सकाळपासून काढत असलेल्या व्यंगचित्रावर शेवटचा हात फिरवून झाल्यावर त्यांनी कुंचला बाजूला ठेवून समोर बघितले तर बाळा व नितीन हातात मोठे बाड घेऊन उभे. वामकुक्षीच्या वेळेवर हे कशाला आले असा विचार मनात येताच त्यांचा चेहरा थोडा त्रासिक झाला. त्यांनी ‘काय?’ असे खुणेने विचारताच दोघेही उत्साहाच्या भरात बोलू लागले. ‘एक सही संतापाची’ या तुम्ही सुचवलेल्या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळाला. पाच लाख लोकांनी सह्या केल्या, आता आपले इंजिन रुळावर येणार असे एकाने सांगताच ते आनंदले. दुसऱ्याने लोकांनी स्वाक्षरी करतानाच प्रतिक्रियाही लिहून ठेवल्या असे म्हणताच ‘वाच’ असा आदेश त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोघांनी एकमेकांकडे बघत दबकतच सुरुवात केली. ‘एक सही महागडय़ा टमाटरसाठी घेतली असती तर काय बिघडले असते?, तुमचा एक आमदाराचा पक्ष फोडायला कुणी तयार होत नाही याचा संताप तुम्हाला आला का?, केव्हाच यार्डात गेलेल्या तुमच्या इंजिनाला कुणी विचारत नाही हा राग आहे का?, राजकारणातल्या चिखलातले जाऊ द्या पण तुमच्या पक्षात जो चिखल झालाय त्यातून कधी बाहेर पडणार?, सहीसाठी आम्हाला घराबाहेर काढता, तुम्ही कधी बाहेर पडणार हे आधी सांगा, तुमच्या मनात भावाविषयी धुमसत असलेल्या संतापाचे काय?, शिल्लक असलेला एक आमदार घरफोडय़ांनी पळवला तर पक्षही हातून जाईल या भीतीतून तुम्ही ही मोहीम हाती घेतली का?, आमच्या सह्या गोळा करून तुम्हाला हरवलेली ब्ल्यूप्रिंट  शोधायची की नव्याने तयार करायची आहे?, एकीकडे आमच्या संतापाची दखल घ्यायची व दुसरीकडे सत्ताधाऱ्यांशी खलबते करायची हा विरोधाभास नाही का?, पाहिजे तेवढय़ा सह्या गोळा करून देतो पण तुम्ही जुना १३ चा आकडा तरी गाठणार आहात काय?, आमच्या सह्या घेऊन तुम्ही दुसऱ्यांसाठी किती काळ भाषणे देत फिरणार?’ हे सर्व ऐकून रागाने ते म्हणाले, ‘थांब’. तशी दोघांची भीतीने गाळण उडाली. थोडा वेळ शांततेत गेल्यावर ‘हं, वाच’ असे म्हणताच पुन्हा दोघे सुरू झाले.

‘आमच्या संतापाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. तो कमी करायचा असेल तर तुम्ही दोन भावांनी एकत्र येणे गरजेचे’ हे ऐकून ते थोडे सुखावले. मग डोळय़ावरचा चष्मा नीट करत त्यांनी पुन्हा खूण केली. ‘सह्या घेण्यापेक्षा तुम्ही सभा घ्या. तुमचे बोलणे ऐकले की आमच्या संतापाची वाट मोकळी होते, पण सही केली म्हणून मत मागू नका. ते कुणाला द्यायचे ते ठरले आहे’ हे ऐकताच ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘हा नक्कीच तो काळी टोपीवाला असणार’ हे ऐकून दोघांना धीर आला व ते पुन्हा वाचू लागले. ‘सही दिली हो, पण तुमची राजकीय भूमिका नक्की काय? या वेळेस कुणाकडून किंवा कुणाच्या वतीने मैदानात उतरणार?, तुमची ती ‘लाव रे तो व्हिडीओ’वाली मोहीम कधी सुरू करणार? त्यातून होणारे मनोरंजन हाच आमच्या संतापावरचा उतारा, आमच्या सहीऐवजी सध्याच्या राजकीय चिखलावर एखादे व्यंगचित्र काढले तर बरे होईल’ हे सल्ले ऐकून कावलेल्या त्यांनी ‘आता बस्स’ असे म्हणताच दोघे थांबले. लोकांना नक्की कशाचा संताप आलाय? सध्याच्या राजकारणाचा की माझा व माझ्या पक्षाचा, असा प्रश्न त्यांना पडला व त्याचे उत्तर शोधण्यात ते गढून गेले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on maharashtra political crisis zws
Show comments