‘रत्नागिरी नगरीतील थिबा महालासमोर आज जमलेल्या हापूस कुलोत्पन्नांतील सर्वाचे मी स्वागत करतो. आमच्या विनंतीला मान देऊन कर्नाटकातील सदस्यसुद्धा मोठय़ा संख्येने सहभागी झाले याचा अत्यानंद आम्हा कोकणींना झाला आहे. सध्या आपल्यावरून मानवजातीने निर्माण केलेल्या वादावर विचार करण्यासाठी आपण येथे जमल्याचे तुम्ही सर्व जाणताच. वादाचे विषय अपुरे पडू लागल्यानेच माणसांनी आता फळांकडे लक्ष वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रंग, रूप व वाणांवरून भेद करण्याची मानवी परंपरा आपल्या कुळात नाही याची जाणीव या मर्त्यांना करून देण्याची वेळ आली आहे. माणसांची ठेवण, रंग, चेहरा प्रांतनिहाय वेगळा असतो तसे आपल्याही बाबतीत घडू शकते हे सत्य ही जमात विसरली आहे. पश्चिम घाट एकच असला तरी प्रत्येक ठिकाणचे वातावरण वेगळे आहे याची कल्पना माणसांना येऊ नये याचे आश्चर्य वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिकल्यावर आपण कोणत्या पेटीत विसावतो, आपल्याभोवती लपेटलेले वर्तमानपत्रीय कागद कोणत्या भाषेतले असतात, ते मराठी असतात की कानडी, पेटीवर देवगड लिहिले असते की अन्य काही यापैकी एकाही प्रश्नाशी आपला संबंध नसतो. चतुर माणूस हे सारे घडवतो व त्याचा फटका मात्र आपल्याला सहन करावा लागतो. ‘परवा येथे जे घडले ते आपल्या कुळावर अन्याय करणारे आहे.’- या वाक्यावर वक्त्याला मध्येच थांबवत कर्नाटकातून आलेले काहीजण कुळाच्या चोपडय़ा दाखवून कानडीत जोरजोरात बोलू लागले. आपण कसे एककुलीन आहोत असे त्यांचे म्हणणे!  मग देवगड व रत्नागिरीचा एक गट देठ ताठ करून उभा राहिला. ‘तुम्ही संकरित, मूळचे आम्हीच. आम्ही चोपडय़ा आणायला विसरलो असलो तरी वंशाचा इतिहास आम्हाला पाठ आहे.

कानडय़ांनी कोकणच्या सुपुत्रांना कुळाचार शिकवण्याची गरज नाही,’ असे हा गट सांगू लागला. प्रकरण हातघाईवर येत आहे हे बघून वक्ता आकांताने ओरडलाच, मारामारी कराल तर अंगावर डाग पडतील. बाजारातील किंमत कमी होईल.’ हे ऐकताच कोकणी गट पटकन शांत झाल्याचे पाहून, कानडींनीही चोपडय़ा आत ठेवल्या. वक्ता पुन्हा बोलू लागला. ‘चलाख मानवाने निर्माण केलेल्या अस्मितेच्या राजकारणाचा परिणाम आपल्यावर होणे हे वाईट. आपला जन्मच मुळी चवीच्या माध्यमातून लोकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी झाला आहे. राजकारण करण्यासाठी नाही हे सर्वानी लक्षात घ्यावे. प्रांतीय अस्मितेपेक्षा  ग्राहकाला कसे खूश करता येईल याकडे सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे. प्रदेशनिहाय चवीत थोडा फरक जाणवत असला तरी कुळाचे माधुर्य कायम राखण्यात आजवर आपण यशस्वी ठरलो आहोत. ही ताकद वाढवायची असेल तर एकोप्याने नांदण्याशिवाय पर्याय नाही. आधीच या दोन राज्यांत भरपूर वाद आहेत. त्यात या वादाची भर पडणे योग्य नाही. आपण सर्वानी मानवी भेदभावपूर्ण धोरणापासून सावध राहायला हवे. समस्त मानवजातीने यापुढे आपली विक्री करताना प्रामाणिकतेचा परिचय द्यावा, उगाच कोणतीही लेबले लावून लोकांची फसवणूक करू नये.’ यावर या सर्वप्रांतीय हापूस कुलोत्पन्न संमेलनाच्या साऱ्याच उपस्थितांनी देठाला देठ भिडवून आनंद व्यक्त केला!