प्रति,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मा. झोनल अधिकारी

मी अमुक अमुक शासनाच्या लेखा व कोषागार खात्यातील एक कर्मचारी असून सध्या आपल्या निर्देशानुसार हेलिकॉप्टर व विमानांच्या तपासणीसाठी तैनात आहे. चार दिवसांपूर्वी मी प्रचारदौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमधील सामानाची तपासणी केली. हे कर्तव्य पार पाडताना मी कुठलाही नियमभंग केला नाही. तपासणीदरम्यान विस्कटलेले त्यांचे सामान व्यवस्थित लावून दिले. त्यांनी या तपासणीचे चित्रीकरण करून ती फीत समाजमाध्यमांवर टाकली तेव्हापासून माझी मन:स्थिती बिघडवणाऱ्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. त्यांच्या पक्षाचे काही सैनिक मला शोधत घरापर्यंत आले. ‘‘आमच्या साहेबांची बॅग तपासतो काय? थांब, सरकार आले तर तुला दाखवतो’’ अशी धमकीवजा भाषा वापरून निघून गेले. तेव्हापासून या पक्षाची प्रचार रॅली रोज माझ्या घराजवळ दीर्घकाळ थांबते व जोरदार नारेबाजी करते. यामुळे कुटुंब घाबरले आहे.

दुसऱ्या सेनेच्या सैनिकांना हे कुठून कळले कुणास ठाऊक पण त्यांचेही कार्यकर्ते घरी आले व ‘‘आम्ही पाठीशी आहोत असा धीर दिला. हेलिकॉप्टरमधील बॅगेत आणखी काय काय होते? डब्यात मासे होते का? घाबरून जाऊन तू काही लपवाछपवी केली का?’’ असे प्रश्न विचारून त्यांनी मला भंडावून सोडले. नंतर सत्ताधाऱ्यांमधील सर्वांत मोठ्या पक्षाचे काही पदाधिकारी आले व त्यांनी खूपच महत्त्वाची कामगिरी बजावली म्हणून चक्क माझा सत्कार केला. ‘‘तुझी एक कृती प्रचाराचा फोकस बदलण्यासाठी पुरेशी ठरली आहे. या तपासणीमुळे त्यांच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. आता ते बरळू लागले आहेत. हेच आम्हाला हवे होते. या निवडणुकीचा अज्ञात ‘हिरो’ तूच आहेस. सत्तेत आल्यावर तुझी सगळी काळजी घेऊ. कार्यालयात ‘चांगला’ टेबल तर नक्कीच मिळवून देऊ,’’ असे सांगून निघून गेले. जाताना ‘‘गरज वाटली तर तुझ्या घराच्या सुरक्षेसाठी दोन तगडे कार्यकर्ते २४ तासांसाठी तैनात करू,’’ असेही म्हणाले.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड

या प्रकारामुळे माझ्या कुटुंबातील वातावरण बिघडून गेले असून सर्वजण भीतीच्या छायेत आहेत. या तपासणीनंतर मला राज्यात फारसे परिचित नसलेल्या नेत्यांचे फोन येत आहेत. ते मला आमिषे दाखवू लागले आहेत. एकाने ‘‘मी हेलिकॉप्टर घेऊन तिथे येतो. माझी तपासणी करा. त्याची चित्रफीत मी समाजमाध्यमावर टाकतो. त्यामुळे माझी प्रतिमा मोठी होईल व मलाही राज्यातील महत्त्वाचा नेता म्हणून ओळख मिळेल,’’ असे सांगितले. सध्या हा नेता आज किंवा उद्या हेलिकॉप्टरची व्यवस्था होईल असे सतत फोनवरून सांगत मला भंडावून सोडतो आहे. दुसऱ्या एकाने ‘‘मी हेलिकॉप्टरने येताना पन्नास हजार पाचशेे रुपये घेऊन येतो. आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा पाचशे जास्त. ते तुम्ही जप्त करायचे. मग मी आकांडतांडव करेन व मला प्रसिद्धी मिळेल,’’ असे सांगितले. यामुळे मी त्रस्त झालो असून निवडणूक ड्यूटी असल्याने फोनही बंद ठेवता येत नाही. एकच विनंती आहे की मला या तपासणीच्या कामातून मुक्त करावे. मी अन्य कोणतेही काम करायला तयार आहे.

आपला एक कर्तव्यदक्ष कर्मचारी

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article on uddhav thackeray chopper checking zws