‘क्रिएटिव्ह टीमचा प्रमुख या नात्याने सर्वप्रथम मी हे कबूल करतो की ज्येष्ठांना तीर्थदर्शन घडवणाऱ्या योजनेच्या जाहिरातीत छायाचित्र वापरताना चूक झाली. त्यामुळे राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना जो मनस्ताप झाला त्यासाठी टीमच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. हे का व कसे घडले हे निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रप्रपंच! विधिमंडळात या योजनेची घोषणा झाल्यावर ४८ तासांच्या आत समाजमाध्यमांवर जाहिराती झळकल्या पाहिजेत, असे निर्देश मिळाले. एवढ्या कमी कालावधीत या जाहिरातीला साजेसा चेहरा शोधण्याचे आव्हान होते. टीममधील सर्व सहकारी आनंदी चेहरा असलेल्या ज्येष्ठांच्या शोधात राज्यात ठिकठिकाणी कॅमेऱ्यासह फिरू लागले. छायाचित्र घेण्याआधी त्यांनी अनेकांना विचारणा केली पण बहुतेकांनी नकार दिला.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : लोकसेवक की स्वयंसेवक?
‘लोकसभेतील पराभवानंतर तीर्थदर्शन आठवले का’, ‘या राजवटीत आम्ही अजिबात आनंदी नाही मग चेहऱ्यावर तो कसा आणणार?’, ‘हे सरकारच अवैध आहे, त्यांच्या योजनेत सहभागी होणार नाही’, ‘विश्वासघात करणाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा’ अशी उत्तरे मिळू लागली. जनमत चांगले नाही याची कल्पना आम्हाला १२ तासांतच आली, पण भरपूर रक्कम स्वीकारून हे कंत्राट घेतले असल्याने वस्तुस्थिती सांगण्याची सोय नव्हती. मग आम्ही ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संपर्क साधला. काही जुनी छायाचित्रे असतील तर ती द्या अशी विनंती केली पण बहुतेक कंपन्या या योजनेमुळे चिडल्या होत्या. याने आमच्या धंद्यावर परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे होते. मग आम्ही गरीब असलेल्या वस्त्यांमधील ज्येष्ठांचा शोध घेणे सुरू केले. तिथे आनंदी व समाधानी चेहरेच आढळेनात! महत्प्रयासाने एक- दोन वृद्ध सापडले पण जाहिरातीची कल्पना दिल्यावर त्यांनी मोठा मोबदला मागितला. त्यातल्याच काहींना आम्ही या योजनेचे पहिले लाभार्थी तुम्हाला करू असे आमिष दाखवले. त्यावर ‘आधी दर्शन घडवून आणा, मगच छायाचित्र वापरा. कुणावरही विश्वास ठेवू पण सरकारवर नाही’ अशी उत्तरे मिळाली. सत्तारूढ पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते शोधण्याचा प्रयत्न केला पण निरागस व आनंद भाव असलेला एकही जण सापडला नाही.
हेही वाचा >>> पहीली बाजू : राज्यात पर्यटन प्रोत्साहनासाठी नवे धोरण!
या उपद्व्यापात ३० तास उलटले. आता गूगलला शरण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. वादात अडकू असा चेहरा नको अशा सूचना सर्वांना दिल्या होत्या. कारण आधीच्या लाभार्थी योजनेतील जाहिरातीचा वाईट अनुभव गाठीशी होता. तरीही चूक झाली व बेपत्ता व्यक्तीचा चेहरा निवडला गेला. झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी आमची अख्खी टीम या बेपत्ता ज्येष्ठाचा शोध घेण्यासाठी फिरतेय. तो सापडलाच तर पुण्यात जंगी मनोमीलन सोहळा करून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उजळण्याचा ‘प्लान’ आम्ही तयार केला आहे. त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाला आपल्याकडून मंजुरी मिळेल अशी आशा आहे.’ पीआर एजन्सीकडून आलेल्या या पत्राचे गंभीरपणे वाचन केल्यावर सीएमओमधील सर्वांना एकच प्रश्न पडला तो म्हणजे ‘बेपत्ता ज्येष्ठ नागरिकाचा पत्ता निवडणुकीनंतर लागला तर?’