चार-पाच गावांतली भाषणे आटोपून सांगोल्यातल्या बैठकांना हजेरी लावून बापू पाटील परतले तेव्हा सायंकाळचे चार वाजले होते. पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. दोन ठिकाणी कार्यकर्त्यांनी जेवणाचे ताट समोर धरले पण त्यांच्या डोळ्यासमोर ‘ती’ बंडलेच यायची. गावाजवळच्या शेतात नव्यानेच बांधलेल्या प्रशस्त बंगल्यातून साहेबांना ‘झाडी-डोंगर’ दिसावे म्हणून नोकराने खिडक्या उघडताच त्यांनी रागाने त्याच्याकडे बघितले. ते आल्याची वर्दी मिळताच सारे दिवाणखान्यात जमले. त्यात ‘त्या’ काळरात्री गाडीत असलेले स्वीय साहाय्यक, कंत्राटदाराची माणसे, त्यांचा पुतण्या होते. या साऱ्यांना चाबकाने फोडून काढायला हवे असा विचार मनात आला पण निवडणूक काळात आणखी विघ्न नको म्हणत तो त्यांनी टाळला, सारे माना खाली घालून उभे असलेले बघून त्यांचा पारा चढला. ‘मूर्खांनो, काही बोलाल की नाही’ तरीही कुणी मान वर केली नाही. पाटलांनीच सुरुवात केली.
हेही वाचा >>> संविधानभान : निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात?
‘‘असा’ प्रवास रात्री करायचा नसतो एवढीही अक्कल नव्हती का तुम्हाला? ही आयडिया कुणाची होती,’’ असे विचारताच साऱ्यांनी पुतण्याकडे बघितले. राजकारणात हे पुतणे अलीकडे बरेच अडचणीचे ठरू लागलेत असा विचार मनात आला पण त्यांनी तो बोलून दाखवला नाही. ‘‘अरे, मी खानदानी मराठा. शेतजमिनीवर प्रेम करणारा. तरीही त्याचेच तुकडे विकून आजवर निवडणुका लढलो. पाटील असलो तरी बायकोला साडी घ्यायला पैसे नसतात असे सांगत गरिबीचे प्रदर्शन मांडत आलो. तुमच्या या एका चुकीमुळे माझे नाक कापले गेले. १९९९ ला कंत्राटदाराकडून लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडलो गेलो. पण हार न मानता जेलमधून निवडणूक लढवली. २५ वर्षांत तो डाग लोक विसरले. आता हा पुन्हा नवा कलंक माथी लावलाय तुम्ही. एकेकाळी माझ्या भाषणाच्या कॅसेट अख्ख्या माणदेशात विकल्या जात. आता कोणत्या तोंडाने भाषण करू मी? विरोधकांना भलेही ‘खोके खोके’ म्हणून ओरडू देत पण आरोप होत नाहीत तोवर गरिबी हेच प्रचाराचे उत्तम हत्यार असते.
आज तुम्ही मला नि:शस्त्र करून टाकलेत रे! कुटुंबाला सुस्थितीत आणण्यासाठी सामान्य आमदाराला काय मेहनत करावी लागते हे नाही कळायचे तुम्हाला. गुवाहाटीला गेलो तेव्हा राज्यात सर्वत्र आमची छी थू होत होती. त्यातून मार्ग कसा काढायचा, लोकांचे मत कसे बदलायचे यावर विचार करत असताना मला ‘काय झाडी व काय डोंगर’ची कल्पना सुचली. मग ठरवून फोन केला व संवाद व्हायरल केले. त्यानंतर लोकांचा राग कमी झाला. त्यातून मिळालेली ‘बक्षिसी’ तुम्हाला धड हाताळताही येत नसेल तर तुमची फौज काय कामाची? हपापाचा माल गपापा वाटला की काय तुम्हाला?’’ ‘‘राजकारणात बरेच जण असतात पण अशी ‘आवक’ सुरू व्हायला मेहनत व नशीब दोन्ही लागते. त्यात मिठाचा खडा पडला की परिस्थिती पालटू लागते. आता आरोपाला उत्तरे देण्यातच माझा वेळ जाणार. वरून बंडले हातून गेली ती वेगळीच.’’ अचानक धाप लागल्याने बापू थांबले तसे धीर एकवटून पुतण्या म्हणाला, ‘‘काका, ठाण्याहून निरोप आलाय. ती बंडले विसरा व नव्याने दुप्पट बंडले घेऊन जा’’ हे ऐकताच पाटलांचे डोळे चमकले व ते लगेच खिडकीकडे जात झाडी व डोंगर न्याहाळू लागले.