प्रिय मर्त्य मानवांनो, आम्हा गिधाडांची संख्या वाढावी म्हणून तुम्ही जे प्रयत्न सुरू केलेत, पुण्याजवळ एक प्रजनन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केलात, त्याबद्दल खूप खूप आभार. तसे बघायला गेले तर या भूतलावरचे आम्ही सर्वात पहिले सफाई कामगार. आमचे काम निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचे. संतुलन राखण्याचे. मात्र तुम्ही कधीही आमच्या संवर्धनाकडे फार लक्ष दिले नाही. तसा आव अनेकदा आणला, पण डायक्लोफेनॅकसारख्या विषारी औषधांचा मारा करून आमची मूत्रिपडे निकामी करण्यातच तुम्ही धन्यता मानली. मुळात आमच्याकडे बघण्याची तुमची दृष्टीच कधी सरळ नव्हती. इतर प्राणी, पक्ष्यांकडे मायेने बघणारे तुम्ही, त्यांना पुजणारे व त्यांच्यावर कविता करणारे तुम्ही, आमची तुलना मात्र कायम तुमच्यातील दुष्प्रवृत्ती जोपासणाऱ्या माणसांशी करत राहिलात. कारण काय तर आम्ही मांसाचे लचके तोडतो म्हणून? होय, आम्ही तोडतो लचके, पण मृतदेहाचे. तुम्ही तर तुमच्याच जिवंत बांधवांचे लचके तोडण्यात धन्यता मानली. मग ते श्रीमंतांनी गरिबांचे तोडलेले असोत वा ‘आहे रे वर्गाने नाही रे’चे तोडलेले असोत. हे करताना तुमचा स्वार्थ होता, वर्चस्ववादी वृत्ती होती.
हेही वाचा >>> उलटा चष्मा: बदली आदेश तुमच्या दारी
आम्ही मात्र मांसभक्षणाचे काम नि:स्वार्थ व प्रामाणिक भावनेने सतत करत राहिलो. आमच्या नजरेलाही तुम्ही दूषण म्हणून वापरले. मात्र हे करताना तुम्हाला तुमच्या नजरेतला विखार, द्वेष, धर्मवेडेपण, वासना कधी दिसली नाही. निसर्गाच्या साखळीतला श्रेष्ठ मानवच, इतर कुणी नाही या भावनेतून तुमच्याच मनात फुलत गेलेल्या विकारांकडे तुम्ही कायम दुर्लक्ष केले. या साखळीतला प्रत्येक घटक महत्त्वाचा याची जाणीव तुम्हाला दीर्घकाळ झाली नाही. उंचावरून नजर ठेवत धाड घालणे हा आमच्या कर्तव्याचा भाग. तुम्ही मात्र कधी शत्रू तर कधी विरोधकांवर पाळत ठेवत धाडी घालण्यात धन्यता मानली. आम्ही कर्तव्य संपलेल्या कलेवरांना मोक्ष देण्याचे काम करत राहिलो, तुम्ही मात्र मोक्षाच्या नवनव्या संकल्पना रुजवण्यात व्यग्र राहिलात. आमच्या कामावरून तुम्ही आम्हाला नीच ठरवण्याचा कृतघ्नपणाही अनेकदा केला, पण तुमच्यात कमालीच्या वेगाने वाढत चाललेल्या नीच प्रवृत्तीकडे मात्र लक्ष दिले नाही. धर्मसुधारणांचा आग्रह धरणाऱ्या आद्य शंकराचार्याचे उदाहरण आठवा. त्यांच्या आईचे निधन झाले तेव्हा खांदा द्यायला तयार न होणारे तुम्हीच होतात.
अखेर प्रेत घेऊन बसलेल्या या थोर विभूतीच्या मदतीला आमचे पूर्वज धावले व मोठय़ा संकटातून त्यांची सुटका केली, ही कथा आठवत नाही? आमचे भक्ष्य निर्जीव. तुम्ही मात्र सजीव व सजातीयांना भक्ष्य समजून त्यावर तुटून पडण्याची वाईट प्रवृत्ती अंगीकारली. एखाद्या अबलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या कृत्याची तुलना करताना तुम्ही ‘गिधाडांसारखे तुटून पडले’ अशा शब्दांत संभावना केली, पण आम्ही मात्र तुटून पडताना अनेक पथ्ये पाळत राहिलो. आमच्या निर्जीव शरीराला खाणारे तुम्ही कोण असा आविर्भाव तुम्ही कायम अंगी बाळगला. आम्ही याकडे दुर्लक्ष करून कमी संख्येत का होईना पण आमची नियत कर्तव्ये पार पाडत राहिलो. आम्ही दिसतच नाही असा कांगावा करून तुम्ही मृतदेह नष्ट करण्याच्या अनेक नवनव्या पद्धती विकसित करून प्रदूषणात भर घातली. आम्ही मात्र जमेल तसे, जमेल तिथे आमचे काम निष्ठेने करत राहिलो. आता तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण? माणूस की गिधाड?