मला माफ करा कविवर्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाही तर मी चोरी केली नसती.

जिंदगी अंगावर आली तेव्हा

सापडलाच नाही चिमूटभर कोपरा

साधा पाय टेकवायला

भाकरीचा चंद्र शोधण्यातच

आयुष्याची अमावस्या झाली

नव्हती मंजूर आसवांशी तडजोड

आपला मूक अंधार गिळायला

घालू लागलो डाके

लुटू लागलो इतरांच्या

प्रकाशाच्या पखाली

मला माफ करा कविवर्य

नाही तर मी चोरी केली नसती.

मिसरूड फुटायच्या काळात

कवितेची मुशाफिरी आम्हीही केली कविवर्य

नाही असे नाही

तुमच्या कवितेसोबत भाकरीचा चंद्र

शोधायचा प्रयत्न आम्हीही केला

पण कवितेची आग आणि पोटाची आग

याची जमलीच नाही लय

मग चोरी करणाऱ्या हातांनी

कविता लिहावी, हेही पटेना

(चोर असलो तरी कवितेशी प्रामाणिक बरं कविवर्य)

मग कविताच राहून गेली

भाकरीच्या चंद्राचा शोध तळपतच राहिला

मला माफ करा कविवर्य

नाही तर मी चोरी केली नसती.

कविवर्य, तुम्ही कवितेच्या क्षेत्राचे सम्राट

मोठी गुस्ताखी झाली शहेनशहा

आपल्याच घरी चोरी केली

कुठे फेडू हे पाप

सुरुवातीला लक्षातच आलं नाही मायबाप

घाई असते ना सहीसलामत बाहेर पडण्याची

पण कवीच्या घरी चोरी,

हे पाप घेणार नाही अंगावर

जिथल्या तिथे ठेवेन, नेलेली प्रत्येक गोष्ट

एवढ्याचसाठी की सांगता येईल मलाही

‘अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना

विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही’

हेही वाचा >>> संविधानभान : उदारमतवादी मार्गदर्शक तत्त्वे

असे व्हायला नको कविवर्य, मला माफ करा कविवर्य. समोर बसलेल्या चोराने नारायण सुर्वेंच्याच शब्दांचा आधार घेत केलेली ही कविता वाचून ठाणेदाराचे मन द्रवले. त्यांनी चहा मागवून विचारपूस केली तेव्हा कळले की आताचा हा अट्टल चोर एके काळी कवी होता. पुस्तके न खपल्याने परिस्थितीवश त्याला चोर व्हावे लागले. हे ऐकून सारेच पोलीस भारावले. ठाणेदार म्हणाले, याला न्यायालयात हजर करण्याआधी झब्बा, पायजामा घालायला द्या व खांद्याला एक झोळी अडकवा म्हणजे त्यांचाही विश्वास बसेल हा कवी आहे म्हणून. हे ऐकून चोराने हात जोडले व मनातल्या मनात पुन्हा नव्या कवितेची यमके जुळवू लागला…

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta satire article thief returns valuables after realizing house belonged to noted marathi writer narayan surve zws
Show comments