‘खात्याचा मंत्री म्हणून मी चंद्रावरची मोहीम यशस्वी केल्याबद्दल जमलेल्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. आजच्या बैठकीत आपण आगामी गगनयानवर चर्चा करणार आहोत. या मोहिमेत मी स्त्री रोबोट पाठवण्याची घोषणा केल्यावर देशभर अनेक वाद-प्रवाद नाहक निर्माण केले जात आहेत. त्याची बाधा तुम्हाला पोहचू नये, म्हणून मी आज ही बैठक बोलावली आहे. सर्वप्रथम रोबोटमध्ये स्त्री व पुरुष असा भेद नसतोच हा युक्तिवाद तुम्ही डोक्यातून काढून टाका. देशातील सर्वोच्च अशा सरकारने एकदा ठरवले की भेद करायचा तर त्यावर कुणीही आक्षेप घेण्याचे काही कारणच नाही. जोवर भेद निर्माण केला जात नाही तोवर सरकारी निर्णयाची चर्चा होत नाही व यशही मिळत नाही. या देशात ५० टक्के महिला मतदार आहेत. त्यांना हे सरकार आपलाही विचार करते असे वाटावे हाच व उदात्त दृष्टिकोन ठेवून ‘स्त्री रोबोट’ या शब्दाची निर्मिती करण्यात आली हे लक्षात घ्यावे. याचे ‘व्योममित्र’ हे नाव पुल्लिंगी आहे असा आक्षेप काही जण घेत असल्याचे माझ्या कानावर आले. शब्दांचे लिंग ठरवणारे व्याकरण आता विसरा. सरकारने एकदा ठरवले की हा शब्द स्त्रीलिंगी तर तशाच अर्थाने तो वापरायलाच हवा. ‘व्योम’ म्हणजे आकाश. त्याला गवसणी घालण्याचे काम स्त्रीच करू शकते, अशी संकल्पना विश्वगुरूंनी मांडल्यानंतर हे नाव निश्चित झाले.
हेही वाचा >>> चांदनी चौकातून: भाजपमधील ‘व्हायरल
नामकरणाचे सर्वाधिकार सरकारने स्वत:कडे राखून ठेवले आहेत. भलेही अमेरिकेतून का होईना पण सुनीता विल्यम्स व कल्पना चावला अंतराळात गेल्या. मग भारताने स्त्री रोबोटपासून सुरुवात केली तर स्वागतच करायला हवे. स्त्रीदाक्षिण्य जपण्याचा हा आधुनिक मार्ग आहे हे सर्वानी मनावर बिंबवावे. ही स्त्री रोबोट साडी नेसलेलीच असावी. भारतीय संस्कृतीचा व भारतमातेचा विचार करता दुसरा पेहराव नको. शरीरभर लागलेल्या उपकरणांना काम करण्यात साडीमुळे अडथळा येईल हा आरोपही चुकीचा. ती साडीच अशी तयार करा की उपकरणे सहज काम करू शकतील. यासाठीचे तंत्रज्ञान तुमच्याकडे आहेच. रोबोटच्या कपाळावर सर्वाना दिसेल अशी टिकली अथवा कुंकवासमान भासणारा टिळा असायलाच हवा. कुंकू हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक याची जाणीव सर्वानी ठेवणे गरजेचे. या रोबोटच्या हातात बांगडय़ा पण हव्यात. त्याचा किणकिणता नाद साऱ्या जगाला ऐकू गेला पाहिजे अशी सरकारची मनीषा आहे. या बांगडय़ांमुळे रोबोटला काम करण्यात अडथळे येतील, अशी अटकळ काही जण बांधत असले तरी त्याला अर्थ नाही. या बांगडय़ा विशिष्ट प्रकारच्या काचेपासून निर्माण करण्याचे कसब तुम्हाला दाखवावे लागेल. रोबोटच्या डोक्यावर लांबसडक केस हवेतच. बॉबकट रोबोटची कल्पना सरकार खपवून घेणार नाही. हा केशसंभार ठळकपणे दिसायला हवा. त्यामुळे रोबोटच्या दैनंदिन कामात अडचण येणार नाही याची दक्षता घेणे तुमचे काम. चला तर आता कामाला लागा, येत्या मार्चपूर्वी या रोबोटची प्रतिकृती आपल्याला जनतेसमोर आणायची आहे.’ हे उद्बोधन संपताच बैठक संपली. नंतर एकेक शास्त्रज्ञ संस्थाप्रमुखाकडे जाऊन म्हणू लागले ‘या मोहिमेपासून आम्ही दूर राहू इच्छितो.’ बघता बघता त्यांची संख्या शंभरी पार करून गेली.