‘अलख निरंजन’ अशी आरोळी ऐकू येताच सुजयदादा पटकन बाहेर आले. साधूच्या वेशात असलेला वृद्ध गृहस्थ बघून त्यांची उत्सुकता चाळवली. त्याच्याशी गप्पा मारताना अगदी सहज त्यांनी सध्या खराब असलेल्या नशिबाचा विषय काढला. ‘मी काही शिजवायला लागलो की कुणी तरी येते व पातेल्याला लाथ मारते. याच विचक्याने संगमनेरची संधी गेली’ हे ऐकताच साधू मंद हसले. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग. तुम्ही कुणालाही सोबत न घेता जंगलात जाऊन चुलीवर अन्न शिजवा. हे करताना पातेले पडणार नाही याची काळजी घ्या. एकदा का ते तुम्ही खाल्ले की तुमची ग्रहदशा चांगली होईल. हा सल्ला ऐकून दादांचे डोळे चमकले. ऐन प्रचाराच्या काळात एक दिवस नशीब चांगले होण्यासाठी काढायला काही हरकत नाही असे मनाशी ठरवत ते तयारीला लागले. महागड्या गाडीत पातेले, धान्य, तिखटमीठ ठेवताना त्यांना बरीच लपवाछपवी करावी लागली. ते कर्जतजवळील रेहेकुरी अभयारण्याकडे निघाले. पोहोचताच लाकडे गोळा केली. पण आग लागेना.
थोडा पालापाचोळा गोळा केल्यावर एकदाची ती लागली. धुराने त्यांचे डोळे लाल झाले. नशिबासाठी हे सहन करावे लागणार म्हणत त्यांनी डोळे पुसले. सर्व साहित्य टाकून त्यांनी पातेले एकदाचे जाळावर ठेवले. आता एक तासात नशीब पालटेल म्हणत ते समाधानाने मोबाइल बघू लागले. संगमनेरहून वसंतराव देशमुखांचा फोन आला. आता पुन्हा ही ब्याद कशाला म्हणत त्यांनी तो उचलला. थोरातांची परिस्थिती खूपच खराब असे पलीकडून ऐकताच दादा उत्साहात उठून उभे झाले व चालायला लागताच त्यांचा पाय चुलीबाहेर आलेल्या सर्वांत लांबरुंद लाकडावर पडला. सारी चूलच उद्ध्वस्त झाली. पातेले कलंडले. ‘ठेवा फोन’ असे दरडावून ते मटकन बसलेच. मग पुन्हा नव्याने चूल मांडली. आता कुणाचाही फोन आला तरी हालचाल करायची नाही असा निग्रह केला. एक डोळा पातेल्यावर तर दुसरा मोबाइलवर होता. तेवढ्यात एक चित्रफीत नजरेस पडली.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
पारनेरमध्ये नीलेश लंकेंच्या पत्नी कशा मागे पडत चालल्या यावरचे विश्लेषण होते. ते बघण्यात एवढे गुंग झाले की बराच काळ चुलीकडे लक्षच गेले नाही. चुलीतील लाकडाच्या निखाऱ्याची राख झाली. आधार निसटल्याने पातेले पुन्हा कलंडले. अन्न वाया गेले. हे बघून दादांनी डोक्यावर हात मारला. पुन्हा चूल बनवून पातेले ठेवले. आता पोटात घास जाईपर्यंत मोबाइलला हात लावायचा नाही व विरोधकांचा विचार करायचा नाही असे ठरवून ते जाळाकडे लक्ष ठेवून बसले. तेवढ्यात कावळ्यांचा थवा आला. पराभवानंतर आपण कावळे पोहोचायच्या आधी लग्न, मृत्यू व बारशाला पोहचू असे म्हणालो होतो. ते तर यांना कळले नसेल अशी शंका त्यांच्या मनात आली. एक गुराखी अचानक समोर आला. न राहवून त्यांनी सारी कथा त्याला सांगितली. तो म्हणाला, ‘दादा, नशिबाला दोष देण्यापेक्षा लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही वृत्ती अंगी बाळगा, सर्व ठीक होईल.’ हे ऐकताच पसारा तसाच ठेवून ते लोणीकडे परत निघाले.