्यासाठी पोटातून घेता येतील अशी काही औषधे अद्याप तरी उपलब्ध नाहीत. ८. नेहमीच्या अतिसाराची काही दृश्य लक्षणे जाणवू शकतात. जसे की पोटात गुडगुडणे इत्यादी.
शाब्दिक अतिसाराचे मूळ डोक्यात असल्याने तो सुरू होण्याआधी तेथे गुडगुडते किंवा काय हे आम्हास माहीत नाही. (वर उल्लेखिलेले मान्यवर यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.) ९. शारीरिक अतिसाराच्या उत्तरखुणा राहतात. शाब्दिक अतिसाराबाबत रेकॉर्डिग वगळता तशा काही खाणाखुणा मागे राहात नाहीत. १०. आणि महत्त्वाचे: नैसर्गिक अतिसारानंतर साफसफाई करावी लागते. पण शाब्दिक अतिसार मात्र सारवासारवी करण्यास भाग पाडतो. — माध्यमांचे काम समाजास जागृत करणे हेही असल्याने मुखद्वार अतिसाराची सविस्तर माहिती येथे प्रसृत केली. यास रोखण्याच्या एका उपायाची खात्री संशोधक करीत आहेत असे कळते. — तो उपाय म्हणजे मुखपट्टी! — तिचा वापर अनिवार्य केल्यास या मुखद्वार अतिसारावर नियंत्रण मिळवता येईल असे काहींस वाटते तर काहींस नाही. तथापि या सर्वाचे एका मुद्दय़ावर मात्र एकमत: मुखद्वार अतिसारबाधित रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ..तेव्हा सावधान!!!