‘‘खास मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पुणेरी टोमणे स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक या नात्याने समस्त पुणेकरांचे आभार. या स्पर्धेसाठी लाभलेले तीनही परीक्षक अस्सल पुणेकर. त्यातल्या एकाला मी निकालाआधीच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो.’’ घोषणा होताच जाड भिंगाचा चष्मा सावरत एक परीक्षक बोलू लागले. ‘‘नमस्कार, खवचट-गोड बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन आज झाले. तरीही काही साधक-बाधक निरीक्षणे नोंदवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. ‘दोन तास उभे राहून चाळण्याच्या बहाण्याने पुस्तक वाचण्यातून तुमची वाचनातील आस्था दिसली, पण तुमच्या खिशाची दयनीय अवस्थाही लक्षात आली’ हा विक्रेत्याने वाचकाला मारलेला टोमणा मला नवा वाटला. भोजनसमयी घरी आलेल्या पाहुण्याला ‘तुम्ही जेवूनच आला असाल’ म्हणत चहा देणे चिरंतन असले तरी आता त्यातली खोच सर्वांना कळल्यामुळे नवनिर्मितीकडे लक्ष द्यावे. ‘तुमचा मोहोळ तर आमचा मारणे’ हा मला सद्य:स्थितीवर भाष्य करणारा उत्कृष्ट टोमणा वाटला. यातून पुण्याची वाटचाल नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहे याचे यथार्थ दर्शन झाले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : आयोवात ट्रम्पयुगाची नांदी!
पुण्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ‘रेशीमबागेपेक्षा सारसबागेत येत जा, पुणेकर जास्त आनंदाने स्वीकारतील’ हा मला खूपच चपखल व अचूक राजकीय भाष्य करणारा वाटला. पुणेकरांच्या प्रतिभेला तोड नाही हे यातून स्पष्ट झाले. ‘टोमणे मारण्याच्या बाबतीत तुम्ही स्वत:ला छत्रपती समजत असाल पण कुठलाही सामान्य पुणेकर तुमच्यापेक्षा जहाल टोमणा मारू शकतो’ हे एका स्पर्धकाचे वाक्य खूपच लांबलचक व त्यातून टोमण्यापेक्षा राजकीय दु:स्वास जास्त दिसला. ‘चहा हळुवार प्या, फुर्र फुर्र करत पिऊ नका. यावरून तुम्ही विदर्भातील आहात हे लक्षात येते’ हाही चांगला प्रयत्न होता पण यात एकटया विदर्भाचेच नाव का हे कळले नाही. अन्य काही प्रदेशांतसुद्धा अशी फुर्र फुर्रची पद्धत आहे. त्याचाही विचार व्हायला हवा होता. ‘बारामतीपेक्षा आमच्या करामती मोठया’ हा तसेच ‘तोतरे बोलणे चालेल पण गाठोडे सांभाळून ठेवा’ हे दोन्ही सद्य:स्थितीवर भाष्य करणारे होते. मात्र शारीरिक व्यंगावर स्पर्धकाने जाऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. ‘निदान आपल्या दाढीतील केसाइतकी तरी योजना जाहीर करा’ याला सरस टोमणा निश्चितच म्हणता येईल. ब्युटीपार्लरमधून आलेल्या पत्नीला ‘आज पार्लर बंद होते का’ असे विचारणारा पती, हा टोमणा जुना असला तरी सार्वकालिक सत्याचे दर्शन घडवणारा. त्यामुळे तो ऐकताना मजा आली. पुण्यात फिरफिर फिरले पण नाटय संमेलनाचे स्थळ काही सापडले नाही असा टोमणा मारणाऱ्या वंदना गुप्तेंना ‘पुण्यात कोणतेच स्थळ गुप्त राहात नाही’ हा मारलेला प्रतिटोमणा पुणेकरांची बौद्धिक उंची दाखवून देणारा. ‘नक्की काय करायचे आहे? ब्रश की तोंडात यज्ञ’ तसेच वारंवार घरची बेल वाजवणाऱ्यांसाठी असलेला ‘घरात माणसे राहतात, स्पायडरमॅन नाही’ हे दोन्ही जुने झाले आहेत, हे स्पर्धकांनी लक्षात घ्यावे. काहींना पुणेरी पाटया व टोमण्यांमधला फरक कळला नाही. असो, एकूण स्पर्धा छान झाली. आता निकाल जाहीर करण्यासाठी ध्वनिक्षेपक आयोजकांकडे देतो.’’